इंद्रधनुष्य
☆ श्री उप्पिलियाप्पन कोविल….सुश्री मानसी घाणेकर ☆ सुश्री वीणा छापखाने☆
तमिळनाडूला गेलो होतो तेव्हा कुंभकोणम्ला एका मंदिरात दर्शनाला गेलेलो… ‘श्री उप्पिलियाप्पन कोविल’. याची गोष्ट गंमतीशीर आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी भूदेवी—लक्ष्मीदेवी आपली मुलगी म्हणून जन्माला यावी यासाठी घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन श्री लक्ष्मीदेवी त्यांच्या आश्रमासमोरच्या तुळशीवृंदावनाखाली लहान बालिकेच्या रूपानं प्रकट झाली. मार्कंडेय ऋषींनी अगदी प्रेमळ बापाच्या जिव्हाळ्यानं काळजीकाट्यानं तिला लहानाची मोठी केली. इतकी वर्षं श्री लक्ष्मीदेवीचा विरह भगवान विष्णूंना अजिबात सहन होईना. ते मार्कंडेय ऋषींकडे साधंसुधं रूप घेऊन गेले. पौंगडावस्था आणि तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचा हात मागण्यासाठी. त्यांना मार्कंडेय ऋषींनी ओळखलं नाही. ऋषी म्हणाले, ‘ अहो, माझी गोडुली मुलगी अजून किती लहान आहे ! तुम्ही किती मोठे आहात…छे छे..ते काही जमणार नाही…तिला अजून काहीच दुनियादारी येत नाही…तापत्रय असलेल्या संसाराचा भार ती कशी सांभाळेल? अहो…तिला अजून पदार्थ शिजवताना मीठ किती टाकावं याचाही अंदाज नाही…! ‘ त्यावर भगवान श्रीमहाविष्णू म्हणाले, ‘ नका काळजी करू…मी सांभाळून घेईन तिला संसारात…अजिबात अंतर देणार नाही…तिला जेवण बनवताना मिठाचा अंदाज येत नाही ना….काही हरकत नाही…मी आजपासून बिनामिठाचं भोजन करेन! ‘
आणि मग तिथे श्री महाविष्णू—लक्ष्मीदेवीचं लग्न झालं. तेव्हापासून त्या मंदिरात बिनामिठाचा नैवेद्य दाखवला जातो !!
’ उप्पू (मीठ) + इल्लेया (नाही) + अप्पन (स्वामी) म्हणजे मीठ न खाणारा देव ‘ असं श्री महाविष्णूंना बिरूद दिलं गेलं.
अतिशय चवदार आणि अफलातून प्रसाद आहे तिथला !!!
परिपूर्ण पुरूष !!!
— मानसी घाणेकर
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈