सौ. उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
(आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.) इथून पुढे —-
आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी अण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले, की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना, त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळूहळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून अण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात अण्णांना नेमके काय हवे, कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, अण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.
वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा अण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता अण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात अण्णांची बोलण्याची, लिहिण्याची, घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.
प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं, हाही अण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळूहळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं, पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. अण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वासवानी यांच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी ‘ मानवतेचा दीपस्तंभ ‘ या दोन भागात केले. या सार्या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.
उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, अण्णांना लेखनात मदत करत राहिली. अण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. अण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर अण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली, कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या १९८९ च्या जुलैमध्ये कालवश झाल्या.
वहिनी गेल्या. नंतर अण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरीनिमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. अण्णांचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून, मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने अण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. अण्णांची आई बनून तिने त्यांना जेवू घातले.
वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. अण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी, आई-वडील, भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्यांची ख्याली-खुशाली विचारून, घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी अण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. अण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’ आण्णा म्हणायचे, म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, ‘ मग तुमचं कोण करणार? ‘ ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’ पण ती म्हणायची, ‘ मी वहिनींना वचन दिलय, शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार !’
उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनंद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. अण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् ती देखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.
आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’ म्हणायचा. पण अण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलंय.. देहदान केलंय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु, जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं, हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती, त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरु-ऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात, त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर, आई-वडील, भाऊ, मुलगा या सार्यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता अण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. त्या `ऋणानुबांधाच्या गाठी ‘ होत्या हेच खरं !
– समाप्त –
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈