श्रीमती उज्ज्वला केळकर

? ७ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

*केशवसुत (७ ऑक्टोबर १८६६ ते ७ नोहेंबर १९०५ )

कृष्णाजी केशव दामले म्हणजे केशवसुत, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जातात. त्या वेळेपर्यंत मराठीत काव्यरचना व्हावयाची ती संत, पंत ( पंडीत) किंवा शाहीरी रचनेच्या स्वरूपाची. ती परांपरा केशसुतांनी मोडली. वास्तव जीवनातील विषयांवर कविता केल्या. ‘नव्या मनुतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे.’ अशी ‘तुतारी’ फुंकत त्यांनी घोषणा केली,

 ‘आम्ही कोण म्हणोनी काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे

 देवाने दिधले जग तये आम्हासी खेळावया.’

आणि मग त्यांच्या लेखणीने कागदावर शब्दांचा खेळ मांडला. सौंदर्यवादी दृष्टीकोन  त्यांनी मराठी कवितेत प्रथम आणला. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, ती अंत:स्फूर्त असावी.  तिच्यावर बाह्य प्रभाव पडू नये, असं ते म्हणत. वर्डस्वर्थ, कीटस, शेली इ. इंग्रजी कवींचा त्यांच्यावर प्रभाव होता. इंग्रजी कवितेतील १४ ओळींचे सॉनेट हा रचना प्रकार त्यांनी  मराठीत ‘सुनीत’ या नावाने लोकप्रिय केला.  त्यांच्या आज १३५ कविता उपलब्ध आहेत. त्यात अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, याला विरोधा करून मानवतावादाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रगटीकरण, निसर्ग इ. विषयांवर कविता केल्या ‘नवा शिपाई, तुतारी, सातरीचे बोल, झपूर्झा , हरपले श्रेय’ इ. त्यांच्या कविता गाजल्या.

मधू मंगेश कर्णिक यांच्या प्रयत्नाने त्यांच्या जन्मगावी मालगुंड इथे त्यांचे स्मारक उभारले गेले. ८ मे  १९९४ साली कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

*य.गो.जोशी ( १७ डिसेंबर १९०१ ते ७ नोहेंबर १९६४ )

य.गो.जोशी हे कथाकार, पटकथाकार आणि प्रकाशक होते. त्यांचा जन्म भिगवणइथला. ‘अन्नपूर्णा, वाहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा माझा मुलगा’ इ. यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा त्यांच्याच.

घरातील आर्थिक ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे त्यांना ५वीतच शिक्षण सोडून द्यावे लागले. त्यानंर, शाई तयार करणे, सुगंधी तेले तयार करणे, वृत्तपत्रे विकणे इ. अनेक कामे त्यांनी केली. पुढे त्यांच्या लेखनास सुरुवात झाली. १९३४ मध्ये त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू  केला.  त्यांची पहिली कथा ‘एक रुपया दोन आणे’ ही यशवंत मासिकात प्रकाशित झाली. पुढे याच मासिकाच्या कथास्पर्धेत १९२९ साली त्यांच्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नंतर याच कथेवर आधारलेला ‘शेवग्याच्या शेंगा’ हा चित्रपटही खूप गाजला.

त्यांच्या कथांमधून पांढरपेशीय मध्यम वर्गाचे जीवन चित्रण आढळून येते. उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न, अर्थपूर्ण भाषाशैली इ. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘प्रसाद’ मासिकाचे ते संपादक होते.   

‘अनंता पारत आला ( कादंबरी) , ‘दुधाची घागर ‘ ( आत्मवृत्त ), अनौपचारिक मुलाखती, आवडत्या गोष्टी, औदुंबर आणि पारिजात, गजरा मोतियाचा ,जाई-जुई, तरंग, तुळशीपत्र आणि इतर कथा, पुनर्भेट भाग- १ ते १० इ. त्यांचे अनेक कथासंग्रह आहेत. महाराष्ट्राचा परिचयखंड १ व २ ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. सह संपादक  होते, चिं. ग. कर्वे आणि सं.आ. जोगळेकर. महाराष्ट्राच्या माहितीच्या दृष्टीने हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.

 *सुनीता देशपांडे (3जुलै1925 ते ७नोहेंबर २००९)

सुनीताबाई जशा लेखिका होत्या, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांचे लग्न पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर १२ जून १९४६ रोजी झाले. त्यांनी  पु. लंबरोबर अनेक नाटकात कामे केली. ‘वंदे मतरम्’ आणि ‘नवरा-बायको’ या चित्रपटातही त्यांनी कामे केली. ‘राजमाता जीजाबाई’ हा एकपात्री प्रयोग त्यांनी केला. पु.ल. देशपांडे यांनी लिहीलेल्या ‘सुंदर मी होणार ‘ या नाटकात त्या ‘दीदीराजे यांची भूमिका करत.

 त्यांनी लिहिलेले ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र खूप गाजले. ‘प्रिय जी.ए.’ हा पत्रसंग्रह त्यांनी संपादित केला. मण्यांची माळ ( ललित ), मनातलं अवकाश’, ‘सोयरे सकळ, (व्यक्तिचित्रण ), . ‘आठवणींच्या प्रदेशातील स्वैर भटकंती’ इ. त्यांची पुस्तके मौज प्रकाशननी प्रकाशित केलीत, ’समांतर जीवन’ हा अनुवादीत लेखांचा संग्रह सन प्रकाशनाने प्रकाशित केलाय.

 जी.एं.च्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला पुरस्कार त्यांच्या’ प्रिय जी.ए.या पुस्तकास २००८ साली मिळाला.

केशवसुत, य.गो.जोशी आणि सुनीताबाई देशपांडे या तिघाही महनीय व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्मृतीदिंनंनिमित्त विनम्र अभिवादन ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments