डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.‘ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

 

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं.

कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते. जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले. किंचाळत, डान्स करत, रडत, हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही. ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत. पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न, साधं व्यक्तिमत्त्व. डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो.

नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. तीन लाख वीस हजार जिंकून, बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला.

ब्रेकनंतर अमिताभ बोलू लागले… चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न… ए रहा प्रश्न… इतक्यात नीरजजी म्हणाले… सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे, तीन लाईफ लाईन जीवित असताना. करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का? विचारलं… आज तक ऐसा कभी हुआ नहीं..

नीरजजी शांतपणे म्हणाले… माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत. मला वाटतं जो प्राप्त है पर्याप्त है. अधिक की आशा नहीं है.

अमिताभ बच्चन अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली. एक सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अमिताभ म्हणाले… खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.

खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. मनातून मी त्यांना नमस्कार केला.

आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही. कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, ननाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.

त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली… तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो…

मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे. खून खराबा होताना आपण पाहतो. स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र. परंतु हे उदाहरण अपवाद आहे.

देव माणसात असतो. ते नीरजजी सारख्या दु ऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात. मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे.

गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी. स्वार्थाचा त्याग करावा. सर्व सुखी होतील. हा धडा शिकायला मिळाला. मला नेहमीच अशा. व्यक्तींविषयी आदर वाटतो व लिहावं वाटतं.

लेखिका : सौ. रेखा जेगरकल

दापोली.

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments