श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “८ मार्च : स्त्री संघर्षाचा इतिहास !” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भारतात शेतीप्रधान व्यवस्थेमुळे शेकडो वर्षे स्त्रिया शेतात काम करत होत्या. पण ते काम घरचेच काम असल्यामुळे वेठबिगारीसारखे २४ तास चालणारे होते. तसेच अजूनही घरकाम करणाऱ्या गृहिणी असोत की कामकरी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण होतेच आहे. त्यातही एक सूक्ष्म फरक आहेच. गृहिणीला धर्म आणि सामाजिक व्यवस्थेतून हे काम म्हणजे तिच्यावरती असलेली सांस्कृतिक जबाबदारी आहे, असे तिच्या मनात ठसवण्यात आले आहे आणि कष्टकरी स्त्रियांच्या बाबतीत धार्मिक आणि जातीय उतरंड त्यांचे शोषण करण्यास कारणीभूत ठरत आहे. आणखी एक व्यवहारिक फरक आहे… तो म्हणजे, गृहिणीला तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही. पण नवऱ्याच्या पंखाखाली २४ तास सुरक्षितता मिळते. तर कष्टकरी, कामकरी महिलेला मात्र तिचे शोषण होत असले तरी तिच्या कामाचा कमी-जास्त मोबदला मिळतो. पण दोन्ही प्रकारच्या स्त्रियांवर बऱ्याच ठिकाणी अजूनही काळ बदलला तरी पुरुषांची अरेरावी चाललेली असते.
१९व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांतीमुळे स्त्रिया कामगार म्हणून मोठ्या प्रमाणावर कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडू लागल्या होत्या. पण त्या कामाच्या वेळेला धरबंध नव्हता. काम करण्याच्या ठिकाणी प्रचंड गैरसोयी होत्या. कामाचे तास नक्की नव्हते, वेतन अत्यंत कमी होते. त्या विरोधात त्यांनी हळूहळू आवाज उठवायला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी स्त्रिया एकत्र असल्यामुळे त्यांना एकत्रितपणे एकजुटीने संघटित उठाव करणे त्यामुळे शक्य झाले होते.
या उठावाची पहिली ठिणगी पडली ती १८२० मध्ये इंग्लंड-अमेरिकेतील कापड उद्योगात. येथील कामकरी स्त्रियांनी ‘द वुमन्स ट्रेड युनियन’ लीगची स्थापना केली आणि त्या युनियन तर्फे त्यांनी आठ तासाचा कामाचा दिवस, पाळणाघर, कामगारांसाठी घर, प्रजनानावरील स्त्रियांच्या नियंत्रणाचा हक्क, तसेच मतदानाचा हक्क अशा विधायक मागण्या केल्या होत्या. अर्थात सुरुवातीला पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे या सगळ्यांना केराची टोपली दाखवली गेली, हे वेगळे सांगायला नकोच. पण स्त्रियांना आपण एकजुटीने आपल्या मागण्या रेटू शकू याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.
त्यानंतर ८ मार्च १८५७ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील कापड कारखान्यातील स्त्री कामगारांनी कामाच्या तासांमध्ये कपात, वेतनवाढ आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीसाठी आंदोलन केलं. पण पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकलं. तरी स्त्रियांचा संघर्ष सुरूच होता.
त्यामुळे पुढच्या काळात ८ मार्च हा दिवस स्त्रियांच्या एकजुटीमुळे विशेषत्वाने गाजू लागला. कसा ते आपण पाहूया…
१) ८ मार्च १९०८ ला न्यूयॉर्क येथील रुदगर्स चौकात हजारो कामगार स्त्रिया एकत्र जमल्या आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आंदोलन केले.
२) ८ मार्च १९१० मध्ये जर्मनीतील समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन यांनी महिलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर हा दिवस पाळावा असा प्रस्ताव दिला.
३)८ मार्च १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला.
४) ८ मार्च १९१७ रोजी रशियात स्त्री कामगारांनी “भाकरी आणि शांतता” या साठी संप पुकारला.
५) ८ मार्च १९३६ या दिवशी हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रॅंकोच्या हुकूमशाही विरोधात निदर्शने केली.
६) ८ मार्च १९४३ रोजी इटालीतील हजारो स्त्रिया मुसोलिनीच्या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर आल्या. त्याच वेळेस भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात पहिला महिला दिन साजरा झाला.
७) ८ मार्च १९७२ रोजी मथुरा नावाच्या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्काराविरुद्ध देशभर संतप्त मोर्चे निघाले.
८) ८ मार्च १९७४ ला अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंद आवाज उठवला.
९) ८ मार्च १९७५ ला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली.
१०) ८ मार्च १९७७ रोजी स्त्रियांना ‘समानतेचा अधिकार मिळावा’ असा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाने पारीत केला.
११) ८ मार्च १९८० मध्ये कॅनडा आणि युरोप मधील स्त्रियांनी सुरक्षित गर्भपातासाठी कायदेशीर हक्क मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढला. तर भारतात न्याय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चाचे आयोजन केले गेले.
१२) ८ मार्च १९८१ ला इराणच्या फॅसिस्ट आणि मुलतत्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे पन्नास हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आवाज उठवला.
१३) ८ मार्च १९८३ पासून ‘स्त्रीमुक्ती आंदोलन समिती’तर्फे दरवर्षी ८ मार्चच्या दिवशी त्या त्या वर्षाच्या मागण्या निश्चित करण्याचा कार्यक्रम ठरवले जावू लागले.
१४) ८ मार्च १९९६ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने दरवर्षी त्या दिवसाची विशिष्ट संकल्पना राबवायला सुरुवात केली.
१५) ८ मार्च २०२५ साठी सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी ‘हक्क, समानता आणि सक्षमीकरण’ अशी संकल्पना योजली आहे.
थोडक्यात काय तर ८ मार्च दिवस स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक हक्कांसाठी लढा देण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी समान वेतन, कामाचे चांगले वातावरण, मतदानाचा अधिकार, सन्मानाचे आयुष्य यासाठी स्त्रियांचा हा संघर्ष अजूनही सुरूच आहे. म्हणून स्त्रियांसाठी हा दिवस फक्त आनंदाचाच नव्हे, तर अजूनही सुरू असलेल्या लढ्यांची आठवण करून देणारा आहे. कारण अजूनही स्त्रियांना अनेक ठिकाणी पुरुषाच्या तुलनेने कमी वेतन, विषमता, अत्याचार, भेदभाव, शिक्षणाचा अभाव, राजकीय प्रतिनिधित्व कमी असणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अर्थात शिक्षणामुळे काही पुरुषांच्या वागणुकीत हळूहळू बदल होतो आहे. त्यामुळे काही घरांमध्ये ‘ही पुरुषी कामे, ही बायकी कामे’, असा भेदभाव नष्ट होतो आहे. तरीही समाजाला स्त्री-पुरुष समानता गाठणे अजून बराच दूरचा पल्ला आहे. तोपर्यंत ८ मार्च म्हणजे स्त्रियांसाठी “लढा, हक्क आणि समानता” या मागण्यांचा पाठपुरावा करणारा दिवस राहील. म्हणून यावर्षी आपण खालील घोषवाक्यांचा उद्घोष करून जागतिक महिला दिन साजरा करूया…
१) स्त्री शक्ती जागी झाली, बदलाची मशाल पेटली!
२) समान हक्कांची लढाई, स्त्रीमध्ये निर्माण होई धीटाई!
३) जग बदलायचंय? तर आधी स्त्रीचा सन्मान करायला शिका.
४) मुलगी शिकली, प्रगतीची वाट झाली मोकळी!
५) मुलगा-मुलगी भेद नसावा, समानतेने संवाद असावा!
६) स्त्री आत्मविश्वासाने उभी राहिली, समाजात क्रांती घडली!
७) न्याय, स्वातंत्र्य आणि समानता, स्त्री जीवनाची हीच खरी इतीकर्तव्यता!
८) स्त्री अंधश्रद्धेतून मुक्त झाली, समाजाची प्रगती झाली.
९) पुरुषी वृत्तीचा करा लोप, स्त्रियांना येईल शांत झोप!
१०) स्त्रीविना पुरुष अधुरा, पुरुषाविना स्त्री; दोघांनी मिळून सुजलाम सुफला करा धरित्री!
© जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈