श्री सुहास रघुनाथ पंडित
६ डिसेम्बर – संपादकीय
डाॅ.भि.रा.तथा बाबासाहेब आंबेडकर :
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन !(1956)
बाबासाहेब हे थोर न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,राजनितीज्ञ, तत्वज्ञ, कायदेतज्ञ,समाज सुधारक,दलितोद्धारक,भारतीय बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सर्वांना ज्ञात आहेत.मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स या संस्थातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.सर्वांत प्रतिभाशाली व सर्वांत उच्च विद्याभूषित राजकारणी अशी त्यांची ख्याती होती.
त्यांना मराठी,इंग्रजी,संस्कृत,हिंदी,पाली,फ्रेंच,जर्मन,गुजराती, बंगाली, कन्नड आणि पारसी या भाषा येत होत्या.इंग्रजीत त्यांनी विपूल लेखन केले आहे.22 ग्रंथ,पुस्तके व 10 शोधनिबंध पुर्ण असून 10 ग्रंथ अपूर्णावस्थेत आहेत.मराठी व अन्य भाषांतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांच्या लेखनात त्यांनी धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा यावर भर दिला आहे.त्यांच्या साहित्याचे आतापर्यंत 22खंड प्रकाशित झाले आहेत.अद्याप अनेक खंड प्रकाशित करावे लागणार आहेत एवढे साहित्य उपलब्ध आहे.सर्वांत जास्त लेखन करणारी राजकीय व्यक्ती असा त्यांचा उल्लेख करता येईल.
ते उच्च विद्याभूषित तर होतेच,पण त्यांना अनेक सन्मानही मिळाले होते.कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डाॅक्टर ऑफ लाॅ ही व उस्मानिया विद्यापीठाने डाॅक्टर ऑफ लिटरेचर ही मानाची पदवी दिली.भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले आहे.शिवाय बोधिसत्व,मैत्रेय या बौद्ध धर्मातील उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.त्यांच्या नावाची व छायाचित्राची पोस्टाची तिकीटे,चलनातील नाणी काढून ह त्यांना गौरविण्यात आले आहे.
भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान हे किती मोलाचे आहे हे शब्दात सांगणे अवघड आहे.जगभरात कौतुकास पात्र ठरलेल्या संविधानाच्या या निर्मात्यास स्मृतीदिनी लाख लाख प्रणाम.!
पद्मजा फाटक :
विविध मासिके,दूरदर्शन अशा माध्यमातून साहित्य सेवा करणा-या पद्मजा फाटक यांचा आज स्मृतीदिन.(2014)
एकोणीसशे ऐशी च्या दशकात सुंदर माझे घर,शरदाचे या सारख्या दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकांचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते.
ललित,कथा,बालसाहित्य,प्रवासवर्णन,चरित्रात्मक असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.प्रसन्न,खेळकर लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.किडनीच्या आजाराने दीर्घकाळ त्रस्त असूनही त्यांनी आपल्या लेखनातील ताजेपणा टिकवून ठेवला.आयुष्य मजेतच जगायचं अस म्हणत आजारपणानंतरचे लेखन त्यांनी ‘मजेत’ या टोपण नावानेच केले.
गर्भश्रीमंतीचे झाड,आवजो,रत्नाचं झाड,बाराला दहा कमी,वडील व मुलगी यांच्यातील नाते उलगडून दाखवणारे,’बापलेकी’ हे संपादित पुस्तक,चंमतग चष्टीगो हे बालसाहित्य ,शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचे चरित्र ,ही त्यांची काही प्रमुख पुस्तके.स्त्री मासिकातील ‘पुरूषांच्या फॅशन्स’ हा त्यांचा लेख खूप गाजला होता.
गर्भश्रीमंतीचे झाड या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.
2014 मध्ये त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
☆☆☆☆☆
मुरलीधर खैरनार :
छ.शिवरायांची सुरतेची लूट सर्वांनाच ठाऊक आहे.या लूटीतील बराच मोठा हिस्सा गायब झाला होता.त्याच्या घेतलेल्या शोधाची अभ्यासपूर्ण कथा ‘शोध’ या कादंबरीतून सांगणारे मुरलीधर खैरनार यांचा आज स्मृतीदिन.(2015)
खैरनार हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.ते इतिहासाचे अभ्यासक तर होतेच.पण नाट्यकर्मी,निर्माता,दिग्दर्शक,अभिनेता,मुक्त पत्रकार,संघटक अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या.आवर्त,आणखी एक नारायण निकम,अजब न्याय वर्तुळाचा,घालिन लोटांगण,शुभमंगल इ.नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.गाढवाचे लग्न या पुन्रनिर्मित नाटकाचे ही त्यांनी दिग्दर्शन केले व त्याचे शेकडो प्रयोग झाले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दिल्या जाणा-या सर्जनशील लेखनासाठीच्या अभ्यासवृत्तीचे ते प्रथम मानकरी ठरले.
अ.भा.नाट्य परिषद,अ.भा.विद्यार्थी परिषद,शेतकरी संघटना,या संस्थांचे ते पदाधिकारी होते.संघटनेच्या ग्यानबा या मासिकाचे त्यांनी संपादन केले होते.
शोध या त्यांच्या कादंबरीला सार्वजनिक वाचनालय,नाशिक आणि म.सा.प.चा ह.ना.आपटे पुरस्कार मिळाला होता.
2015 मध्ये त्यांचे निधन झाले.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया,दिव्यमराठी ,म.टा.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈