क्षणाक्षणाला

दिशादिशातून

आनंदाला

उधाण यावे  

स्वप्नामधल्या

परीकथेसम

जीवन अवघे

जगत राहावे

 – श्रीमती उज्ज्वला केळकर

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ६ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

मराठीतील सुप्रसिद्ध लेखक,  समीक्षक,  टीकाकार व विचारवंत श्री. श्रीकृष्ण केशव क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाली येथे दि.  6/11/1901 ला झाला. समाज, जीवन व संस्कृती यांचे सखोल चिंतन त्यांच्या लेखनातून दिसून येते. सौंदर्यवादी, चिंतनशील, वास्तववाद, गूढवाद, नवमानवतावाद इ.  विषयांवर मूलभूत चर्चा करणारे असे त्यांचे साहित्य वेगळा ठसा उमटवून जाते. ज्ञानकोशकार केतकर यांचे ते समविचारी होते.

1940 साली त्यांची राक्षसविवाह ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासूनच त्यांच्या लेखनातील वेगळेपणाची दखल घेतली गेली.

आधुनिक राष्ट्रवादी रवींदनाथ ठाकूर, उमरखय्यामची फिर्याद, टीकाविवेक, व्यक्ती आणि वाङ्मय, वादे वादे ही त्यांची समीक्षेवरील गाजलेली पुस्तके. याशिवाय तसबीर आणि तकदीर हे आत्मचरित्र, बायकांची सभा हे प्रहसन, मराठी भाषा–वाढ आणि बिघाड हे वैचारिक लेखन असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. निवडक श्रीकेक्षी या नावाने त्यांचे निवडक साहित्य साहित्य अकादमीने संकलित केले आहे. साहित्य अकादमीने सल्लागार मंडळावर सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या नावे समीक्षेसाठी पुरस्कार ठेवून त्यांचा सन्मान केला आहे. 1959 साली मिरज येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी बरोबरच त्यांनी उर्दू शायरीचाही अभ्यास केला होता.  

1980 मध्ये त्यांचे निधन झाले.

सारस्वतकार भावे:

06/11/1871 हा विनायक लक्ष्मण तथा सारस्वतकार भावे यांचा जन्मदिवस. कोकणातील पळस्पे या गावी त्यांचा जन्म झाला तर शिक्षण बालपण व शिक्षण ठाणे येथे झाले . बी.एस.सी. पदवी संपादन केली असली तरी त्यांनी प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक, इतिहासकार आणि संपादक म्हणून नाव कमावले. ‘मराठी वाड्मयाचा त्रोटक इतिहास’ चे लेखन त्यांनी ग्रंथमाला या मासिकातून केले. महाराष्ट्र कवि हे मासिक 1903 साली काढले. महानुभवपंथाच्या पोथ्या त्यांनी बाळबोधलिपीत प्रकाशित केल्या. ऐतिहासिक संशोधनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. विद्यमान नावाचे मासिक काढले. यावरून त्यांची साहित्य व संशोधन याविषयीची धडपड दिसून येते. पण त्याना लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथामुळे. ते या ग्रंथामुळे सारस्वतकार भावे या नावाने ओळखू जाऊ लागले. याशिवाय त्यांनी नेपोलियनचे चरित्र, दासोपंतांचे गीतार्णव, नागेश कविंचे सीतेस्वयंवर यांचा लेखन व सुधारित आवृत्तीचे प्रकाशनही केले. कविकाव्यसूची, वच्छाहरण या महानुभव काव्याचे संपादन केले. ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील ते एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. भारतातील पहिले मराठी पुस्तकांचे सार्वजनिक वाचनालय त्यांनीच ठाणे येथे सुरू केले. यावरून त्यांच्या कार्याची महती लक्षात येईल.

भालबा केळकर:
भालचंद्र वामन तथा भालबा केळकर हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. पण लेखन आणि अभिनय या अंगभूत गुणांमुळे त्यानी या क्षेत्रातही महत्वाचे कार्य केले. अनेक बालनाट्ये व नभोनाट्यांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले. शास्त्रीय विषय रंजकपणे मांडणे हे त्यांच्या बालनाट्यांचे वैशिष्ट्य होते. नंतर त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था काढली. या संस्थेने अनेक नाटक सादर केली. भालबांनी दिग्दर्शन व अभिनयही केला. 1961 साली प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक प्रथम दिग्दर्शित केले. नंतर वेड्याचं घर उन्हात, तू वेडा कुंभार इ . नाटके पडद्यावर आणली.

ओळखीच्या म्हणी कथांच्या खाणी, क्रिकेटचा खेळ व इतर गोष्टी, गुरूवरचा माणूस, तलावातले रहस्य हे त्यांचे काही बालसाहित्य. तर प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन, शेरलॉक होम्सच्या अनुवादित कथा (सहा भाग), संपूर्ण महाभारताचे आठ खड हे त्यांचे अन्य काही लेखन.

1987च्या आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. !

भाऊ पाध्ये:
भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिवस.  आपण त्यांच्या साहित्य कर्तृत्वाविषयी दि. 30/10/21 च्या अंकात वाचले आहे. म्हणून येथे पुनरावृत्ती टाळत आहे.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments