सुश्री सुलु साबणेजोशी
इंद्रधनुष्य
☆ “फिदाई हुसैन हवेली / मीना बाजार कोठी” – लेखिका : सुश्री प्रमिला बत्तासे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
(ऐतिहासिक दस्तावेजांप्रमाणे औरंगजेबाने शिवाजीमहाराजांना जिथे कैदेत ठेवले, ते ठिकाण…)
मागील आठवड्यात 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी आग्रा येथे पर्यटनासाठी गेलो होतो. दोन दिवस आधी जयपुर फिरून झाले होते. जयपूरहून निघून आग्र्याला येताना रस्त्यात फतेहपूर सिक्री बघितले. तेथील मुघल बादशाह अकबर यांचा भव्य महाल बघितला. तिथल्या गाईडच्या तोंडून अकबराच्या हिंदू पत्नी जोधाबाई यांच्यासाठी बांधलेला महाल, त्यांच्यासाठीच स्वतंत्र स्वयंपाक घर इत्यादी, इत्यादी बघून झाले. दुसऱ्या दिवशी आग्र्याला आल्यावर प्रथम आग्र्याचा किल्ला बघितला. भरपूर भव्यदिव्य आहे. सोबत गाईड घेतलेला असल्यामुळे बरीच माहिती, छोटे छोटे बारकावे तो सांगत होता. हा किल्ला बघत असतानाच एका सुंदर अशा महालात गाईडने माहिती दिली की इथे औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैदेत ठेवले होते. त्यांच्या आयुष्याची शेवटची आठ वर्षे ते इथेच कैदेत राहिले. तिथून ताजमहालाची भव्य वास्तू स्पष्ट दिसत होती. या ताजमहाला कडे बघत बघतच त्यांच्या कैदेतली वर्षे संपलीत कैदेतच त्यांचा अंत झाला..
अर्थात हा सगळा इतिहास मी दुसऱ्यांदा ऐकत होते. या आधी पाच वर्षांपूर्वी आम्ही गार्डन्स क्लब चे सदस्य हा किल्ला बघून आलो होतो. त्याही वेळी गाईड कडून ही सगळी माहिती ऐकलेली होती. त्यामुळे माझे लक्ष तिकडे जेमतेमच होते.
किल्ला बघून होत आला होता. प्रतीक आणि त्याच्या बाबांची काहीतरी खुसुर- फुसुर गाईड बरोबर चालू होती. सुनील शी बोलताना नंतर कळले की हे दोघेही गाईडला विचारत होते, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले गेले होते ती जागा कोणती? ती आम्हाला बघायची आहे. ( ही गोष्ट खरंतर पाच वर्षांपूर्वीच्या ट्रिपमध्येही आमच्या कुणाच्याही लक्षात आली नव्हती आणि याही वेळी माझ्या लक्षात नव्हतीच).
गाईडने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली होती. किल्ल्यामध्ये तर तशी कुठलीही जागा नव्हती, जिथे त्यांनी शिवाजी महाराज येथे होते असे सांगितले.
शेवटी गुगल बाबा ची मदत घेऊन या दोघांनी गाईडला गुगल वरील लोकेशन दाखवले. ‘शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा’ असे गुगल वर टाकले तेव्हा ह्या किल्ल्यापासून पाच किलोमीटर वरील एक लोकेशन गुगलने दाखवले. गाईडने अर्थातच खांदे उडवले. आमच्याबरोबर येण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण या दोघांच्या मनातली जिज्ञासा संपली नव्हती.
आपण आग्र्यामध्ये दोन दिवस राहायचे, अकबर, जहांगीर यांचे राजवाडे बघायचे, शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाला पुढे नतमस्तक व्हायचे आणि ज्या साम्राज्यामध्ये आमचा मराठी राजा शंभर दिवस कैदेत होता त्या जागेवर, त्या वास्तूमध्ये माथा न टेकता आग्रा सोडायचे हे आमच्या मनाला पटेना. गाईडला निरोप देऊन आम्ही किल्ल्याच्या बाहेर पडलो आणि गुगल लोकेशन नुसार शिवाजी महाराजांच्या कैदेचे ठिकाण शोधायला सुरुवात केली.
भोसले आणि बत्तासे असा सात जणांचा ग्रुप बरोबर असल्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर सारखी एक मोठी गाडी केलेली होती. तीच गाडी घेऊन निघालो. आग्रा शहर एका बाजूला टाकून बाहेरच्या रस्त्याला लागलो. शहरापासून लांब नव्हता, पण शहराच्या बाहेरून जाणारा म्हणजे एखाद्या गावकुसासारखा तो रस्ता होता. लोकेशनच्या साधारण एक किलोमीटर अलीकडे आमची गाडी थांबली. पुढचा रस्ता नीरुंद आणि काटेरी झाडांनी वेढलेला होता. ड्रायव्हरने गाडीवर ओरखडे पडायला नकोत म्हणून पुढे येण्यास नकार दिला.
गाडी तिथेच उभी करून मी, सुनील रश्मी व प्रतीक आम्ही चौघे चालत चालत त्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या एका बाजूला गावकुसा बाहेरची वस्ती जाणवत होती. रस्ता काटेरी तर होताच वर अस्वच्छही खूप होता. पायाखालच्या रस्त्याचे, रस्त्याकडेच्या घाणीचे फार काही वाटतच नव्हते, कारण 400 मीटरच्या अंतरावर आपल्याला हवे ते ठिकाण दिसू लागले होते. शेवटी एका खूप मोठ्या इमारती जवळ आम्ही येऊन थांबलो. भले मोठे लोखंडी गेट बंद होते. आजूबाजूला झाडी वाढलेली होती. ‘राजा जय किशनदास भवन’ असे ह्या इमारतीवर नाव होते. गेट जवळ गेल्यावर एक छोटेसे फाटक नजरेत आले. त्याला कडी होती पण कुलूप नव्हते. कडी काढून सरळ आत घुसलो. आजूबाजूला कुणीही दिसत नव्हते. गेटच्या आत मात्र स्वच्छता होती. हवेली पूर्ण बंद होती पण कोणाचातरी वावर तिथे आजूबाजूला आहे एवढे लक्षात येत होते. कुणाला काही विचारावे असे आजूबाजूला कोणी नजरेतही येईना. इतक्यात शेजारच्या वस्तीतील एक जण आमच्यासमोर आला. ‘क्या चाहिये आपको?’
आम्ही थोडसं चाचरतच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत आणि शिवाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवले होते ती जागा बघण्यासाठी बाहेर पडलो आहोत. गुगलने आम्हाला या जागेवर आणून सोडले आहे, हे सांगताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ‘आप सही जगह पर आये हो’ त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले.
त्या माणसाने जी काही माहिती दिली ती अशी होती – या इमारतीला ‘कोठी मीना बाजार’ किंवा ‘कोठी मीना बाजार हवेली’ असे म्हणतात. शिवाजी महाराजांना अटक करून इथेच नजर कैदेत ठेवले होते. 99 दिवस ते इथे होते आणि शंभरव्या दिवशी ते इथून निसटले.
मुघल राजवटीनंतरच्या काळात कोठी मीना बाजार हवेली ब्रिटिशांच्या ताब्यात होती. ब्रिटिशांनी जेव्हा त्यांची राजधानी आग्र्याहून दिल्लीला हलवली तेव्हा 1857 मधे ही कोठी लिलावात विकली होती. राजा जय किशनदास या व्यक्तीने ती खरेदी केली होती. सध्या राजा जयकिशनदास यांचेही कुणी वारसदार या कोठीमध्ये राहत नाहीत. फक्त त्या कोठीची देखभाल करण्यासाठी एक-दोन कुटुंब आजूबाजूला आहेत. बाकी बऱ्याचशा जागेवर अतिक्रमण पण झालेले आहे. गुगल सर्च वर नंतर बरीच माहिती वाचायला मिळाली. त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने या जागेत शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्याचा घाट घातलेला आहे. त्याला अर्थातच स्थानिक जागा बळकावणाऱ्यांनी विरोधही केलेला आहे आणि हा निर्णय कायद्याच्या आधीन आहे. त्यामुळे ही वास्तू जैसे थे अशी उभी आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. फक्त ब्रिटिशांनी ही वास्तू राजा जय किशन दासला लिलावात दिल्याचा उल्लेख असलेली एक पाटी तिथे बघायला मिळाली. दरवाजे अर्थातच बंद असल्यामुळे आत जाता आले नाही. तिथेच बाहेर उभे राहून शिवाजी महाराजांच्या धैर्याला, धाडसाला आणि शौर्याला आठवत नतमस्तक झालो. डोळे भरून ती वास्तू मनात साठवली आणि परत फिरलो. चार-पाच दिवसांच्या सहलीमधे जयपूरचा हवामहल, अमेर फोर्ट, फत्तेपूर सिक्रीचा अकबराचा किल्ला, आग्र्याचा किल्ला, ताजमहाल हे सगळं बघत फिरत होतो. पण या ट्रिप मध्ये खरे समाधान वाटले ते मीना बाजार कोठीची इमारत बघून.
इथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे आणि आग्र्यात जाणाऱ्या तमाम मराठी माणसाची पाऊले इकडेही आधी वळावीत असे मनोमन वाटले. या मीना बाजार कोठी पर्यंत पोहोचता आले याबाबत खूप समाधान वाटले.
पाच वर्षांपूर्वी आग्रा फिरताना हा इतिहास आपल्याला आठवलाही नव्हता याची खंत सुद्धा वाटली.
असो.
पण या वेळच्या समाधानाचे सगळे क्रेडिट अर्थातच माझ्या इतिहास प्रेमी नवऱ्याला आणि शाळेत शिकलेला सर्व इतिहास तोंडपाठ असणाऱ्या माझ्या प्रतीकला.
लेखिका : सुश्री बत्तासे प्रमिला
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान माहिती मिळाली.