श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “पूनम गुप्ता” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
पूनम गुप्ता
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत!
वर्ष होतं २०२३. दिवस होता भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन… २६ जानेवारी! राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर सेन्ट्रल रिझर्व पोलिस फोर्समधील महिलांची एक सुसज्ज तुकडी मोठ्या डौलात, दिमाखात आणि आत्मविश्वासाने मार्च करीत पुढे निघाली होती. ही जगातील पहिली सशस्त्र महिला पोलिस बटालियन…. CRPF…All Women Armed Police Battalion!
भारताच्या राष्ट्रपती महोदया आणि तीनही सेनादलांच्या सेनापती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू सलामी स्वीकारण्यासाठी उभ्या होत्या. पाहता पाहता ही तुकडी सलामी मंचासमोर आली. या तुकडीचे नेतृत्व करणा-या तरुण, रुबाबदार महिला प्रमुखाने उजव्या हातात समोर धरलेल्या तलवारीची मूठ आपल्या मुखासमोर नेली आणि आपल्या तुकडीला अत्यंत आवेशाने आदेश दिला…. दहिने देख! दुस-याच क्षणी आणि तिने आपल्या हातातल्या तलवारीचे टोक सेनापती महोदयांच्या सन्मानार्थ जमिनीच्या दिशेला केले. आपल्या सेनापतींना मानाची सलामी देत ही तुकडी पुढे मार्गस्थ झाली! या तुकडीचे नेतृत्व करीत होत्या असिस्टंट कोमांडंट पूनम गुप्ता. या तरुण, तडफदार अधिकारी मूळच्या ग्वाल्हेर (Gwalior) येथील शिवराम कॉलनी, शिवपुरी इतल्या निवासी आहेत. त्यांचे पिताश्री रघुवीर गुप्ता हे तिथल्या नवोदय विद्यालयात Office Superintendent पदावर कार्यरत आहेत. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून सोबतीला इंग्रजी साहित्यातही त्यांनी पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. शिवाय बी. एड. पदवी प्राप्त करून त्या शिक्षिका होण्याच्या बेतात होत्या. परंतु त्याच्या नशिबाने अचानक मार्ग बदलला… त्या २०१८ च्या UPSC CAPF परीक्षेस त्या प्रविष्ट झाल्या आणि त्यांनी ८१वा क्रमांक पटकावला… त्या आता Assistant Commandant झाल्या होत्या! त्यांना बिहार मधील नक्षल-प्रभावित भागात कर्तव्यावर पाठवण्यात आले. तेथे त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सैनिकी संचालनात त्यावर्षी सर्व महिला सदस्य असलेली तुकडी समाविष्ट करण्यात आली होती. आणि या तुकडीचे नेतृत्व करण्याचा बहुमान पूनम गुप्ता यांना प्राप्त झाला!
योगायोगाने काहीच दिवसांत पूनम गुप्ता यांना राष्ट्रपती भवनात नेमणूक मिळाली ती राष्ट्रपती महोदयांची Personal Security Officer या मोठ्या जबाबदारीच्या पदावर. आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष परंतु मितभाषी स्वभावाने, सुसंस्कृत वागणुकीने आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करू शकण्याच्या क्षमतेमुळे पूनम यांनी सर्वांची मने जिंकून घेतली… विशेषता: महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या नजरेत त्या भरल्या! आपले कर्तव्य सांभाळून पूनमजी महिला सबलीकरण करण्याच्या कामांत आपला वाटा उचलीत आहेत. महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्या प्रेरक संदेश त्यांच्या सोशल मिडीया वरून नियमित देत असतात. त्या अनेक मुलींच्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.
आनंदाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पूनम गुप्ता यांचा विवाह जुळला… त्यांचे नियोजित पती श्री. अवनीश कुमार हे सुद्धा सैनिक अधिकारी असून सध्या जम्मू-कश्मीरमध्ये CRPF Assistant Commandant पदावर नियुक्त आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला हे लग्नबंधनात बांधले जाणार आहेत… पण खरी गोष्ट तर पुढेच आहे!
हा विवाह सोहळा चक्क राष्ट्रपती भवनात साजरा होणार आहे. आणि प्रमुख आयोजक आहेत महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू! आजवरच्या इतिहासात राष्ट्रपती भवनात साजरा होणारा हा पहिलाच विवाह सोहळा ठरणार आहे! पूनम गुप्ता या खरोखरीच नशीबवान ठरल्या आहेत. आणि हा अलौकिक निर्णय घेणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांचे कौतुक करावे तेवढे अपुरेच ठरेल… जणू त्यांनी एका महिला सैनिक तरूणीला आपली कन्या मानले आहे… आणि त्यांच्याच प्रासादात त्या हा मंगल सोहळा घडवून आणणार आहेत. आपण केवळ राष्ट्रप्रमुखच नसून भारत देश नावाच्या एका विशाल कुटुंबाच्या प्रमुखच आहोत हेही त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे! जयहिंद, Madam President! अभिनंदन पूनम गुप्ताजी.. अभिनंदन अवनीशजी! नांदा सौख्यभरे!
☆
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈