श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

किती प्रगल्भ व्याप्ती आहे ‘भेट’ या शब्दाची !

खरंच, खूपच अर्थपूर्ण.

 

कोण? कुणाला? कुठे? केव्हा?

कशाला? ‘भेटेल’

 

आणि

 

का? ‘भेटणार नाही’

 

ह्याला ‘प्रारब्ध’ म्हणावं लागेल.

 

‘भेट’ ह्या शब्द संकल्पनेविषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन.

 

‘भेट’ कधी ‘थेट’ असते,

कधी ती ‘गळाभेट’ असते,

कधी ‘Meeting’ असते,

कधी नुसतंच ‘Greeting’ असते.

 

‘भेट’ कधी ‘वस्तू’ असते प्रेमाखातर दिलेली.

‘भेट’ कधी ‘देणगी’ असते कृतज्ञापूर्वक स्वीकारलेली.

 

‘भेट’ कधी ‘धमकी’ असते…

‘बाहेर भेट’ म्हणून दटावलेली.

‘भेट’ कधी ‘उपरोधक’ असते…

‘वर भेटू नका’ म्हणून सुनावलेली.

 

‘भेट’ थोरा-मोठ्यांची असते,

इतिहासाच्या पानात मिरवते.

‘भेट’ दोन बाल-मित्रांची असते…

फार वर्षांनी भेटल्यावर,

पिकल्या केसांचा अंदाज घेत चाचपलेली.

 

‘भेट’ कधी अवघडलेली,

‘झक’ मारल्यासारखी.

‘भेट’ कधी मनमोकळी,

मनसोक्त मैफिल रंगवलेली.

 

‘भेट’ कधी गुलदस्त्यातली,

कट-कारस्थान रचण्यासाठी.

‘भेट’ कधी जाहीरपणे,

खुलं आव्हान देण्यासाठी.

 

‘भेट’ कधी पहिली- वहिली

पुढल्याची ओढ वाढवणारी

‘भेट’ कधी अखेरची ठरते.

मनाला चुटपूट लावून जाते.

 

‘भेट’ कधी अपुरी भासते,

… बरंच काही राहून गेल्यासारखी.

‘भेट’ कधी कंटाळवाणी,

घड्याळाकडे पाहून ढकलल्यासारखी.

 

‘भेट’ कधी चुकून घडते,

… पण आयुष्यभर पुरून उरते.

‘भेट’ कधी ‘संधी’ असते,

निसटून पुढे निघून जाते.

 

‘भेट’ कोवळ्या प्रेमिकांची.

लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर.

‘भेट’ घटस्फोटितांचीही असते.

… हक्क सांगण्यासाठी मुलांवर.

 

‘भेट’ एखादी आठवणीतली असते.

मस्त ‘Nostalgic’ करते.

‘भेट’ नकोशी भूतकाळातली.

….. सर्रकन अंगावर काटा आणते.

 

‘भेट’…

विधिलिखीत… काळाशी न टाळता येण्याजोगी !

 

‘भेट’…

कधीतरी आपलीच आपल्याशी.

अंतरातल्या स्वत:शी.

आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.

…… अचानक झालेली अणि न विसरणारी भेट.

… ‘पुन्हा भेटू*.

कवी  : अज्ञात 

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments