श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ इंद्रधनुष्य ☆ जलचरांचं स्थलांतर – भाग ४ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
३. डाल्फिन-
स्क्वीड माशांचा थवा हे डाल्फिनचं अन्न. जेव्हा हे मासे वसंत ऋतूत उत्तरेकडे जातात, तेव्हा डाल्फिन त्यांच्या मागोमाग जातात. हिवाळ्यात ते पुन्हा दक्षिणेकडे येतात, तेव्हा डाल्फिनही त्यांच्या मागोमाग दक्षिणेकडे येतात.
अलास्कन कॅरिब्यू –
सागरकाठच्या किनारपट्टीच्या जमिनीवरून अलास्कन कॅरिब्यूंचा कळप फिरतो. जमिनीवरील गवत आणि पाण्यालगतंचं शेवाळं ते खातात. वसंत ऋतूत ते उत्तरेकडच्या किनारपट्टीलगत फिरतात. तिथे पानगळीला सुरुवात होताच ते पुन्हा दक्षिणेकडच्या सदाहरित जंगलाकडे येतात. ते १६०० कि. मी. पर्यंतचा प्रवास करतात.
नवे जीव जन्माला घालण्यासाठी स्थलांतर
बेडूक उन्हाळ्यात बागेत जमिनीवर राहतात. पण उन्हाळ्याच्या मागोमाग ते जवळच्या तळ्याकाठी, पाण्याचा साठा असेल, तिथे जातात आणि त्यांची अंडी पाण्यात घालतात. अंडी फुटली, की त्यातून बाहेर येणार्या जिवांना ताडपोल म्हणतात. त्यांना कल्ले असतात. नंतर त्यांचे पाय आणि फुफ्फुसे तयार होतात. पूर्ण वाढ झालेले बेडूक तळ्यातून बाहेर येतात आणि जमिनीवर राहतात.
मगर आणि सुसर
मगरी आणि सुसरी, त्यांचं बहुतेक आयुष्य पाण्यात घालवतात. पण त्यांची अंडी घालण्याची वेळ झाली की मादी नदीच्या पाण्यातून बाहेर येते. दलदलीच्या पाणथळ किनार्यावर येते. गवत रानटी झुडुपे वगैरेचा उपोग करून घरटे तयार करते. तिथे अंडी घालते. अंडी फुटून पिलं बाहेर येईर्यंत त्यांचे रक्षण करते.
समुद्री कासव
हिरव्या रंगाची समुद्री कासवं त्यांची अंडी जमिनीवर घालतात. त्यासाठी ती समुद्रातून बाहेर येऊन विशिष्ट ठिकाणापर्यंत सरपटत जातात. ब्राझीलमधील किनारपट्टीच्या पाण्यातील हिरवी कासवं दर दोन-तीन वर्षांनी आपलं नित्याचं वसतीस्थान सोडून दक्षिणेकडे अटलांटिक समुद्रातील आसेंशन आयलंड बेटाकडे जातात. हे बेट ८८ चौ. कि. मीटर क्षेत्रफळाचे आहे. पण त्यासाठी कासवं १६०० कि. मी.चा प्रवास करून तिथे पोचतात.
मीलन काळात माद्या प्रवाहातून पोहतात. त्या काळात त्या अनेकदा अंडी घालतात. त्याच किनार्यावर त्या पुन्हा पुन्हा अंडी घालतात. अंडी फुटली, की लहान कासवं स्वत:चं स्थलांतर सुरू करतात. ती पाण्यात पोहू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते. पण त्यांचं तोंड नेहमी पाण्याकडे असतं .अर्थात अनेक जण अन्य भुकेल्यांचं भक्ष्य बनतात. पण काही कासवं समुद्रात पोचतात. त्यांच्या जन्मदात्यांच्या मूळ मुक्कामी परत येतात. त्यापूर्वी त्यांनी ते ठिकाण कधीही पाहिलेले नसते. ते पुरेसे वयस्क झाले, म्हणजे पुन्हा असेन्शन बेटाकडे येतात आणि आपली अंडी समुद्राकाठी वाळूवर घालतात. या एकाकी बेटावर ती का येतात? त्यांना ते बेट कसं सापडतं, याचं उत्तर शास्त्रज्ञांना अजूनपर्यंतसापडलेले नाही.
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈