श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “संविधान निर्मितीचा इतिहास – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆
(संविधान दिनाच्या निमित्ताने )
- A) भारतीय राज्यघटना तयार करताना असलेल्या समित्या एकंदर २२ समित्या होत्या. त्यापैकी प्रमुख समित्या खालीलप्रमाणे
१)संचलन, कार्यपद्धती, वित्त, स्टाफ आणि राष्टरध्वज या पाच समित्यांचे अध्यक्ष होते राजेंद्रप्रसाद.
२)संघराज्य, संविधान या समित्यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू.
३) प्रांतिक संविधान, अल्पसंख्याक व अनुसूचित जातीजमाती या समित्यांचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल.
४)मूलभूत अधिकार या समितीचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी.
५) मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर.
- B) राज्यघटना तयार करताना खालील देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून काही गोष्टी घेण्यात आल्या.
- इंग्लंडमधील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१)पार्लमेंटरी पद्धत
२)एकल नागरिकत्व
३)कायद्याचे राज्य
४)कायदे तयार करण्याची प्रक्रिया
- अमेरिकेतील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) फेडरल स्ट्रक्चर
२) न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य
३)पार्लमेंट, न्यायसंस्था व सरकार यांचे स्वतंत्र अधिकार
४)तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख राष्ट्रपती
- ऑस्ट्रेलियातील घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
राज्यात व देशात व्यापाराचे स्वातंत्र्य
- फ्रेंच घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
स्वतंत्र्य समता व बंधुत्व
- कॅनडाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) मजबूत केंद्र सरकार
२) केंद्र व राज्य यांच्या आधिकाराची विभागणी
- रशियाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी…
१) नियोजन मंडळ व पंचवार्षिक योजना
- C) संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या. प्रत्येक समितीस काही कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता.
“मसुदा समिती” ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते. मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते. त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद आहे.
मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णम्माचारी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले त्यांचीही जागा भरली गेलीच नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की, संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्वपूर्ण कार्य नि:संशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. “
समितीतील प्रत्येक सदस्याचे कार्य महत्वाचे आहेच. ते नाकारता येणार नाही. परंतु सर्व सदस्यांनीच आंबेडकराना घटनेचे सर्वात जास्त श्रेय दिले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकराना घटनेचे शिल्पकार म्हणण्यात काहीही वावगे नाही.
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले, “या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे. ”
(संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, पृष्ठ क्र. १०, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासन)
☘️☘️
© जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈