सुश्री मंजुषा सुनीत मुळे
८ नोव्हेंबर – संपादकीय
आज ८ नोव्हेंबर – आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कोणत्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा जन्मदिन असतो , हे सांगण्याची गरज खरंच आहे का ? तरी सांगते. आज श्री पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन.
(८/११/१९१९ – १२/०६/२००० ) – ‘ पु. ल. ‘ ही आता दोन वेगळी अक्षरे राहिली नसून “ पुल “ असा एक नवा शब्दच तयार झालेला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि अतिशय आपुलकीने अगदी जवळच्या माणसासाठी वापरावा तसा हा शब्द मराठी रसिक सहजपणे वापरतात, हेच मराठी मनावर वेगवेगळ्या प्रकारे अक्षरशः गारुड करणाऱ्या या साहित्यिकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच एखाद्या गारुड्याच्या पोतडीसारखे होते, आणि वेळोवेळी त्यातून त्या व्यक्तित्वाचा लक्ख चमकणारा एकेक पैलू रसिकांसमोर येत राहिला, आणि रसिक भारावल्यासारखे त्याकडे बघत राहिले.
काही काळ एक शिक्षक, आणि पुढे आजीव– एक रसिकमान्य उत्कृष्ट लेखक-नट- नकलाकार – गायक – उत्तम पेटीवादक- नाटककार-कवी-संगीत दिग्दर्शक-हजरजबाबी उत्कृष्ट वक्ता- संपन्न कलाकृती सादर करणारा निर्माता — आणि या सगळ्या कलागुणांना सातत्याने टवटवीत अशा खुमासदार- बहारदार विनोदाची सुंदर झालर लावणारा एक खंदा विनोदवीर. —- आणि विशेष म्हणजे यापैकी कुठलीही कला इतकी समृद्ध असायची, की ती समृद्धी अगदी सामान्य रसिकांपर्यंतही आपसूकच जाऊन पोहोचायची. याचे कारण एकच होते, आणि ते म्हणजे त्यातला सहज-साधेपणा. त्यांचे प्रचंड साहित्य– मग तो एखादा लेख असेल, नाटक असेल, व्यक्तिचित्र असेल, पुस्तक असेल किंवा चित्रपट असेल — त्यात त्यांनी चितारलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे सगळ्यांनाच अगदी आपल्या रोजच्या परिचयातल्या, आपल्या अवतीभवती वावरण्याऱ्या माणसांची आठवण करून देणाऱ्या – आणि काहींना आरशात त्यांचे स्वतःचेच प्रतिबिंब वाटावे अशा. आणि पुलंची हीच तर खासियत होती. “ गुळाचा गणपती “ या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे अफलातून दर्शन घडले होते. मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व हा त्यांचा आणखी एक विशेष पैलू. त्यांचे हे भाषाप्रभुत्व त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात आवर्जून लक्ष वेधून घेत असे. आणि तसाच लक्ष वेधून घेणारा होता तो त्यांचा हजरजबाबीपणा. एकपात्री नाटक, अनेकपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कायम लक्षात राहील असेच लखलखते काम केले. दूरदर्शनच्या पहिल्या-वहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहेरुंची मुलाखत घेणारे पु.ल., हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार ठरलेले आहेत.
त्यांच्याबद्दल विशेषत्वाने सांगायला हवी अशी गोष्ट म्हणजे, साहित्यक्षेत्राशी संबंधित संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, कितीतरी ध्वनिफिती, लेख, मुलाखती, असे बरेच साहित्य त्यांनी जमा करून ठेवलेले आहे. अथक प्रयत्न करून, मराठी नाटकाचा अगदी आरंभापासूनचा इतिहास त्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. लेखसंग्रह, अनुवादित कादंबऱ्या, व्यक्तिचित्रे, काही चरित्रे, उत्तम प्रवासवर्णने, एकांकिका-संग्रह, नाटके, लोकनाट्ये, विनोदी कथा, चित्रपटकथा-पटकथा, आकाशवाणीसाठी श्रुतिका, अशा साहित्यक्षेत्रातल्या त्यांच्या चौफेर कामगिरीबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. त्यांची प्रत्येक साहित्यकृती इतकी लोकप्रिय झालेली आहे की त्यांची नावे सांगण्याची गरजच नाही. त्यांची भाषणेही नेहेमी “ गाजलेली “ हे विशेषण लावूनच यायची. विशेष म्हणजे “ पुल “ या व्यक्तिविशेषावरही अनेकांनी स्वतंत्रपणे पुस्तके लिहिलेली आहेत—उदा. विस्मरणापलीकडील पु.ल., पु.ल.: एक साठवण, पु.ल. नावाचे गरुड, ‘ जीवन त्यांना कळले हो ‘ हे पु.ल. यांच्याबद्दल विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन असणारे पुस्तक, पुरुषोत्तमाय नमः, आणि अशी आणखी काही . ‘ भाई ‘या टोपणनावाव्यतिरिक्त “ धोंडो भिकाजी कडमडे जोशी “, “ पुरुषराज अळूरपांडे “ अशीही त्यांची काही मजेदार टोपणनावे होती. पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, असे गौरवपर अनेक अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
“ इदं न मम् “ या वृत्तीने त्यांनी मुक्तहस्ते लक्षणीय दाने दिलेली आहेत. विनोदाच्या अंगरख्याआड एका निश्चित तत्त्वज्ञानाने भरलेले आणि भारलेले मन जपत, लॊकांना काही काळ स्वतःच्या व्यथा-वेदना विसरून निखळ आनंदाचा अनुभव भरभरून देणाऱ्या पुलंना आजच्या त्यांच्या जन्मदिनी अतिशय मनःपूर्वक आदरांजली.
☆☆☆☆☆
कथा- कादंबरी- वगनाट्य अशा वेगवेगळ्या साहित्यप्रांतात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून गेलेले सिद्धहस्त साहित्यिक श्री. शंकर पाटील यांचाही आज जन्मदिन. ( ८/११/१९२६ –१८/१०/१९९४ )
रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काही काळ काम केल्यानंतर श्री. पाटील यांची आकाशवाणी- पुणे केंद्रात नियुक्ती झाली. नंतर एशिया फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी ग्रामीण जीवनाचा विशेष अभ्यास केला, आणि त्यावर आधारित ‘ टारफुला ‘ ही कादंबरी लिहिली, आणि तिथून त्यांचा लेखनप्रवास जोमाने सुरु झाला. त्यांनी अनेक उत्तम कथा लिहिल्या. “ वळीव “ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे कितीतरी कथासंग्रह प्रसिद्ध झाले, आणि वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन, या संग्रहांना त्या त्या वर्षातील उत्तम कथासंग्रह म्हणून महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. त्यांच्या कथांचे तेव्हा इतर भाषांमध्ये अनुवादही झाले होते, ही खूपच महत्वाची गोष्ट.
गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची, कथा अकलेच्या कांद्याची, ही त्यांची लोकप्रिय वगनाट्ये. चित्रपट क्षेत्रात पटकथा आणि संवादलेखक म्हणूनही त्यांची कारकीर्द खूपच गाजली. युगे युगे मी वाट पहिली, गणगौळण, चोरीचा मामला, इत्यादी चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवाद्लेखनासाठी त्यांना शासकीय पुरस्कार दिले गेले होते. पिंजरा, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद श्री. पाटील यांचे होते. त्यांनी रेखाटलेली माणसे ग्रामीण असोत की नागरी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि मनाचेही विविध पदर त्यांच्या कथांमधून त्यांनी अलगदपणे आणि सहज उलगडून दाखवलेले प्रकर्षाने जाणवते, आणि ‘ त्यांची भाषा म्हणजे कथेमधून व्यक्त होणाऱ्या अनुभवांची भाषा असते ‘ असेच म्हणावेसे वाटते. त्यांचा प्रयोगशील स्वभाव कथालेखनातही दिसून यायचा, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कथेत सतत एक चैतन्य जाणवायचे.
साहित्यक्षेत्रातील मुशाफिरीच्या जोडीनेच, इ.८ वी ते १० वीसाठी ‘ साहित्यसरिता ‘ या वाचनमालेचे संपादन, म.रा. पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी भाषेसाठी विशेष अधिकारी म्हणून, आणि नंतर अन्य सहा भाषांमधील पाठ्यपुस्तकांसाठी ‘ विद्यासचिव ‘ म्हणून केलेले श्री. पाटील यांचे कामही आवर्जून सांगायला हवेच.
मराठी साहित्यात ग्रामीण बाजाच्या साहित्याची अनमोल भर घालणारे श्री. शंकर पाटील यांना विनम्र आदरांजली
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈