सौ. उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.
त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.
सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.
तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.
साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.
(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).
माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.
(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)
लेखक : श्री दिगंबर देशपांडे
संग्राहक : अज्ञात
प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈