श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “जठराग्नीत उजळलेलं सोनं !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
… अर्थात भुकेलाही खाऊन उरलेली माणसं !
क्षुधा हा संस्कृत शब्द..आणि भूख बहुदा जर्मन भाषेतून जगभर पसरलेला शब्द…आपल्याकडे भूक अर्थात या शब्दाच्या आधीपासूनच जगात भूक आहेच..सर्वव्यापी! भुकेचा आणि पोटाचा संबंध असणं स्वाभाविक आणि त्यामुळे भुकेल्या पोटी,अर्धपोटी राहिलेल्या लोकांचाही इतिहास असणं स्वाभाविक.
भुकेपोटी भीकेला लागलेली माणसं,जठराग्नी शांत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी जगाने पाहिलीत तशी भुकेला खाऊन राहिलेली माणसंही पाहिलीत…ती संख्येने अगदी थोडी असली तरी!
खरं तर जगात अन्नाची कमतरता कधीच नव्हती. कमतरता होती आणि आहे ती अन्नाच्या समान वितरणाची. कुणाचं ताट शिगोशीग भरलेलं तर कुणाचं ताट निरभ्र आकाशासारखं…रितं! माणसं दैव नावाच्या कुंभाराने घडवलेलेल्या मडक्यांसारखी.. कुणाच्या मुखी लोणी तर कुणा मुखी अंगार पडतो.
देवाला जगात यापुढे अवतार घ्यावा लागला तर तो भाकरीच्या रुपात घ्यावा लागेल,असं म्हणतात. ज्यांची पोटं भरलेली आहेत आणि ज्यांची रिकामी आहेत…हे दोन्ही गट देवाने अवतार घेण्याची वाट पाहताना दिसतात!
गानकलेच्या क्षेत्रात अत्युच्च शिखरावर चिरंजीव विराजमान झालेली स्वरांची अपत्ये म्हणजे दीनानाथ आणि माई मंगेशकर यांची पंचरत्ने. त्यांनी, विशेषत: लतादीदी आणि आशाताई या दोघींनी मिळून तर दोन्ही ध्रुव आपल्या आवाजाच्या कवेत घेतले. हृदयनाथ,लता,आशा,उषा आणि मीना यांचे यश देदीप्यमान आहेच. पण त्यापेक्षाही त्यांनी भुकेशी दिलेला लढा असामान्य असाच म्हणावा लागेल. या संघर्षातून त्यांची व्यक्तिमत्वे घडली….अनेक कंगोरे असलेली. ज्याने भूक अनुभवली त्याच्या जीवनात तो अनुभव कदापि विसरता न येणारा असतो. किंबहुना पानात पंचपक्वान्ने वाढलेली असताना, त्यांच्या जिव्हाग्री त्यांनी उपवासनंतर चाखलेला पहिला घास नांदत असतो….आणि तो भरवणारा हातही!
दैनिक सकाळ सप्तरंग पुरवणीत गेले काही महिने रविवारी पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महान इतिहास शब्दबद्ध करून ठेवत आहेत….त्यांचे हे कार्य सिद्धीस जावो,ही माता सरस्वतीचरणी प्रार्थना. आजच्या लेखनात माई,आशा,उषा आणि हृदयनाथ यांनी त्यांच्या खानदेशातील गावातून मुंबईपर्यंत केलेल्या रेल्वे प्रवासाची आठवण लिहिली गेली आहे.
संपूर्ण प्रवासभर सहप्रवासी विविध पदार्थ सेवन करीत असताना प्रचंड भुकेजलेली ही मुलं कुणाकडे हात पसरत नाहीत. पाणी पिऊन भुकेची समजूत काढत काढत उघड्यावर निजतात. किती तरी तासांनी पुढ्यात आलेल्या बिस्किटास आईच्या संमतीशिवाय हात लावत नाहीत. त्यांच्या समोर इतर माणसं जेवून उठत असताना यांच्या चेह-यावर बुभुक्षितपणाची रेषाही उमटत नाही. पहिल्या पंगतीतून काही कारणाने उठावे लागते आणि दुस-या पंगतीत त्यांच्या आईने, माईने दाखवलेला बाणेदारपणा भुकेवर मात करून पंगत सोडून उठतो…आणि ताठ मानेने पुढच्या प्रवासात निघतो!
तिस-या दिवशी हाता तोंडाची गाठ पडायची होती….पण इथे तो हात दैवी होता आणि तोंड बाळाचे होते. माई,आशा,उषा इत्यादी समोर असताना त्यांच्याशी न बोलता दीदी थेट हृदयनाथ यांच्याकडे आल्या आणि त्यांना अन्नाचा घास भरवला….हा पहिला घास अमृताचा न ठरता तरच नवल! जठरात पेटलेल्या अग्नीत हे स्वर-सुवर्णालंकार काळाने घातले ते जाळाव्यास नव्हेत तर उजळावायास…आणि त्यांचा प्रकाश सा-या जगाने अनुभवला आहे!
प्रत्यक्ष हा लेख वाचताना प्रत्येक सहृदय माणसाच्या पोटात कालवाकालव झाल्याशिवाय राहणार नाही..असाच हृदयनाथांनी लिहिलेला अनुभव आहे.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈