प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टोईसीजम — प्रतिक्रिया नाही प्रतिसाद ! ☆ प्रा. भरत खैरकर 

जरा विचार करा की आधी किती वेळा आणि कधीकधी तुम्ही तुमचा आत्मविश्वास हरवला होता. आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेले होते. आपण स्वतःच आपल्या कृतीचे कारण असतो. जी काही आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद असतो. तो आपल्यातील मूल्य आणि आपली जडणघडण, विचारसरणी यावर अवलंबून असतो. ह्यातूनच ग्रीक तत्वज्ञान ‘स्टोईसीजम’ आले आहे जे आपल्याला जीवनामध्ये येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण देते.

आपल्या मेंदूला, मनाला प्रशिक्षित करण्याची एक कला आहे. यामध्ये फक्त आपण स्वतःला नियंत्रित ठेवणे, रिऍक्ट न होणे, स्वतःला रागात झोकून न देणे, शांत ठेवणे. स्वतःला सतत वर्तमानात ठेवणे.. जमिनीवर ठेवणे. आजूबाजूच्या गोष्टीचा परिणाम न होऊ देणे. जीवनाकडे प्रायोगिक पद्धतीने बघणे हे तत्वज्ञान सांगतं. आपणाशी घडणाऱ्या निगडित असणाऱ्या कितीतरी घटनांबाबत आपलं नियंत्रण नसतं. त्या घटनेला.. प्रसंगाला आपण कसे सामोरे जातो? हे मात्र आपल्या हातात असतं. हा मूळ गाभा ह्या तत्त्वज्ञानाचा आहे.

आपल्या आवाक्यात आणि नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर.. परिस्थितीवर प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे ह्या कलेला ग्रीक आणि रोमन लोकांनी एक जीवन प्रणाली म्हणून अंगीकारली स्वीकारली तीच कालांतराने ‘स्टोईसीजम’ नावाने तत्त्वज्ञान रुपात आली. ह्या तत्त्वज्ञानाचा नेल्सन मंडेला, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस 

जेफरसन, इत्यादींनी आपल्या आयुष्यात वापर केल्याचं आपण बघतो. जीवनामध्ये मूल्याची जपणूक करणे.

ह्याच गोष्टीला महत्त्व आहे. चांगले जीवन जगण्यासाठी भौतिकवस्तूंची गरज.. आवश्यकता नाही. असे म्हणणाऱ्यापैकी हा वर्ग आहे! जोवर आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी नेमक्या वस्तू स्वीकारत नाही. तोवर बिनकामाच्या बऱ्याचशा वस्तू उपलब्ध आहे म्हणून आपण त्या वापरत असतो. बाळगत असतो‌ हे सत्य आहे.

जन्मापासून सारखं आपण स्वतःला व मुलांना एका ‘शर्यती’त उतरवले आहे. आपला समाजही ह्याच गोष्टीला म्हणजे जगण्याला शर्यत म्हणूनच खतपाणी घालत आहे. त्यामुळे आपण आनंदी असे कधीच नसतो सतत

‘स्पर्धामोड’मध्ये असतो. पैसा, प्रसिद्धी, फीडबॅक, लाईक्स, आदींच्या मागे लागून न संपणारी भूक आपण जागृत केली आहे आणि असमाधानी बनलो आहे. आपण मेंढरं बनलो आहे कळपात चालणारे! कोणीतरी आपल्याला लीड करतो आहे आणि आपण त्याला फॉलो करतोय.. शर्यतीत कितीतरी अंतर कापल्यानंतर मागे वळून बघितल्यावर जाणवतं की, ‘धावलं नसतं तरी चाललं असतं!’ म्हणून आपण जीवनाकडे कसे पाहतो. त्यावरच आनंद अवलंबून आहे.

आपण कुठले मूल्य, भावभावना जपतो हे अधिक महत्त्वाचा आहे. आजूबाजूच सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवल्यावर समस्या राहत नाही. मूल्य जपणे हाच आनंदाचा ठेवा आहे. असं म्हणणारी स्टोईसीजम ही जीवन पद्धती आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक नियमाचे पालन केले पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागे मुळात निसर्गच आहे. असे ही विचारप्रणाली सांगते.

जगाला आहे तसेच स्विकारा. त्यासाठी कठीणात कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी क्षमता वाढवा. स्वतःमध्ये तार्कीक, माहितीपूर्ण आणि शांतीयुक्त अशा स्वभाव गुणांची वाढ करा, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही.. स्वतःची मजबुती वाढवीत राहणे. जरी एखाद्याने चुकीचे केले, तरीही निर्णय घेताना न्याय बुद्धीने समसमान निर्णय घेणे. स्वतःमधील धैर्य वाढविणे. ते केवळ विपरीत परिस्थितीतच न दाखवता जीवनामध्ये रोजच्या रोज बाहेर वाढून ठेवलेल्या.. आलेल्या समस्यांना खुल्या आणि स्वतंत्र विचाराने सामोरे जाणे. स्टोईसीजमचा सेनेका नावाचा तत्वज्ञ सांगतो की, कधी कधी केवळ जिवंत राहणे.. टिकून राहणे सुद्धा धैर्यच असते!

स्टोईसीजम हे स्वतःभोवती किंवा स्वतःलाच महत्त्व देणारे तत्वज्ञान नसून इतरांचाही मानवतेने स्वीकार करायला सांगते. जो व्यक्ती स्वतःमध्ये नियंत्रण आणि मूल्याची जपणूक करणारा असतो तोच इतरांमध्ये पॉझिटिव्ह बद्दल आणू शकतो. मार्कोस इलेरिअस ह्या राजाने १९ वर्षे राज्य केले. खूप लढाया केल्या. त्यामध्ये त्याची मुले मारल्या गेली. सर्वच्या सर्व नाहीसं झालं.. त्यानंतर त्याने लिहिलेलं तत्वज्ञान म्हणजे स्टोईसीजम होय.

हेच तत्त्वज्ञान वापरून नेल्सन मंडेलांनी २७ वर्षे जेलमध्ये आपण कसे टिकून राहिलो आणि वर्णभेदाचा लढा कसा दिला हे सांगितले आहे.. भूतकाळात आपण बदल करू शकत नाही पण भविष्याकडे आपण बघू शकतो. हे सांगून त्यांनी आफ्रिकन जनतेला स्टोईसीजम चा मार्ग अवलंबाचा सल्ला दिला आहे. आपण आपल्या जीवनातील घटनांमधून दुःखी होत नाही तर आपण त्या घटनेला दिलेल्या जजमेंटल प्रतिसादामुळे दुःखी होतो.

कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर थांबा, पहा, आणि काय करायचं ते निवडा! ती निवड प्रतिक्रियात्मक नसावी ती प्रतिसादात्मक असावी. हे स्टोईसीजम शिकवते. त्यासाठी आपलं अंतर्मन, आत्मशांती ढळू देऊ नका. आतून तुम्ही शांत रहा. आपली विचारसरणी, मूल्य, आत्मसन्मान, कशात आहे? याचा विचार करून प्रतिसाद द्या. त्यासाठी कुठलीही परिस्थिती उद्भवल्या नंतर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा पॉज घ्या म्हणजे विचार करा.. क्षणभर खोल श्वास घ्या, क्षणिक मेडिटेशन करा आणि त्यानंतरच रिस्पॉन्स द्या प्रतिसाद द्या.. हे करताना स्वतःला तुमच्यासाठी कुठले मूल्य महत्त्वाचे आहेत. हे विचारा म्हणजे म्हणजे तुमचा प्रतिसाद सकारात्मक असेल. कधी कधी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही समस्याकडे बघायला लागा म्हणजे त्या समस्येला संकटाला समस्या न समजता संधी समजायला लागा. त्यामुळे आपण आपली ऊर्जा व्यवस्थित वापरू शकतो.. स्टोईसीजम त्यासाठी स्वतःचे परीक्षण, रोजचा अभ्यास, मूल्यजपणूक, स्वयंसुधारणा, इत्यादी गोष्टींना महत्त्व देते. चला तर मग आपणही कुठल्याही समस्येला सरळ सरळ प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देऊया.. आणि आयुष्यात मूल्यांची जपणूक करून सुखी, समृद्ध नि शांत जीवन जगूया !

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments