श्री सुहास रघुनाथ पंडित
९ फेब्रुवारी – संपादकीय
मुरलीधर देवीदास आमटे तथा बाबा आमटे.
बाबा आमटे हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते एक समाजसेवकाचे व्यक्तिमत्व. पण बाबा हे कायद्याचे पदवीधर होते आणि वकीली करत होते।
हे अनेकांना माहित नसावे. आयुष्याला कलाटणी देणा-या प्रसंगामुळे ते कुष्ठरोग पिडीतांचे ‘मसिहा’ बनले हे जरी खरे असले तरी त्यांचे अन्य कार्य पाहता समाजसेवा हा त्यांचा अंगभूत गुण होता हे दिसून येते. त्यांनी 1942 च्या लढ्यात भाग घेतला होता. शिवाय नर्मदा बचाओ आंदोलन, भारत छोडो आंदोलन, वन्य जीवन संरक्षण अशा अनेक उपक्रमात ते सक्रीय होते.
चंद्रपूर येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेला ‘आनंदवन’ हा आश्रम त्यांच्या कार्याचे सर्वोच्च शिखर आहे.
अशा या भावनाशील समाजसेवकाकडून काव्य निर्मिती होणे अगदी स्वाभाविक आहे .’ज्वाला आणि फुले ‘ आणि ‘उज्वल उद्यासाठी’ हे त्यांचे दोन काव्य संग्रह त्यांच्या विचारांचे दर्शन घडवतात.
त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, मॅगसेस पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार, जमनालाल बजाज, घनश्यामदास बिर्ला, गांधी शांति पुरस्कार अशा अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. शिवाय अनेक विद्यापिठांनी त्यांना डाॅक्टरेट दिली आहे.
अशा या कर्मयोग्याचा आज स्मृतीदिन आहे.
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा ‘
या उक्तीला सार्थ ठरवणा-या या महामानवास आदरपूर्वक वंदन.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈