श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

कर्नल डॉक्टर साब !

“मर्द गड्यांनो… मी येईपर्यंत दम धारा… श्वास घेत रहा… हिंमत हरू नका! मी पाचच मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचेन… आणि एकदा का माझा तुम्हांला स्पर्श झाला… की मृत्यू तुमच्या जवळपासही येणार नाही… यह जबान है मेरी!”

13, Jammu And Kashmir Rifles चे Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव साहेब जवानांशी, अधिका-यांशी बोलत होते…. वर्ष होते १९९९.

पाकिस्तानने कारगिल पर्वतावरील भारताच्या सैन्यचौक्या घुसखोरी करून ताब्यात घेतल्या होत्या. घुसखोरांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी नियमित सैन्याला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य ठरले होते. अन्यथा भारत मोठ्या संकटात सापडला असता. त्यासाठी 13, Jammu And Kashmir Rifles चे जवान आणि अधिकारी मोहिमेवर निघाले होते.

Commanding Officer आणि त्यावेळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या श्री. योगेश कुमार जोशी साहेबांनी उपस्थित सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य मोठ्या आवेशात लक्षात आणून दिले…. इतिहास के पन्नोपर अपना नाम सोने के अक्षरों में दर्ज कराने का ऐसा मौका न जाने फिर कब मिलेगा? साहेबांनी विचारले! कुणालाही तो मौका गमवायचा नव्हता. मर्दमुकी गाजवायला उत्सुक शेकडो हृदये सज्ज होती…. एकमुखाने जयजयकार झाला… दुर्गा माता की जय!

“किसी को कुछ कहना है?” जोशी साहेबांनी प्रश्न केला. कुणाचा काहीही प्रश्न नव्हता! पण त्या गर्दीतून एक हात वर झाला. “बोलिये, डॉक्टर साहब!” साहेबांनी Regimental Medical Officer Captain डॉक्टर आढाव यांना प्रश्न केला. डॉक्टर साहेब एक वर्षभरापासून या सैन्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा प्रश्न साधारण असा होता…. सैन्य प्रचंड उंचीवर लढाई करणार.. अर्थात काहीजण जखमी होणार… त्यांना खाली आणेपर्यंत खूप वेळ जाणार…. त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण साहजिकच अधिक असणार… अशावेळी डॉक्टर सैनिकांच्या सोबत असला पाहिजे!

जोशी साहेब विचारात पडले…. तोपर्यंत सैन्यासोबत डॉक्टर थेट पहिल्या फळीत जाण्याची पद्धत नव्हती. वैद्यकीय पथक साधारणत: तिस-या फळीत राहून त्यांच्याकडे आणल्या जाणा-या जखमीवर उपचार करीत असते. आणि हे डॉक्टर साहेब तर त्या उंचीवर मी सैन्यासोबत येतो असे म्हणताहेत! ही मागणीच जगावेगळी होती. जोशी साहेबांनी परवानगी दिली!

दुस-या दिवशी पहाटे साडेचार वाजता जोशी साहेब आणि डॉक्टरसाहेबांनी पर्वत चढायला आरंभ केला. दिवसभर चालून चालून डॉक्टरसाहेब थकून गेले होते. सायंकाळचे साडे पाच सहा वाजले असावेत. शेवटी सैनिक, अधिकारी आणि डॉक्टर यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये काही फरक तर असणारच!

तिथल्या एका मोठ्या खडकावर डॉक्टर साहेबांनी बैठक मारली… म्हणाले.. ”साहब… मैं बडा थक गया हूं.. अब इसके आगे नहीं चल सकता!”

यावर साहेब म्हणाले, ”ऐसा नहीं हो सकता. अब बस कुछ सौ मीटर्सही तो चढना है और रात भर रुकना है! मैं आपको ऐसे अकेले छोड के आगे नहीं जा सकता… और ना ही आपको पीछे भेज सकता हूं… !” यावर डॉक्टर साहेब नाईलाजाने उठले… काही पावले चालले असतील… एवढ्यात शत्रूने डागलेला एक बॉम्बगोळा डॉक्टर साहेब ज्या खडकावर बसले होते त्या खडकावर आदळला! मृत्यू डॉक्टर साहेबांच्या अगदी अंगणात येऊन गेला होता! ज्या अर्थी दैवाने आपला जीव वाचवला त्या अर्थी आपल्या हातून पुढे काही मोठे काम होणार आहे… अशी खूणगाठ डॉक्टर साहेबांनी मनाशी बांधली.. आणि ते निर्धाराने पर्वत चढू लागले.

एक दोन दिवसांत एक मोठा हल्ला करून एक शिखर ताब्यात घेण्याचे घाटत होते. त्यासाठी पाहणी करण्यासाठी एक पथक पुढे गेले होते. शत्रू वरून सर्व काही स्पष्ट पाहू शकत होता.. अचूक नेम धरून फायर करीत होता. त्यामुळे दिवसा काहीही हालचाल करणे धोक्याचे होते. म्हणून पाहणी पथक एका आडोशाला लपून छपून पाहणी करीत होते. काही अंतर अलीकडे डॉक्टर साहेब आपल्या साहाय्यकासह थांबलेले होते. एका मोठ्या खडकाआड त्यांनी आपले युद्धाभूमीवरचे इस्पितळ उभारले होते… जे काही उपलब्ध होते त्या साधनांच्या साहाय्याने. त्यांच्यापासून साधारण १०० मीटर्स वर एक खोल नाला होता. तिथे बसलेल्या आपल्या एका जवानाच्या मांडीत शत्रूने फायर केलेली एक गोळी खडकावर आपटून उलट फिरून घुसली होती… आणि तिथून ती पोटाच्या आरपार गेली होती. त्याचा रक्तस्राव त्वरीत थांबवणे गरजेचे होते. त्या सर्च पार्टीकडून डॉक्टरसाहेबांना संदेश आला…. ”किसीको गोली लगी है!

आडोसा सोडून त्या नाल्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे पाकिस्तानी गोळीबाराच्या पावसातून पळत जावे लागणार होते. डॉक्टर साहेब त्यांच्या साहाय्यकाला, Battle Nursing Assistant शिवा यांना म्हणाले.. ”शिवा, क्या करें? तो म्हणाला, ”साब, आपने तो कह रखा हुआ है… पांच मिनट में पहुंचुंगा.. अब जाना तो है ही!” मग दोघे तयार झाले… ते ऐंशी ते शंभर मीटर्स अंतर धावत पार करण्याचे ठरले… हातात मेडिकल कीट घेऊन! आपले सैन्य कवर फायर देणार होते…. म्हणजे पाक्सितानी सैन्याचे लक्ष थोडेसे विचलीत होईल.

बर्फात तयार झालेल्या पायावाटेवरून सरळ पळत गेले तर वरून पाकिस्तानी अचूक नेम साधणार…. मग…. नागमोडी पळायचे ठरले… आणि दोघेही तसेच धावत सुटले… आपल्या सैन्याच्या गोळ्या सुसाट वेगाने या दोघांच्या डोक्यांवरून वर फायर केल्या जात होत्या.. आणि वरून पाकिस्तानी फायर येत होता…. एक गोळी पुरेशी ठरली असती…. पण निम्मे अंतर पार झाले तरी दोघे सुरक्षित होते… साहाय्यक नाल्यापर्यंत पोहोचला…. एवढ्यात त्याच्या मागोमाग धावणारे डॉक्टर साहेब खाली कोसळले… पायांत अडीच अडीच किलोचे बर्फात वापरायचे बूट असताना पळणे सोपे नव्हते… वाटले… आता डॉक्टर दगावले…. पण त्यांना गोळी लागली नव्हती. बुटाची लेस सुटली होती… त्यामुळे ते खाली कोसळले होते…. भारताच्या बाजूने सुरु असलेला कवर फायर थांबवण्यात आला… शत्रूला वाटले… लक्ष्य टिपले गेले.. त्यांनीही फायर थांबवला… एवढ्यात डॉक्टर साहेबांनी निर्धार केला.. एका हाताने बुटाची लेस अगदी घट्ट ओढून तशीच बुटाला गुंडाळली… उठले… आणि वायुवेगाने धावत सुटले…. आणि त्या नाल्यात पोहचले… सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला…. नाल्यात जखमी झालेला जवान डॉक्टर साहेबांच्या त्वरीत उपचाराने बचावला!

अगदी चार दोन दिवसांत मृत्यूने डॉक्टर साहेबांना दिलेली ही दुसरी धावती भेट होती… आता तर डॉक्टरसाहेबांच्या काळजातून भीती हा शब्द कायमचा निघून गेला.

त्या वेळी डॉक्टर साहेब अविवाहित होते. घरी आई-वडील होते. एका जवानाने विचारले… ”साहेब, असे धाडस करताना तुम्हांला आई-वडिलांची चिंता नाही का वाटत?” त्यावर त्यांनी उत्तर दिले… ”आई-वडील तर देव असतात… आपण देवाची चिंता करतो का कधी?”

या लढाईत डॉक्टर साहेबांना अनेक शूर वीरांचा सहवास लाभला… त्यांत सर्वांत संस्मरणीय होते ते Captain विक्रम बात्रा साहेब… शेरशहा! डेअरडेविल… एकदम नीडर, हसतमुख. त्यांना प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी व्हायला हवे असायचे. आणि ती मोहीम झाल्यावर ‘यह दिल मांगे मोअर’ म्हणत शत्रूवर तुटून पडायला हा सिंह तयार!

मोहिमेवर जाण्याआधी या काही अधिकारी-जवानां सोबत एकत्रित छायाचित्र काढले गेले होते… यातील कोण परतेल… कोण परतणार नाही… अशीही चर्चा हास्यविनोद म्हणून झाली होती. यावर डॉक्टर साहेब म्हणाले होते… ”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!

दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

आपल्या सैन्याच्या वीरतेची आणि चतुराईची कल्पना येते आपल्या लेखांमधून!