इंद्रधनुष्य
☆ अर्धा ग्लास ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
हॉटेलमध्ये वेटरकडून किंवा इतर ठिकाणी कुणाकडूनही पिण्यासाठी पाणी घेताना कृपया फक्त दोन शब्द म्हणा..‘ अर्धा ग्लास ‘– कारण आपले दोन शब्द कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात .
खरं वाटत नाही आहे ना– मग हा संदेश नक्की पूर्ण वाचा .
आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलेलो. विषय अर्थातच पाण्याचा होता. गप्पा चालू होत्या. विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक गोष्ट पहात होतो– अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…
आमच्याही टेबलवर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे—
मनाला काहीतरी खटकत होतं.
मीटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेलमध्ये गेलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा जो मॅनेजर होता त्याला भेटलो.
म्हटलं, “ हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्धे ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं ? “
तो म्हटला, “ ज्या वेटरने टेबल क्लिअर केलं असेल, त्याने ते पाणी बेसिनमधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.! “
“ विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील? ‘ मी विचारलं
“ नाही म्हटलं तरी १५ ते 20 जण सरासरी– दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.” त्याने सांगितलं .
मग मी त्याला म्हटलं, “ म्हणजे १0 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं, तर साधारण सरासरी २५० जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार ! म्हणजे सरासरी रोज ३५० जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं, तर अंदाजे १00 लिटर पाणी बेसिनमधे “रोज वाया”. म्हणजे एक हॉटेल कमीतकमी १00 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेजमधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं. “
पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून ६000 च्या वर हॉटेल्स आहेत– म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर– म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला हे झालं एका दिवसाचं. असं आठवड्याचं म्हटलं तर ४2 लाख लिटर, अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय.
या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.
हे झालं एका शहराचं– अशी महाराष्ट्रात कमीत कमी १५ मोठी शहरं आहेत .
बरं हे कोणत्या देशात घडतंय??—तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार दर ४ तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरियासारख्या रोगाने मरतोय, त्या देशात.
म्हणजे एकीकडे लोक पाण्यावाचून तडपून मरतायत. अन दुसरीकडे एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.
आपण जे वाया घालवतोय, ते शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे— ” उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय “…
हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी…..
इथून पुढं कधीही वेटर वा इतर कोणीही तुमच्यासमोर ग्लासमधे पाणी ओतत असेल, तर त्याला फक्त एवढंच म्हणा —–’ अर्धा ग्लास !! ‘
ह्याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल. हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”
हे वाचलेले पाणी शेतकऱ्याला वा पाण्याअभावी मृत्यु पावणाऱ्या लोकांना मिळेल.
याची सुरुवात आपण फक्त दोन शब्द बोलायची सवय लावून करायची आहे.
फार छोटी गोष्ट, पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात. कृपया आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी … आपल्याच माणसांचे प्राण वाचवण्यासाठी…!!
( हाच उपाय आपण घरीपण करूया )
संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈