सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वैय्याकरणी यास्मिन शेख ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
“भाषेला धर्म नसतो. भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जीवापाड, नितांत प्रेम आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रात जन्मलेल्या, वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाची आहे. ” हे शब्द आहेत जन्माने ज्यू, लग्नाने मुसलमान, तरी मराठी भाषेवर नितांत प्रेम असणाऱ्या यास्मिन शेख यांचे! नितळ गोरा रंग, मृदू स्वभाव, स्वच्छ सुंदर मराठी शब्दोच्चार, नखशिखांत महाराष्ट्रीयन संस्कृतीशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्त्व!
त्यांचे मूळ नाव जेरूशा रूबेन. त्यांचे वडील जॉन रूबेन हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला होते. त्यांच्यासारख्या बदल्या व्हायच्या पण त्या महाराष्ट्रातच झाल्या. त्यांचे नाशिकला स्वतःचे घर होते. त्यांची मुलगी, जेरुशा रूबेन, कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला आल्या व परशुराम महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने बी. ए. उत्तीर्ण झाल्या. त्यांना एम. ए. साठी फेलोशिप मिळाली पण तब्येतीच्या तक्रारीमुळे त्या नाशिकला परत गेल्या. तेथे वसंत कानेटकरांची ओळख झाली. त्यांनी अगदी एम. ए. च्या अभ्यासासाठी कोणती पुस्तके हवी हे सांगण्यापासून त्यांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन केले. कानेटकरांच्या मुळे परिचित झालेल्या एका तडफदार देखण्या पुरुषाशी मैत्री झाली व तिचे रूपांतर विवाहात झाले. आणि त्या यास्मिन शेख झाल्या. हा प्रवास तसा सोपा नव्हता कारण हिंदू -मुस्लिम पेक्षा ज्यू -मुस्लिम हा भेद भयावह होता. दोन्ही कुटुंबे सुधारक विचारांची, उदारमतवादी, सुशिक्षित असल्यामुळे दोघांच्या घरातून विरोध नव्हता. जेरुशाला धर्मांतरासाठी कोणीही आग्रह धरला नाही त्यामुळे त्या ज्यूच राहिल्या.
एम. ए. नंतर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात काही वर्षे अध्यापनाचे कार्य केले. पुढे 28 वर्षे सायन येथे S. I. S. महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. श्री. पु. भागवतानी प्रभावी अध्यापन करावयाचे असेल तर आधुनिक भाषाशास्त्र शिकण्याचा सल्ला दिला तो त्यांनी लगेच मान्य करून डेक्कन कॉलेजमधल्या या विषयासाठी प्रवेश घेतला. मराठी साहित्यातील सौंदर्याबद्दल, शुद्धतेबद्दल बोलणाऱ्या श्री. म. माटे यांच्या त्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या. कदाचित त्यामुळेच त्यांना मराठी व्याकरणात गोडी निर्माण झाली. भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची दृष्टी लाभली. त्याबरोबर त्यांना ‘ मौज ‘ च्या श्री. पु. भागवत यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. भानू काळे संपादक असणाऱ्या ‘ अंतर्नाद ‘ या मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी पंधरा वर्षे काम केले. मुंबई येथील नियतकालिकातून वर्तमानपत्रातून ‘भाषा सूत्र ‘ हे मराठी भाषेच्या भाषेतील त्रुटींवर सदर चालवले. बालभारतीच्या मराठी पुस्तकाचे सात वर्षे संपादन केले. एस. आर. एस. महाविद्यालयात सहा वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले. निवृत्तीनंतरही दहा वर्षे त्या आयएएस च्या विद्यार्थ्यांना शिकवीत होत्या. दरम्यानच्या काळात ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्द लेखन कोश’ अशा दोन ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना डॉक्टर अशोक केळकर ‘भाषा अभ्यासक’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल जो समारंभ झाला त्यावेळी ज्येष्ठ लेखक व संपादक भानू काळे यांनी त्यांच्यावरील ‘ यास्मिन शेख – मूर्तिमंत मराठी प्रेम ‘ या गौरव ग्रंथाचे संपादन केले आहे. उत्तुंग व दिव्य व्यक्तिमत्व लाभलेल्या, परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्या, निर्मळपणा, शिस्त, बुद्धिमत्ता, परिश्रम करण्याची ताकद असणाऱ्या यास्मिन यांनी स्वतःच्या विकासाबरोबरच अनेकांना सावली दिली.
यास्मिन यांनी आपले सारे जीवन व्याकरणातील सौंदर्य शोधण्यासाठी खर्ची घातले. काही लोकांना व्याकरण आणि सौंदर्य हे दोन शब्द एकत्र येणं म्हणजे वदतोव्याघात वाटेल, पण हेच कदाचित या लोकांचं वेगळेपण असेल. बोलताना इतर भाषेतील शब्द वापरण्यावर त्यांचा आक्षेप आहे. जितक्या सहजतेने आपण इतर भाषेतील शब्द वापरतो तितकी सहजता आपल्याच भाषेतील शब्द वापरताना का येत नाही? हा त्यांचा प्रश्न असतो. गेली 75 वर्षे व्याकरण हाच ध्यास घेणाऱ्या शेख वयाच्या 90 नंतरही तेवढ्याच उमेदीने मराठी भाषेवर काम करताना दिसतात. त्यांच्या मते भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आज लोकांनी जे कष्ट घेतले त्यापेक्षा कणभर जास्त कष्ट यास्मिन यांनी घेतले आहेत. त्यांनी आयुष्यभर मराठीच्याच अभिजाततेची कास धरली आणि तेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. मराठी प्राचीन भाषा आहे याचे पुरावे ही मिळाले आहेत. त्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा. असे त्या आवर्जून सांगत. योगायोग पहा, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच ‘ याची देही याची डोळा ‘ त्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे प्रत्यक्ष पाहता आले. केवढा आनंद झाला असेल त्यांना!!
यास्मिन शेख म्हणतात, मातृभाषा सहजपणे बोलता येणे आणि ती व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध असणे या गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी मराठी भाषा बोलली जाते. म्हणजेच प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या तरी औपचारिक लेखनासाठी जी भाषा वापरली जाते ती प्रमाणभाषा सर्वांनी वापरली पाहिजे. बोलीभाषा व प्रमाणभाषा यात वाद असू नये. ललित साहित्यात बोलीभाषा महत्त्वाची कारण बोलीभाषेमुळे लेखनात सच्चेपणा किंवा जिवंतपणा येतो. वैचारिक, औपचारिक लेखनात प्रमाणभाषा यायला हवी. त्यामुळे लेखन बहुश्रुत, बहुज्ञात होते आणि त्यामुळे भाषा समृद्ध होते. भाषा बोलताना तिचे सौंदर्य व सौष्ठव याचे भान असले पाहिजे असे म्हणणारे व मराठी भाषेच्या अस्मितेवर, तिचे व्याकरण, यावर अखंड विवेचन करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा वारसा घेऊन यास्मिन शेख यांची वाटचाल झाली. त्या म्हणतात आपण कोणत्या धर्मात जातीत जन्म घेणार हे माहीत नसते. व ते आपल्या हातातही नसते. आपण माणसे आहोत. त्यामुळे माणुसकी हाच आपला धर्म असला पाहिजे.
जेरुशा यांचा जन्म 21 जून 1925 चा! त्याबद्दलची एक गमतीदार आठवण त्या सांगतात. एक दिवस त्या गणवेश न घालता शाळेत गेल्या होत्या. वर्गशिक्षिका त्यांना खूप रागवल्या. पण जेरुशा गप्पच. काहीच बोलली नाही. शेवटी तिची मैत्रीण म्हणाली, की बाई आज तिचा वाढदिवस आहे म्हणून तिने गणवेश घातला नाही. तेव्हा शिक्षिका म्हणाल्या आज 21 जून, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. या दिवशी तुझा जन्म झाला म्हणजे पुढे तू खूप मोठी होणार आहेस आणि खरोखरीच जेरुशा शतायू झाल्याच पण कर्तुत्वाने, मानानेही मोठया झाल्या. आणि वर्गशिक्षिकांचे शब्द खरे ठरले.
शंभरीतही स्मरणशक्ती मजबूत, नवं काही करण्याचा उत्साह, स्वतःच्या हाताने कागदावर लेखन करण्यात आनंद, असणाऱ्या, वैय्याकरणी म्हणू की वैय्याकरण योगिनी म्हणू, यास्मिन शेख यांना आज म्हणावेसे वाटते “तुमच्या या अभ्यासू वृत्तीला वयाचे ग्रहण कधीच लागू नये, असे निरामय दीर्घायुष्य लाभू दे. “
जेरुशा भारतीय कशा झाल्या, याचा थोडा इतिहास. ज्यू लोक मुळातच बुद्धिमान. जसे कार्ल मार्क्स, आईन्स्टाईन, फ्रॉइड हे शास्त्रज्ञ, फेसबुक व्हाट्सअप चे झुकरबर्ग, गुगलचे समी ब्रिन हे उद्योजक, स्टीव्हन्स स्पिलबर्ग हा सिने दिग्दर्शक, थॉमस फ्रीडमन हा पत्रकार, बॉब डीलन हा गायक ही सगळी नावे ज्यू समाजातील प्रतिभावान लोकांमधील काही प्रसिद्ध व्यक्तींची आहेत. जगाच्या लोकसंख्येत पाव टक्का असलेला हा समाज! पण नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्के आहे. पॅलेस्टाईन व आसपासचा परिसर हे त्यांचे मूळ स्थान. दोन हजार वर्षांपूर्वी पासून सुरू झालेल्या आक्रमणांना तोंड देत देत अखेरीस देशोधडीला लागले. निरनिराळ्या देशात जाऊन हे लोक स्थायिक होऊ लागले. असाच एक गट एका मोडक्या जहाजातून पळून जात असताना जहाज भरकटले व अलिबाग जवळ जहाज आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. बहुतेक सगळे बुडाले. पण असे म्हणतात की त्यातील सात जोडपी नौगाव च्या किनाऱ्यावर कशी तरी पोहोचली. अंगावरच्या वस्त्रानिशी बाहेर पडलेली, जवळ काहीही नाही, अशा अवस्थेत आलेल्या लोकांना कोळी समाजाने आसरा दिला. कालांतराने यांची संख्या वाढत गेली. त्यांनी आपला धर्म जपला पण भाषा रितीरिवाज स्थानिक लोकांचे घेतले. 1948 मध्ये इस्त्राइलच्या निर्मितीनंतर बहुतांश ज्यू लोक परत गेले पण काही आपल्या प्रेमापोटी इथेच राहिले. त्यांच्या मनात भारतीयांबद्दल अपार कृतज्ञता होती. फ्लोरा सॅम्युअल लिहितात, “मी साऱ्या जगाला सांगू इच्छितो की भारत हा जगातील एकमेव देश असा आहे की जिथे आम्हा ज्यूंचा धार्मिक कारणावरून कधी छळ झाला नाही. ” भारतीयांच्या सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव या गुणांची आणखी काय पावती हवी!!
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈