श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ सत्यकथन ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆
पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.
आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !!
दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!
अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.
मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.
अशी ती माणसं. हुशार आणि चतुर!
️️️️️© सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈