सुश्री ज्योति हसबनीस
शेवट गोड व्हावा …!
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस का आलेख ‘शेवट गोड व्हावा’)
रिमझिमता पाऊस ..हवेतली सुरकी ..आणि वाफाळत्या काॅफीचा एकेक घोट ..बघता बघता काॅफीने तळ गाठला ..आणि शेवटचा घोट ..किंचित गोड लागला …अपार तृप्ती देऊन गेला .
कसं असतं ना माणसाचं …शेवट गोड तर सारं गोड हे अगदी ठसलं असतं त्याच्या मनावर ! मग ते सीरियल असो, कथा कादंबरी असो, नाटक असो , चित्रपट असो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असो ! ‘
‘ते दोघं आणि चारचौघं’ ह्यातही आपल्याला ‘त्या दोघांच्या’वियोगाची कल्पना करवतच नाही , त्यांच्या ओढीचा शेवट चिरकाल एकत्र येण्यातच व्हावा असंच आपल्याला वाटतं !
खुप कष्ट करून जिद्दीने वाढवलेल्या मुलांनी आईचा आधार बनून तिला अपार सुख देऊन तिचा शेवट सुखासमाधानात व्हावा असंच आपल्याला वाटतं !
वन्यपशुंच्या जीवनावरील लघुपट बघतांनादेखील जिवाच्या भीतीने सुसाट पळणारं हरिण वाघाच्या तडाख्यातून सुटून सुखरूप आपल्या कळपात जावं , गरूडाची झडप चुकावी आणि गोजिरवाणं सीगल त्याच्या तावडीतून सुटावं , कपारीच्या आश्रयाने त्याने दडावं , आणि अशा जीवघेण्या पाठलागाचा शेवट त्यांच्या सुखरूप असण्यात व्हावा ..हेच मन म्हणत असतं !
आयुष्य पुरेपूर उपभोगून झालेली वयोवृद्ध मंडळी ..वाढणारी वयं आणि ढासळत चाललेलं आरोग्य सांभाळत कशीबशी आला दिवस साजरा करणारी पिकली पानं ..कमीत कमी यांचा तर शेवट गोड व्हावाच ..आहे त्यापेक्षा अजून कमीअधिक वाट्याला न येता आजवर चाखलेल्या गोडीची चव मनभर असतांनाच त्यांचा शेवट व्हावा असं तर वाटतंच वाटतं …!
कॉफीचा तो शेवटचा घोट पण किती विचारांचं मोहोळ उठवलं त्याने !
मनात आलं कसं असतं ना माणसाचं , एखादी गोष्ट नाही करायची म्हणली तरी हटकून तीच कराविशी वाटते , आणि ती केल्यानंतर त्याचं नेमकं स्पष्टीकरणही अंतर्मनातल्या ‘मी’ साठी मनात तयारच असतं! बिनसाखरेची काॅफी प्यावी म्हणून काॅफी घेतली तशीच पण मनाच्या समाधानासाठी अपराधी भावाने चिमूटभर साखरही घातलीच कपात ..काॅफी संपता संपता समाधान होतं अजिबात गोड नाही लागत आहे त्याचं आणि शेवटी एका घोटात काॅफीला आलेल्या माफक गोडव्याने जीव सुखावला ..काॅफीचा तो शेवटचा घोट अपार तृप्ती देऊन गेला ! आणि त्या अपार तृप्तीतच विचार आला तो अशा सुखांताचा ..!!!!
*ज्योति हसबनीस*