श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆
पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की ‘कितीपर्यंत?’ असा पुढचा प्रश्न! ‘पंधरा पर्यंत!!’ असं अभिमानाने सांगितलं की ‘तेराचा म्हणून दाखव पाहू!!’ तो कसाबसा अडखळत संपवला की ‘आता ‘चौदाचा म्हणून दाखव’ असा प्रश्नोपनिषादाचा पाढा चालू होई. कशी तरी सुटका करून घ्यावी लागत असे.
पाढे पाठ करायची एक सुंदर प्रथा का कोण जाणे मागे पडली. ‘बे एके बे’ पासून सुरु होणारे पाढे ‘तीस दाहे तीनशे’ पर्यंत म्हणता येणे ही हुशारीची – पाठांतराची परिसीमा होती. सर्वसाधारण मुलं ‘बारा’पर्यंत तरबेज असत. तेराला पहिली थोडी पडझड व्हायची. चौदा, पंधरा, सोळा हळूहळू का होईना ठीक जायचे. सतरा पासून अजून काही बुरुज ढासळायचे आणि एकोणीसला शरणागतीच्या पांढरे निशाण फडकावले जायचे. वीसला अर्थ नसायचा आणि एकवीसच्या पुढचे पाढे म्हणण्याची हिम्मत करणाऱ्याला लोकोत्तर मुलांमध्ये गणले जातात जात असे.
पण ते काही असो, बाकी सारे गणित विसरले तरी पाढे मात्र आयुष्यभर साथ देतात! ‘आठी साती छप्पन’, ‘बार चोक अठ्ठेचाळ’, ‘पाचा पाचा पंचवीस’ ह्या संथा एखाद्या गाण्याच्या लयीसारख्या मनात कोरल्या गेल्या आहेत. ‘भीमरूपी’ नंतर ‘महारुद्रा’ यावं किंवा ‘सुखकर्ता’ नंतर ‘दुःखहर्ता’ यावं इतक्या सहजतेने ‘चौदा सक’ नंतर ‘चौऱ्यांशी’ येई. मराठी शिकलेल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या चेअरमनच्या तोंडीही ‘अरे, सतरा लाखाला एक मशीन म्हणजे पाच मशीनचे – सतरा पाचा पंच्याऐंशी – म्हणजे एटी फाईव्ह लॅक्स होतील, ’ असा पाढा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
आजकाल इंग्लिश पाढे म्हणतात, पण ‘फोर सिक्स जा ट्वेंटी फोर’ मध्ये ‘चार सक चोवीस’ची सहजता नाही. बाकी जाऊ द्या, पण कमीतकमी पाढे तरी मातृभाषेतच हवेत हे आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, ते आकड्यांची श्लोक आहेत हो! त्यांना तरी इंग्रजीपासून सोडा ना! पूर्वीच्याही पूर्वी पाढे ‘तीस’पर्यंत थांबत नसत. पुढे दिडकी – अडीचकी – औटकी असे. हे म्हणणे डोक्यापेक्षा जिभेसाठी त्रासदायक होते. ‘बे ते दहा’ – छान पायवाट, ‘दहा ते वीस’ – दोनचार खड्डे वाला साधा रस्ता, ‘वीस ते तीस’ – प्रचंड खडबडीत रस्ता आणि दिडकीबिडकी म्हणजे केवळ दगडं अंथरलेला रस्ता, असा तो प्रवास असे.
जर कोणाला स्वतःचं बालपण आठवायचं असेल तर बाकी काही न करता बेशक पाढे म्हणा – बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा… क्षणात पोहोचता की नाही ही बघा बालपणीच्या रम्य दुनियेत!
या लेखावरील प्रतिक्रिया – – –
जुन्या आठवणींना उजाळा देणारा फार सुंदर लेख ! एका लयीत, एका सुरात, एका तालात एखादं समूहगीत म्हटलं जावं, तसंच पाढ्यांचं सुरेल गायन होतं असे. सवयीने, सरावानं, एकुणव्वदासे, त्रियोत्रिदोन, चवरोदरसे, बावनिदोन अशा अवघड शब्दांच्या सुद्धा नेमक्या संख्या कळत असत ! ती पाढ्यांची भाषा होती. तसे उच्चार करायला पण मजा वाटत असे. आताच्या काळांत आकलन, सुलभीकरणासाठी पाढ्यांतल्या संख्याही सरळसोट उच्चारल्या जातात, असं ऐकिवात आहे – नक्की माहित नाही. १ ते ३० पर्यंतचे पाढे आलेच पाहिजेत आणि रोज म्हटलेच पाहीजेत असा दंडकच होता. पुढे पुढे गणित, बीजगणित, भूमिती, क्ष+य, प्रमेय, साधन, सिद्धी, सिद्धता, रायडर्स, सूत्रे, गृहितके असे अनेक विषय विनाकारणच शिकलो असंच म्हणायला पाहिजे, कारण पुढच्या आयुष्यांत त्यांचं नांवही घेण्याची कधी वेळ आली नाही !… पण पाढे हा अपवाद !! ते पाठ असल्याचा फायदा पदोपदी अनुभवाला येतो. आजही फावल्या वेळात आठवतील त्या पाढ्यांचं गुंजन केलं, तर वेळ कसा जातो ते कळतंच नाही !
☆
लेखक : श्री सुनील भातंब्रेकर
लेख प्रस्तुती व प्रतिक्रिया : श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈