श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

रत्न हरपले !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या नश्वर जगात मृत्यू अटळ आहे, तोच सत्य आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण कधीतरी हा मृत्यू असू नये असे अगदी मनापासून वाटते. काल आदरणीय रतनजी टाटा यांचे निधन झाले आणि वरील विचार माझ्या मनात आला…!

काही माणसे मरण येत नाही म्हणून जगत असतात, तर काही माणसे जगता येत नाही म्हणून मरणाची वाट पहात असतात…

तर काही माणसे मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा निगुतीने उपयोग करून आपला देह आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लावत असतात, त्यासाठी कणाकणाने झिजत असतात…

अहो, हे काही पारतंत्र्य काळातील स्वातंत्र्य सैनिकाचे वर्णन नसून आपल्या रतनजी टाटांचे माझ्या अल्पमतीने केलेले वर्णन म्हणता येईल…

टाटा उद्योग समूह!!!!

भारताच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असा एक मोठा उद्योग समूह. भारताला ज्याची गरज आहे, त्याची निर्मिती आम्ही करतो, असा नुसते न म्हणता प्रत्यक्षात तसे आचरण करणारा (नफा तोट्याची चिंता न करता….!) उद्योग समूह…! देशभक्ती हा या उद्योग समूहाचा ब्रँड झाला असे म्हटले तर वावगे होणार नाही…! 

एकेकाळी तर ५०१ बार पासून ट्रक पर्यंत टाटा अनेक वस्तू बनवत असत…

लिहिण्यासारखे भरपूर आहे…,

असो….

आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा भिजल्याशिवाय राहणार नाहीत कारण ज्या पिढीने पारतंत्र्य अनुभवले नाही, त्यांनी आदरणीय रतन टाटांच्या रूपाने खरा देशभक्त कसा असतो, हे पाहीले असे म्हणता येईल…!

रतन टाटांनी सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या मूल्यांशी किंचितही तडजोड न करता आपला उद्योग व्यवसाय तर वाढवला आणि याच बरोबर आपल्या देशाची शान आणि मान सतत उंच राहील यासाठी आटोकाट प्रयत्न केले…

त्यांचे अलिबाग जवळ घर होते. मांडवा येथे त्यांना अनेकदा पाहण्याचा योग आला आहे. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे त्यांचे अगदी थोडक्यात वर्णन करता येईल…

एखाद्या उद्योग समूहाच्या प्रमुखाचा मृत्यू होणे हे अगदी नैसर्गिक आहे, पण जेव्हा तिथे रतनजी टाटा असतात तेव्हा निव्वळ उद्योगपती रहात नाहीत, तर आपल्या घरातील कोणी असतात…! माझ्या सारख्या सामान्य मनुष्याच्या मनापर्यंत त्यांच्या मनातील देशभक्तीची ऊब झिरपते, हेच त्यांच्या जीवनाचे यश आहे असे मला वाटते…

आज भारतमाता सुध्दा दुःखी असेल कारण तिच्या एका सुपुत्राला ती आता पाहू शकणार नाही…

मरावे परि कीर्ती रूपे उरावे…!!!

आदरणीय रतनजी टाटांच्या चरणी माझी ही शब्द सुमनांजली सादर समर्पित!!!! 🌹🙏

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments