सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

१८६५ मध्ये एक ब्रिटिश सैन्यातील डॉक्टर मरण पावला. तसं पाहिलं तर त्याच्या मृत्यूबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नव्हतं. त्याला खूप जुलाब झाले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. तरी देखील तो वाचू शकला नाही. अजूनही ओ. आर. एस. किंवा अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता. जुलाब झाल्यामुळे मृत्यू येणे, हे सर्वसामान्य होतं. या डॉक्टरच्या मरण्याचं कुणाला काही फारसं वाटलंही नाही. पण… पण… पण काय? 

जेम्स मिरांडा बॅरी (१७८९-१८६५) सैन्यातील एक उच्च पदावर असणारा तो डॉक्टर ब्रिगेडियरच्या हुद्द्यापर्यंत पोहोचला. जेम्सचे वडील जेरेमिया व आई मेरी ॲन बर्कली (barkali).. यांचं ‘जेम्स’ हे दुसरं अपत्य. १७८९ मध्ये ते आयर्लंडमध्ये राहत होते. वडिलांचं किराणाचं दुकान होतं. तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. वडील जेरेमिया खूप खर्चिक स्वभावाचे ! “बचत” या शब्दाशी त्यांचं काही नातं नव्हतं. त्यामुळे ते लवकरच कर्जबाजारी झाले. उधारी देणे अशक्य होऊन बसल्याने कुटुंबासमवेत डब्लिन येथील मार्शल सिया इथे स्थायिक झाले. इथेही त्यांची सुटका झाली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्यादाखल त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यामुळे आई व मुलं लंडनला आली. जेम्स बॅरी चांगला कलाकार होता. हे छोटं मूल आपल्या मामाच्या सहवासात इतकं रमलं की, त्याच्या मित्रांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यापैकी फ्रान्सिस्को द मिरांडा व डॉक्टर एडवर्ड फ्रेयर हे खूप जवळचे झाले. एडवर्ड फ्रेयर यांनी जेम्सच्या शेवटच्या दिवसात खूप सेवा केली व त्याच्यावर एक पुस्तकही प्रकाशित केलं. मिरांडा व फ्रेयर इतके जवळचे झाले की या दोघांनी मिळून जेम्सच्या शिक्षणाचा खर्च केला. मामाच्या मृत्यूनंतर त्याची सगळी प्रॉपर्टी या मुलाच्या नावाने झाली. त्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेणे सहज शक्य झाले.

३० नोव्हेंबर १८०९ मध्ये ‘लॅडीस स्माक’ जहाजामधून लंडनहून ”विश्वविद्यालया”मध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाला जेम्स मिरांडा बॅरी.

वैद्यकीय कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून जेम्स बॅरी ओळखला जाऊ लागला. नापास हे लेबल कुठेही न लागता वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षापर्यंत आला. त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ नये, वयाने लहानसर दिसतो या कारणाने त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ‘थोडा मोठा होऊ दे, थोडी वर्षे जाऊ दे’, असा निर्णायक मंडळांनी आदेश दिला. तरी जेम्स बॅरीने हार मानली नाही. त्याची इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिन जो श्रीमंत, नावाजलेली व्यक्ती म्हणून ओळखला जायचा, त्याची जेम्सने भेट घेतली. मंत्रिमंडळाशी बोलणी करून त्यांना जेम्सचं म्हणणं पटवून दिल्याने जेम्सला शेवटच्या वर्षाला बसण्याची परवानगी मिळाली.

अशा तऱ्हेने १८१२ मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन जेम्स बॅरीला डॉक्टरची पदवी मिळाली. लगेचच म्हणजे १८१३ मध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये ‘हॉस्पिटल असिस्टंट’ म्हणून रुजू झाला. अवघ्या दोनच वर्षांत म्हणजे १८१५ मध्ये जेम्स ‘असिस्टंट स्टाफ सर्जन’ म्हणून रुजू झाला. त्याची कुशाग्र बुद्धी, कामातील तत्परता व डॉक्टरी पेशातील ज्ञान त्याला इथवर आणू शकलं. मिलिटरी भाषेत हे ‘लेफ्टनंट’च्या हुद्द्यावर असल्याप्रमाणे होतं.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिनकडून एक पत्र घेऊन केप टाऊनला १८१६ मध्ये आला. केप टाऊनचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री सॉमरसेट यांची त्याने भेट घेतली. योगायोगाने त्याच वेळी गव्हर्नरच्या मुलीची तब्येत बिघडली होती. जेम्सने इलाज करून तिला अगदी ठणठणीत बरी केली. त्यामुळे जेम्स गव्हर्नरच्या मर्जीतला बनला आणि त्यांच्या घरातील एका सदस्यासारखा तिथेच राहू लागला. गव्हर्नर व जेम्सच्या नात्यासंबंधी काहीबाही बोललं जाऊ लागलं. ‘होमोसेक्शुअल संबंध असावेत’, अशीही कुजबूज सुरू झाली. १८२२ मध्ये गव्हर्नरने ‘कलोनियल मेडिकल इन्स्पेक्टर’च्या पदावर नियुक्ती केली. त्याच्याबाबतीत ही खूपच मोठी उडी होती. त्याच्या कामामुळे सर्वत्र जेम्सचा गवगवा होऊ लागला. पैसा व प्रतिष्ठा त्याच्या दाराशी लोळण घेत होते.

१८२६ मध्ये त्याला नावलौकिक मिळण्यासाठी आणखीन एक घटना घडली. एक गरोदर बाई पोट खूप दुखू लागल्याने जेम्सकडे आली. नॉर्मल डिलिव्हरी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे जेम्सने सिझेरियन करून बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आई व बाळ सुखरूप होते. ही दक्षिण आफ्रिकेतील पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया होती. त्यामुळे बाळाचं नाव “जेम्स बॅरी मुनिक” असं ठेवलं. पुढील काही वर्षांत ‘जेम्स बॅरी मुनिक हेरटजोर्ग’ नावाचा पंतप्रधान झाला. एवढं “जेम्स बॅरी” हे नाव प्रसिद्धीला आलं.

केप टाऊन शहरात जेम्स आपल्या क्रांतिकारी कामामुळेही प्रसिद्ध झाला. मानवी हक्कासाठी लढणे हा त्याचा स्वभाव. आरोग्याविषयी सगळीकडे भाषण देत असे. त्याची अंमलबजावणी होते ना, याकडेही त्याचं लक्ष असे. केप टाऊनमध्ये बनावट डॉक्टर, नकली औषधे पुरवून लोकांना लुबाडत. जेम्स बॅरीने गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री यांना त्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विनंती केली. हा अन्याय जेम्सला सहन होत नसे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी त्याने बरेच उपक्रम हाती घेतले.

त्याकाळी जेलमध्ये कैद्यांच्या बरोबर कुष्ठरोगीही होते. त्यांना स्वतंत्रपणे खोली देण्यात आली. स्वच्छता पाळण्यासाठी नियम घालून दिले. समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळण्याची व्यवस्था केली.

भांडण, हातापायी, मारामारी करावी लागल्यास कधी माघार घेत नसे. त्याच्या अशा वागण्याने फ्लोरेन्स नाइटिंगेलपासून बऱ्याचजणांना हा “भांडखोर जेम्स” म्हणून आवडत नव्हता.

जेम्स याने जमैका, सेंट हेलीना, वेस्टइंडीज, माल्टा इत्यादी ठिकाणी काम केले. १८५७ मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे त्याची ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री हॉस्पिटल’ या हुद्यावर नियुक्ती झाली. १८५९ मध्ये जेम्स बॅरीची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला आपल्या मायदेशी लंडनला परतावं लागलं.

१८६५ मध्ये जुलाब खूप झाल्याने तो मरण पावला. त्याने आपल्या मृत्युपत्रात पूर्वीच लिहून ठेवलं होतं – ‘आपण परिधान केलेल्या कपड्यासहितच आपले शवसंस्कार करावेत. ‘ पण मृत्युपत्र वेळेवर न मिळाल्याने त्याला नग्नावस्थेत आंघोळ घालावी लागली. त्यावेळी अशीच प्रथा होती. अंघोळ घालण्याकरिता जेव्हा विवस्त्र करण्यात आलं, तेव्हा कुणाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. जेम्स बॅरी हा पुरुष नसून “मार्गरेट ॲन बर्कली” ही स्त्री आहे, हे जगजाहीर झालं. नाही तर हे गूढ – गूढच राहिलं असतं व तिच्याबरोबरच दफन केलं गेलं असतं. जेम्स हा पुरुष नसून स्त्रीच आहे, यावर बऱ्याचजणांना आश्चर्य वाटलं. काहींचा विश्वास बसत नव्हता. तर काहीजण ‘आपल्याला तो पुरुष नसावा’, असा संशय येत होता, अशी कुजबूज सुरू झाली.

या घटनेमुळे फक्त डॉक्टरच नव्हे, तर पूर्ण ब्रिटिश साम्राज्यच हादरलं. त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटनचा प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकन्सने “ए मिस्ट्री स्टील” नावाची कादंबरी लिहिली. बॅरीबद्दल अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. “द स्ट्रेंज स्टोरी ऑफ जेम्स बॅरी” लेखिका – ‘इझाबेल रे’.

 तसंच एक नाटकही रंगमंचावर आलं. डिकन्सच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स बॅरीची कथा गूढ व कुतूहलपूर्ण आहे.

मार्गरेट ॲन बर्कली, आता ‘जेम्स बॅरी’ या नावाने ओळखू जाऊ लागला. तिने आपली केशभूषा, वेशभूषा बदलली. स्तन दिसू नयेत म्हणून मफलरने घट्ट बांधून घेतले. खांदे रुंद दिसण्यासाठी त्याला शोभेसा वेष परिधान केला. गळा दिसू नये म्हणून तो झाकण्यासाठी कोट घालू लागली. भाषा राकट व आवाजात जरबीपणा आणला. उंची कमी असल्याने उंच टाचेचे बूट वापरू लागली. एवढं सगळं करूनही दाढी मिशा नसल्याने चेहऱ्यावरचा नाजूकपणा उठून दिसायचा. आपल्या आवाजात जरब, कर्कशपणा व वागण्यात बेफिकीरपणा आणला. हालचाल, चालणं, बोलणं सगळं पुरुषी दिसण्याकडे ती प्रयत्नशील राहिली.

अशा तऱ्हेने मार्गारेटला ‘जेम्स बॅरी’ म्हणून “पुरुष” होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारणही तसंच होतं. त्या काळी स्त्रियांना डॉक्टर होण्यास अनुमती मिळत नव्हती. स्त्रियांना दुसरा दर्जा मिळायचा. स्त्रिया पुरुषांएवढ्या हुशार नसतात. त्यांची कार्यक्षमता पुरुषांएवढी नसते, असा समज होता. स्त्रिया म्हणजे फक्त मुलांना जन्म द्यायचं साधन. त्यांना शिक्षण कशाला हवं? – असाच सर्वत्र समज होता. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत डॉक्टरचे शिक्षण घेणे स्वप्नवतच. ‘डॉक्टर होऊन दाखवेनच’ ही तिची प्रबळ इच्छा तिला स्वस्थ बसू देईना. त्यासाठी तिने पुरुषी वेश, आवाज, चालणं, बोलणं इत्यादीमध्ये बदल करण्याचं ठरवलं व ती सगळीकडे ‘पुरुष’ म्हणूनच वावरू लागली.

अधिकृत दाखल्याप्रमाणे ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ गॅरेट अँडरसन (१८३६-१९१७) १८६५ मध्ये वैद्यकीय परीक्षा पास झाली. पण हिला पदवी मिळाली त्याच वर्षी जेम्स बॅरीच निधन झालं. यावरून हे सिद्ध होतं की, ‘जेम्स बॅरी उर्फ मार्गारेट’ ही ‘ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर’ असं म्हणता येईल.

अशी ही ब्रिटनची आगळीवेगळी अचंबित करणारी सत्य घटना तिच्या मरणोत्तर उघडकीस आली. “तो” नव्हे, तर “ती” होती “मार्गरेट ॲन बर्कली”.

मूळ लेखक: डॉक्टर ना. सोमेश्वर 

अनुवाद: मंगल पटवर्धन 

(विश्ववाणी कन्नड पेपर)

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments