श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

राग बायकोचा…. फायदा जगाचा !लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे (dd) ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

(एक सत्यकथा)

श्री. सुंदर पिचाई 

राग बायकोचा…. फायदा जगाचा  !

हसू नका…. खरेच हे सत्य आहे. गोष्ट आहे 2004 सालची ! 

आताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई त्याकाळात अमेरिकेत करियर करण्यासाठी संघर्ष करत होते. धडपड सुरु होती. 

तर एकदा त्यांच्या तिथल्या परिचित फॅमिलीने याना जेवायला बोलावलं. 

सुंदरने हि गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली अन म्हणाले की, “असं करूया… मी ऑफिसातून कामे आटोपून परस्पर त्या मित्राच्या घरी येतो. तू आपल्या घरून आवरून वगैरे थेट तिकडेच ये. परत येताना मग आपण एकत्र येऊ”

जेवणाची वेळ रात्री आठची ठरली होती. त्याप्रमाणे मिसेस पिचाई वेळेत सर्व आवरून त्या फॅमिलीच्या घरी बरोबर आठ वाजता पोचल्या. तिकडून श्री सुंदर जी सुद्धा सगळं आवरून ऑफिसातून निघाले मात्र वाटेत गडबड झाली आणि ते रस्ता चुकले. त्यामुळे मग इतर लोकांना पत्ता विचारत विचारत त्यांना मित्राच्या घरी पोचायला दहा वाजले. तब्बल दोन तास उशीर. 

आणि तिथं गेल्यावर कळलं की, यांची वाट पाहून शेवटी कंटाळून त्यांच्या पत्नीने जेवण करून तिथून निघून घर गाठलं होत. हे कळल्यावर सुंदर अजूनच कचाट्यात अडकले की आता घरी बायकोसमोर कसे जायचे ? यजमान पण खरेतर मनातून नाराज झालेले. मात्र प्रोटोकॉल म्हणून त्यांनी कसेबसे याना जेवायला आग्रह केला मात्र सुंदरचा मूड नव्हता. मित्राला “सॉरी” असं म्हणत त्यांनी तिथून तसेच न जेवता काढता पाय घेतला. 

अमेरिकेत वेळ न पाळणे यासारखा दुसरा अपराध नाही, असं मानलं जाते.

घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना जाम फैलावर घेतलं. पार उलटी सुलटी हजामत तीही जणू बिनपाण्याने ! “तुमच्या अशा लेट येण्याने चार लोकात माझी किती फजिती झालीय याची कल्पना नाहीय तुम्हाला” असा तोंडाचा दांडपट्टा सुरु होता. 

वातावरण खूपच तापलेलं पाहून सुंदर पिचाई यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सरळ आपलं ऑफिस गाठलं.

रात्रभर ते जागेच होते…. एकच विचार करत की, मी रस्ता चुकलो अन लेट झाला. आणि पुढे इतकं रामायण घडलं. माझ्यासारखेच अनेक लोक असतील ज्यांना हा त्रास सोसावा लागत असेल. 

अशी काहीतरी सोय असायला हवी की कुणीच कधीच रस्ता चुकणार नाही. आणि हा विचार करत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात एकदम विचार आला की, जर खिशात रस्त्याचा नकाशा असेल तर योग्य मार्गदर्शन मिळालं असत अन मी रस्ता चुकलो नसतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर पिचाई यांनी आपल्या संपूर्ण टीमची मिटिंग बोलावली आणि नकाशा बनवण्याची आपली आयडिया सांगितली. मात्र या आयडिया बद्दल कुणीच स्वागतोत्सुक नव्हते उलट “असं शक्य नाही” हाच मूड सगळ्याचा होता. मात्र सलग दोन दिवस सुंदर त्यांच्याशी बोलत होते ! नकाशा स्कीम बद्दल समजून सांगत होते. आणि शेवटी त्यांनी याच टीम कडून असं एक सॉफ्टवेयर बनवून घेतलं जे लोकांना योग्य तो रस्ता दाखवेल. 

.. आणि अथक श्रमातून या टीमने 2005 सालात गुगल मॅप बनवून अमेरिकेत सर्वप्रथम लॉन्च केले. पुढच्या वर्षी इंग्लंड मध्ये आणि 2008 मध्ये भारतात गुगल मॅप ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. 

आणि आज त्या गुगल मॅपची उपयुक्तता संपूर्ण जगाला उमजली आहे. गुगल मॅप म्हणजे जणू सर्वासाठी घराबाहेर पडल्या क्षणापासूनच “वाटाड्या” चे काम करत आहे. विशेष म्हणजे त्याचे न ऐकता तुम्ही वेगळ्या रस्त्याने हट्टाने जायचे ठरवलं तरी तो गुगल मॅप (निवेदिका बाई) रागावत नाही तर तुम्हाला पुन्हा “रिरूट” करून देऊन योग्य मार्गावर आणते. एका पाहणीनुसार जगातील प्रत्येक सातव्या माणसामागे एक माणूस आजकाल गुगल मॅप वापरतो आहे. 

कळलं ? राग बायकोचा पण फायदा जगाचा !! कसा झाला ते ?

डॉ. डीडी क्लास : कधी कोणती घटना जगाला एक वेगळेच वळण देईल हे कधी सांगता येत नाही. बायकोने रागावणे हि घटना जगात काही पहिल्यांदा सुन्दर यांच्या घरी घडली असं नाही. त्याच्या कैक हजारो वर्ष आधीपासून हि घटना जगात घडत आलीय की ! पण सुंदरच्या घरी घडली आणि त्यांनी या घटनेतून पॉजिटीव्ह विचार केला अन त्यातून जगाला गुगल मॅप मिळाला. तसे तर झाडावरचे सफरचंद आधीपण खाली पडत होतेच की ! मात्र न्यूटनच्या डोक्यावर पडले अन त्यातून जगाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते कळलं ! सांगायचं इतकंच की, महान लोकांचे हे सगळं पाहून आपल्याही आयुष्यात असं काही घडलं तर त्यातून पॉजिटीव्ह पाहून त्यावर काम करावे. न जाणो त्यातून वेगळं काहीतरी सापडेल जे पूर्ण जगाला जाऊ द्या पण किमान तुमच्या जवळच्या चार लोकांना वेगळा प्रकाश मिळाला तरी खूप झालं न ! 

शिवाय ते “रिरूट” बद्दल पण लक्षात ठेवा. नकळत आपण रस्ता चुकलो तर न रागावता पुन्हा तुम्हाला “रिरूट” करत ती गुगलवाली बाई जसे मूळ उद्देशाकडे नेते तसेच आपण कधी नकळत आपला रस्ता (म्हणजेच ध्येय) भटकलो तर चिडू नका. रागावू नका. शांतपणे पुन्हा “रिरूट” करून ध्येयापर्यंत कसे जाता येईल ते पहा! 

खूप फरक पडेल जगण्यात हो ! (आणि कधीकाळी चुकून बायको रागावलीच तर जास्त हर्ट करून घेऊ नका. कदाचित तुमच्या हातून छान काहीतरी घडावं म्हणून ती तसे बोलली असेल असं समजून पुढं सरका…. कामाला लागा) @ DD

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments