सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
हिंदी दिवस
14 सप्टेंबर 1953पासून दर वर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
1918मध्ये झालेल्या हिंदी साहित्य संमेलनात ‘हिंदी ही जनमानसाची भाषा असल्यामुळे तिला राष्ट्रभाषा बनवावी’, असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर 14 सप्टेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानसभेने देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेला भारताची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केले. इंग्रजीऐवजी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देणे हे आपल्या स्वातंत्र्याचे, अस्मितेचे प्रतीक होते. राष्ट्रभाषा हिंदी, लिपी देवनागरी, मात्र अंक आंतरराष्ट्रीय रूपात असावेत, असे घोषित केले गेले.
पण या प्रस्तावाला अहिंदीभाषिक राज्यांतील जनतेने कसून विरोध केला. त्यामुळे इंग्रजीचे स्थान तसेच राहिले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी काका कालेलकर, हजारीप्रसाद द्विवेदी, सेठ गोविंददास, व्यौहार राजेंद्रसिंह यांनी अथक परिश्रम केले.
बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या बघितली, तर अख्ख्या जगात इंग्रजी व चिनीनंतर हिंदी भाषा बोलणाऱ्यांचा तिसरा नंबर लागतो. पण चांगल्या प्रकारे हिंदी बोलणे, लिहिणे, वाचणे जमणाऱ्या व्यक्तींची संख्या त्या मानाने कमी आहे व ती आणखी कमी होत जात आहे. व्यवहारातही हिंदी शब्दांची जागा इंग्रजी शब्द घेत आहेत. त्यामुळे हिंदी भाषा लुप्त होण्याच्या शक्यतेकडे वेगाने जात आहे. त्यामुळे हिंदी भाषेप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्याची आठवण असावी, म्हणून हिंदी दिवस साजरा करणे महत्वाचे आहे. जागतिक पातळीवरील आकडेवारी पाहायची झाली, तर योगाला 177 देशांचे समर्थन मिळाले ;पण हिंदीला 129 देशांचे समर्थन मिळवण्यात आपण अजूनही यशस्वी झालो नाही.
हिंदी भाषेचे महत्त्व व तिच्या वापराची नितांत आवश्यकता लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हिंदी दिवस साजरा केला जातो.
या दिवशी हिंदीच्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हिंदी निबंधलेखन, वक्तृत्वस्पर्धा,हिंदी टंकलेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
या दिवशी सरकारी कार्यालयांत इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात.
हिंदीच्या विकासाचं काम करणाऱ्या व्यक्तींना, तसेच हिंदीच्या प्रचारासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.
तांत्रिक वा वैज्ञानिक विषयांवर हिंदीत लिहिणाऱ्या व्यक्तींमधून 13 जणांना (पहिला, दुसरा, तिसरा व 10 उत्तेजनार्थ) राजभाषा गौरव पुरस्कार दिला जातो. तांत्रिकी व विज्ञानक्षेत्रात हिंदी भाषेला पुढे नेणे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
सरकारी कामकाजात हिंदीचा उपयोग वाढवण्यासाठी समिती, विभाग, मंडळानी हिंदीत केलेल्या श्रेष्ठ कार्यासाठी राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान केला जातो.
आजच्या या हिंदी दिवसाच्या निमित्ताने आपणही हिंदी भाषेच्या विकासकार्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करूया.
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकीपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈