? इंद्रधनुष्य ?

☆ हँग ग्लायडिंग — सुश्री शुभा गोखले  ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(मेजर विवेक मुंडकुर आणि बाणेर टेकडीवरचं हँग ग्लायडिंग):-

२४ मे १९८१ हा रविवारचा दिवस उत्साही पुणेकरांच्या स्मरणातून कधीही जाणं शक्य नाही ! या दिवसाच्या साधारण 8-10 दिवस आधीपासून पुण्याच्या सगळ्या वर्तमानपत्रांमधून सामान्य पुणेकरांना नवा शब्द कळला होता –” हँग ग्लायडिंग..”. म्हणजे छोट्या त्रिकोणी आकाराच्या धातूच्या फ्रेमवर ताणलेल्या, रंगीबेरंगी  पॅराशूटच्या कापडानी बनवलेल्या मिनी-विमानानी (याला इंजिन नसतं) वाऱ्याच्या सहाय्याने पक्ष्यासारखं उडायचं !

CME, दापोडी मधल्या मेजर विवेक मुंडकुर या अद्वितीय व्यक्तीने  हा आगळा छंद जोपासला आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने समस्त पुणेकरांना या छंदाशी परिचित करायचा घाट घातला. 

आता हवेवर आकाशात उडायचं म्हणजे उंचावरची मोकळी जागा हवी… म्हणून निवडली होती बाणेरची टेकडी ! या टेकडी वर एक देऊळ होतं, पण बाकी फारसा झाड-झाडोरा नसून मोकळी जागा होती.  त्या काळात पुणे विद्यापीठाच्या गेटजवळ औंध आणि पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मधे एक अर्धा-कच्चा रस्ता बाणेर टेकडीकडे जात असे. त्या दिवशी सकाळपासून चतु:शृंगी जत्रेला नसेल,एवढी शाळा-कॉलेजच्या मुलांपासून अनेक तरुणांची आणि त्यांच्या पालकांची अलोट गर्दी बाणेर टेकडीकडे लोटली होती. कुणी स्कूटर-मोटरसायकलवरून,  कुणी गावापासून सायकली हाणीत, तर बरेचसे  विद्यापीठ गेटपर्यंत बसनी आणि पुढे चालत, असे आलेले होते.  तिथे पोहोचल्यावर मात्र वेगळंच वातावरण होतं ! संपूर्ण लष्करी तळाचा थाट होता. टेकडीच्या वाटेवरच  मिलिटरीचे असंख्य ट्रक उभे होते, टेकडीच्या पायथ्याच्या मैदानात अत्यंत सुबक लष्करी पद्धतीचे शामियाने आणि त्यात बसायला आरामदायी खुर्च्या वगैरे होत्या… पण अर्थातच हा जामानिमा आमच्यासारख्या आम-जनतेसाठी नव्हता, तर लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी होता ! आम्ही सगळे जण टेकडीचा चढ तुडवत वर पोहोचलो होतो. आमची टाळकी सोबतच्या फोटोत दिसत असण्याची शक्यता नाकारता येत नाही ! 

आम्ही टेकडीच्या माथ्याजवळ असल्याने उडण्याच्या तयारीत असलेली हँग ग्लायडर आणि त्यांचे चालक जवळून दिसत होते. हा संपूर्ण खेळ वाऱ्यावर अवलंबून असल्याने वाऱ्याची दिशा आणि वेग पाहूनच उड्डाणे होऊ शकत होती. वारा पडला की आमची तोंडही पडत होती ! 

मेजर मुंडकुर स्वतः हातात छोटा पवन-मापी घेऊन हवेचा अंदाज सतत घेत होते, आणि परिस्थिती चांगली असेल तर उड्डाणाला परवानगी देत होते. अर्थातच ही उड्डाणे फक्त त्यांच्या प्रशिक्षित सहकाऱ्यांंनाच करायची परवानगी होती ! जम्प सूट, हेल्मेट असा त्या लोकांचा पेहराव होता. हँग ग्लायडरच्या दांड्याला पकडून काही पावलांचा स्टार्ट घ्यायचा आणि टेकडीवरून स्वतःला झोकून द्यायचं, असा कार्यक्रम होता. एकदा जमीन सोडली की टेकडीखालच्या दरीतून येणाऱ्या वाऱ्यानी ग्लायडरला वरच्या दिशेनी जोर मिळायचा आणि दरीत लुप्त झालेलं ते  रंगीत गारुड परत टेकडीच्याहून उंच तरंगताना दिसायचं. वारा साथ देईपर्यंत दरीवर घिरट्या मारून 5-7 मिनिटांनी छान वळणदार गिरकी घेऊन खाल्री शामियान्यांसमोर आखलेल्या गोलात लँडिंग करणं, हे एक अचाट कौशल्य तिथे पाहायला मिळालं.

या सगळ्या सोहळ्याने भारून गेलेल्या कित्येकांनी नंतर हँग ग्लायडिंग, पॅरा ग्लायडिंगचं प्रशिक्षण घेतलं. मेजर मुंडकुर हे प्रशिक्षण देणाऱ्यात अग्रणी मानले जातात. 

पुढच्या तीस वर्षांत अर्थातच या साहसी खेळाला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली, पण १९८१ साली या खेळाशी तोंडओळख होण्याचं भाग्य (माझ्या मते भारतात प्रथमच) पुण्याला मिळालं, यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विवेक मुंडकुरांचे सदैव ऋणी राहावं लागेल.

— सुश्री शुभा गोखले 

संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments