श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ न्यायप्रिय राजमाता… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
इंदौरच्या आडाबाजार परिसरात राणी अहिल्यादेवी बाहेर पडल्या आहेत, रस्त्यावर एक गायीचं वासरू रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडलेलं दिसतंय, त्याच्या बाजूला गाय हंबरतेय, चाटतेय, तिच्या डोळ्यातून डोंगराएवढं दुःख डोळे भरून वाहतंय, एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूने घायाळ झालीय, त्या वेदना, संवेदना, दुःख हे सगळं त्या गायीच्या डोळ्यात दिसतंय, तो प्रसंग माता अहिल्यादेवी पाहताहेत, बेचैन, अस्वस्थ झाल्यात !
त्या मुक्या गायीला न्याय मिळाला पाहिजे, 8- 10 दिवसाच्या त्या निष्पाप बछड्याला रस्त्यावर चिरडून निघून जाणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा राग त्यांच्या मनामध्ये आहे, आपण रोज हजारो लोकांना तर न्याय देतो पण या मुक्या गायीला न्याय कोण देणार ! तिच्या 8-10 दिवसांच्या वासराची, तिची काय चूक? अहिल्यादेवी व्याकुळ होऊन आपणच न्याय दिला पाहिजे हा निश्चय करत तडक परत राजवाड्यात फिरतात, जिथे रोजचा जनता दरबार आणि न्याय देण्यासाठी बसतात त्या सिंहासनावर स्वार होतात, आपल्या सरदारांना पाहिलेली घटना सांगतात, या अमानुष घटनेला मग शिक्षा ठरते, ती शिक्षा म्हणजे थेट मृत्युदंड !
त्या घटनेची चौकशी केली जाते तर आपल्या पोरानेच त्या वासराला चिरडल्याची माहिती समोर येते. अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव रस्त्याने घोड्याच्या रथातून जात असताना आडव्या आलेल्या त्या गोंडस वासराला चिरडून मालेराव पुढे निघून गेल्याची माहिती मिळते. अहिल्यादेवींनी शिक्षा तर मृत्यूदंडाची दिलीय, मग आता माघार नाही, अन माघार घेतील त्या अहिल्यादेवी कसल्या !
स्वतःचा मुलगा मालेराव त्या वासराचा मारेकरी असल्याचे ऐकून त्या किंचितही हटल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत, थबकल्या नाहीत, आणि त्यांनी तात्काळ त्या सिंहासनावरून आदेश दिला, त्या मालेरावला रस्त्यावर झोपवा अन त्याच्या अंगावरून बेफाम वेगाने घोड्याचा रथ चालवा ! त्याला मृत्युदंडच झाला पाहिजे !
सगळं सभागृह स्तब्ध झालं, चकित झालं, भयभीत झालं, विचार करतंय— अरे या तर मालेरावच्या आई, पोटच्या पोराला कोण रथाच्या खाली देईल! असं निर्दयी कोण मारून टाकेल! आणि गुन्हा काय तर एका 8-10 दिवसाच्या वासराला चिरडलं! काय त्या वासराची किंमत? ज्याच्यासाठी राणी अहिल्यादेवी आपल्या पोटच्या एकुलत्या एक पोराला मृत्युदंड देताहेत— पण या करारीबाण्याच्या अहिल्यादेवींना विरोध करण्याचं धाडस त्या वाड्यातल्या एकाही सरदारात नव्हतं!
एकही जण पुढे यायला तयार नाही, रथ चालवायला तयार नाही. मालेरावला मारायचं तेही सगळा आडाबाजार बघणार . ज्या राजघरण्यावर जीव ओवाळून टाकला त्या राजपुत्राला मारायचं कसं, हे पाप कशासाठी करायचं . मात्र अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावर कशाचाच लवलेश नाही . उलट त्या निष्पाप गायीला न्याय मिळवून देण्याची त्यांना ओढ लागलीय . अन एकही जण पुढे येत नसल्याचं पाहून त्यांनी एक निगरगट्ट, धष्टपुष्ट आणि घट्ट काळजाच्या नोकराला आदेश दिला . रस्त्यावर मालेरावला झोपवलं, मालेराव डोळे बंद करून झोपले आहेत, कारण आता मरणातून सुटका नाही हे त्यांनीही ओळखलंय, सगळा आडाबाजार रस्त्याच्या बाजूने बघायला तोबा गर्दी करून उभा आहे. ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गायसुद्धा तिथेच स्तब्ध उभी आहे. ही न्यायप्रिय राणी स्वतःच्या पोराला मृत्युदंड देतीय. \ मात्र रथ पळत येतोय आणि थबकतोय, त्याही निगरगट्ट नोकराचं धाडस होईना, परत परत रथ बेफाम धावत येतोय, मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या आतच थबकतोय!
हे वारंवार होतंय, मात्र मालेरावला चिरडण्याचं धारिष्ट दाखवत नाही, म्हणून राणी अहिल्यादेवी स्वतःच त्या रथाच्या सारथी होतात. आता मालेरावला चिरडलं जाणार हे नक्की होतं, बेफाम रथ येतोय – मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या अगोदरच ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गाय रथाच्या समोर येऊन उभी राहते, रथ पुढे जाऊच देत नाही . अहिल्यादेवी रथ परत फिरवतात पुन्हा वेगाने घेऊन येतात. मात्र पुन्हा गाय समोर येते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय !—
जणू ती गाय रथाच्या आडवे येऊन अहिल्यादेवींना म्हणतेय, “ बाई, पोटच्या पोराच्या मृत्यूचं दुःख मी भोगलंय, या यातना, संवेदना मी भोगल्यात. आता हे दुःख तुझ्या पदरी कशाला! आईच्या काळजाला होणाऱ्या जखमा, आईच्या आतड्याला पडणारा पिळ मी भोगलाय! माझा बछडा माझ्यापासून हिरावला पण मला न्याय देण्यासाठी तू तुझ्या बछड्याला कशाला हिरावते आहेस ! तुझ्या न्यायदानाची पद्धत आणि नीती पाहून मी माझ्या दुःखाला सुद्धा विसरून गेलेय ! “
या घटनेनं सगळा परिसर घायाळ आणि स्तब्ध झाला . लोकं अहिल्यादेवींकडे याचना करताहेत, की ही गाय त्यासाठीच आडवी येतेय की पोटच्या पोराला मारू नका! चूक झाली असेल पण त्याची शिक्षा अशी करू नका!
आणि शेवटी अहिल्यादेवींना माघार घ्यावी लागली आणि त्या तडक आपल्या राजवाड्यात परतल्या! हा त्यांच्या आयुष्यातला एकमेव निर्णय जो नाईलाजाने त्यांना माघारी घ्यावा लागला, तेही त्या गाईच्या आडव्या येऊन करणाऱ्या विनवण्यामुळे!
अत्यंत कठोर, न्यायप्रिय आणि उत्तम शासक असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला, पहिल्यांदा नवरा खंडेरावांचा मृत्य, त्यानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू, त्यानंतर मुलगा मालेरावांचा मृत्यू!
घरातले सगळे कर्ते पुरुष गेल्यानंतरही भगवी पताका खांद्यावर घेऊन महिलांची फौज तयार करत लढाया करणारी रणरागिणी माळवा प्रांताने अनुभवली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, मठ, धर्मशाळा, पाणवठे, पाणपोया, विहिरीचं बांधकाम, काशी विश्वनाथ, सोमनाथापासून ते परळी वैजनाथापर्यंत सगळ्या हिंदूंच्या आस्थांना नवसंजीवनी दिली. जीर्णोद्धार केला!
आमच्या छत्रपती शिवरायांनी देव वाचवला आणि त्या देवांचा जीर्णोद्धार करत आमच्याच राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचा आणि हिंदूंचा उद्धार केला, हिंदूंची ओळख जपली.
महान पराक्रमी, योद्ध्या, न्यायप्रिय, कठोर शासक, रणरागिणी, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!🚩🙏
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈