सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ चामी मुर्मू… सादर नमन… — लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
चामी मुर्मू यांना पद्मश्री मिळताच झारखंड राज्य आनंदलं होतं. त्यांना पर्यावरणविद म्हणून पद्मश्री देण्यात आली होती.
खरंच, जर चामी मुर्मू यांचा जीवनप्रवास बघितला तर त्यांच्या अचाट अफाट कामांनी माणूस थक्कच होईल. …. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर एक महिला काहीही करू शकते हे वाक्य चामी मुर्मू यांच्याकडे बघितल्यावर कळते. वृक्षारोपण, त्यांचं संवर्धन. जलसंरक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी खूप कामगिरी केली आहे.
झारखंड येथील सरायकेला खरसांवाच्या बाघरासाई येथील चामी यांचं कुटुंब. आई, वडील, भाऊ, बहीण आणि आजोबा या सगळ्यांसोबत त्यांचा बाल्यकाल गेला. सगळे शेतभात बघणारे. अनेकदा दुसरीकडे मजूरीसाठी त्यांना जावं लागायचं पण तिथे पैसे मिळत नसून धान( सालासकट तांदूळ ) मिळत असायचं त्यामुळे परिस्थिती हलाखीची असायची.
चामी आपल्या आजोबांसोबत गावात होणाऱ्या बैठकीत जायच्या तिथे झाडा झुडपांची माहिती त्यांना मिळत असायची. कोणती झाडं चांगली असतात हे ही त्यांना कळायचे आणि तेव्हापासूनच त्यांना झाडं आणि पर्यावरण या विषयात आवड निर्माण झाली.
१९८८ मध्ये त्यांनी आपल्यासोबत अकरा महिलांना घेऊन बगराईसाई गावात बंजर जमीनीवर झाडं लावण्याचे काम सुरू केलं. त्यांनी झाडं लावलीच नाही, तर ती जगवली ही. त्यानंतर मात्र त्यांचा हा प्रवास उत्कृष्टरित्या सुरूच राहिला. … चामींनी आत्ता पर्यंत ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली आहेत.
आता प्रश्न हा उद्भवतो की त्यांना इतकी जागा मिळाली कुठून? कशी? तर त्या बाबतीत त्या सांगतात.
“आम्ही गावोगावी बैठकी घेतो. त्यात कोणाच्या जमीनीवर झाडं लावायची हे ठरतं. नंतर कोणती झाडं लावायची हे ठरवलं जातं. सगळ्यांच्या सहमतीने निर्णय घेऊन झाडं लावतो. तीन वर्षं आम्ही त्यांची निगा राखतो, नंतर ग्राम समीती बनवून ती झाडं त्यांच्या सुपुर्द करतो. अधूनमधून आम्ही ही लक्ष देतोच. ”
…. अशा प्रकारे ५०० गावांमध्ये ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली गेली.
हे काम करताना चामी यांना बऱ्याच अडचणी आल्या. एकदा १९९५/९६;साली त्यांच्या नर्सरीत लावलेली एक लाख रोपं एका रात्रीत जमीनदोस्त केली गेली. त्यांनी गावात सभा भरवली पण “ हे काम कोणी केलं” याचं उत्तर मिळालं नाही. त्यावर त्यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आणि गुन्हेगार धरले गेले. झाडं तोडून नेणाऱ्यांबद्दल ही त्यांनी पोलिसांना सांगून ते काम रोखलं होतं. लाकुड चोरणाऱ्या माफियांसोबत ही यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांना सतत धमक्या मिळत असायच्या पण त्यातून निष्कर्ष हा निघाला की आज सगळे माफिया, चामींना भिऊन असतात. नक्सल्यांशी ही दोन दोन हात करायला त्या घाबरल्या नाह तर त्यांच्या धमक्या ही बऱ्याच मिळाल्या पण हार मानली तर त्या चामी काय? या थाटात कामं करतच राहिल्या, आणि परिणामी “ लेडी टार्जन” या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं.
झाडं लावण्याची कामगिरी करत असतानाच, जलवायु परिवर्तनच्या समस्येकडेही चामींचं लक्ष वेधलं गेलं. त्यासाठी त्यांनी तलाव, छोटे तलाव, पावसाळ्यात वहाणाऱ्या नाल्या यांत पाणी साठवण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी या सगळ्यांच्या मदतीने जिथे पाणी कमी मिळते त्या भागात पहाडी नाल्यां ठीक करत असतात, कधी कधी, कुठे कच्ची लहानगी धरणं बांधतात. पहाडांवरून पावसाचं पाणी खूप तीव्रतेने खाली येत असतं. पहाडांच्या बाजू बाजूने खड्डे पाडून त्या पाण्याची गती कमी करून हळूहळू खाली तलावात साठवलं जातं. अशातच ७१ गावात २१७ तलाव तयार केले गेले. चार अमृतसरोवर ही बांधले गेले. चामी सांगतात,
“ तलाव साधारणपणे १००× १००× १०चे असतात. जिथे पाणी पोहोचू शकते तिथेच आम्ही तलाव बांधतो. ”
आता त्या तलावात मत्स्य पालनाचे काम ही होऊ लागलंय.
चामींना सिंचनाचा विचार कसा काय आला असेल? तर त्यावर त्यांनी सांगितलं की ‘ आमच्या झारखंडमध्ये फक्त एकच पीक येत होतं. जर पाणी असेल तर दोनदा पीक येऊ शकतं ‘.. या विचाराने त्यांनी हे काम हातात घेतलं. त्याकाळात एक उद्घोष होता
“ हर हाथ को काम, हर खेत को पानी”
मग कामाबरोबरच पाण्याचं महत्त्व त्यांना समजलं. पाणी आलं असता या क्षेत्रातील पलायन थांबणं शक्य होतं.
१९९६, ते २०१८ या दरम्यान आलेल्या अहवालानुसार सरायकेला खरसावां या भागातील भूजल स्तर खूपच खाली गेला होता. त्याच अहवालात भूजलस्तर सुधारण्यासाठी तलाव वगैरे बांधण्याचे पारंपरिक सल्ले दिले गेले होते. तेच काम चामी मुर्मू यांनी हाती घेतलं आणि पूर्णत्वाला नेलं.
ही कामं करत असता चामींनी आणखी एक मोठी कामगिरी केली होती. ती म्हणजे “सहयोग महिला” म्हणून एन. जी. ओ. ची स्थापना. सुरुवात चार सहा महिलांपासून झाली. बायका सकाळ, संध्याकाळ स्वयंपाक करताना, एका मुठीत मावेल इतकी धान बाजूला काढून ठेवायच्या. आठवड्याच्या शेवटी त्यांचे तांदूळ करून ते बाजारात विकून पैसे मिळवायच्या. हळूहळू हा समूह एक स्वयं सहायता समूह झाला आणि मग “सहयोग महिला”. नंतर हा समूह बैंकैशी जोडला गेला.
दलमाच्या घाटीत दूर रहाणाऱ्या आदिम पहाडी जनजातीच्या मुलींच्या शिक्षणासाठीही चामींनी धडपड केली. गावाच्या ऑफिसमध्ये मुलींना पाचवीपर्यंत शिक्षण दिल्यानंतर त्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे एडमिशन मिळवून दिलं जातं. ही संघटना सुरक्षित प्रसव, एनिमिया या समस्यांकडे ही लक्ष देऊन महिलांचे जीवन सुखद करते. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असताना बैंकेकडून अनेक योजनांसाठी मिळणाऱ्या कर्जाने त्यांनी हजारो हातांना कामं दिली.
मदर टेरेसाला रोल मॉडेल मानणाऱ्या चामींनी २६३ गावात २८७३ सहायता समूह स्थापित केले ज्यात ३३, ००० सभासद आहेत.
ही सगळी कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मूंना सोशल मीडिया ट्विटर वर “ आदिवासी योद्धा ” ही पदवी दिली गेली. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मू नक्कीच पद्मश्री मिळवण्याच्या योग्यच आहेत.
पर्यावरण आमची जवाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने त्याविषयी विचार करायलाच हवा आणि त्याचं जतन ही करायला हवं. त्यांचं एक म्हणणं आपण लक्षात ठेवून थोडा हातभार लावून महिला शक्तीला सादर नमन करूया.
लेखिका : सुश्री राधा गर्दे, कोल्हापूर
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈