श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे…

महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. इतर सर्व पंचांगे एका माळेतील आहेत. ती पंचांगे त्या त्या व्यक्तीने व्यक्तिगत साहस वा उपक्रम म्हणून त्यांची प्रसिद्धी वेगवेगळ्या काळी सुरू केली. ती सर्व चित्रा पक्षीय पंचांगे आहेत. टिळक पंचांग हे एकमेव रेवती पक्षाचे पंचांग आहे. चित्रा पंचांग व रेवती पंचांग या संज्ञांची फोड लेखामध्ये पुढे येते. दाते हे प्रमुख पंचांग म्हणून चित्रा पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पंचांग येथे नमुना म्हणून घेऊ आणि दाते व टिळक या पंचांगांत नेमका फरक काय व कशामुळे ते पाहू.

दाते आणि इतर चित्रा पक्षीय पंचांगे महाराष्ट्रात बहुतांश भागांत वापरली जातात, तर टिळक पंचांग हे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, आंजर्ले, कोळथरे, पंचनदी, दाभोळ या भागांत वापरले जाते. त्या गावांतील उत्सव टिळक पंचांगांप्रमाणे तिथीवार धरून साजरे केले जातात आणि तेथील ग्रामस्थ त्याचे कसोशीने पालन करतात. केळशी येथील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव असो किंवा कोळथरे येथील कोळेश्वरचा उत्सव असो, ते प्रसंग टिळक पंचांगातील तिथीनुसारच होत असतात.

दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व पंचांगे किंबहुना संपूर्ण भारतातील पंचांगे ही सोळाव्या शतकात रचलेल्या ‘ग्रहलाघव’ या ग्रंथानुसार तयार केली जात. तो ग्रंथ गणेश दैवज्ञ या मराठी माणसाने रचला होता ! त्यानुसार ग्रहगणित करणे तुलनेने सोपे असल्याने तो ग्रंथ पंचांग गणितकर्त्यांमध्ये लोकप्रिय होता. गणित आणि खगोलगणित यांत अनेक क्रांतिकारक शोध सोळाव्या शतकापासून युरोपात लागले. तसेच, आकाशाचे वेध घेण्यासाठी नवनवीन दुर्बिणी उपलब्ध झाल्या. त्यामुळे युरोपातील तज्ज्ञांचे आकाशाचे गणितीय वेध अचूक नोंदले जाऊ लागले; तसेच, अनेक खगोलीय घटनांची गणितीय सिद्धता देणे शक्‍य झाले. ते ज्ञान भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी अंमलाबरोबर आले. तोपर्यंत भारतात पंचांग गणित हे प्रामुख्याने गुरु-शिष्य परंपरेने शिकवले जात असे.

सिद्धांत हा एक ग्रंथ प्रकार आहे. त्यात खगोल शास्त्र, आकाश निरीक्षणे यासाठीचे गणित, सिद्धांत लिहिणाऱ्यांचे स्वत:चे निरीक्षण या गोष्टी असतात. हा खगोलशास्त्राचा सिद्धांत प्रस्थापित करणारा ग्रंथ म्हणता येईल. या ग्रंथावरून थेट पंचांग करणे कठीण असते. त्यासाठी अशा ग्रंथातील प्रस्थापित सिद्धांतावर आधारित करण ग्रंथ करण्यात येतो. करण ग्रंथ हा केवळ पंचांग करण्यासाठी उपयुक्त गणित, खगोल यावर आधारित कोष्टके असा असतो. त्यामुळे पंचांग करणे सोपे असते. ग्रहलाघव हा एक करण ग्रंथ आहे. तो सूर्य सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ग्रहलाघव वापरुन केलेली पंचांगे एका अर्थी सूर्य सिद्धांतावर आधारलेली होती असे म्हणता येते. असेच आर्यभटचा आर्यसिद्धांत, ब्रम्हगुप्तचा ब्रम्ह स्फुटसिद्धांत, वराह मिहीर याने उल्लेख केलेले प्राचीन पाच सिद्धांत असे अनेक सिद्धांत भारतात प्रसिद्ध होते.

प्रथमच, त्या पारंपरिक ज्ञानाची तुलना आधुनिक गणिताचा अभ्यास करून आलेल्या आणि नवीन साधने वापरून प्राप्त केलेल्या निरीक्षणांशी केली जाऊ लागली. पंचांग गणित पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धतींनी शिकलेले लोक तशी तुलना करू शकत होते. त्यात प्रामुख्याने दोन व्यक्ती होत्या त्या म्हणजे प्रा.केरोपंत छत्रे आणि पं. बापू देव शास्त्री. त्या दोघांनी स्वतंत्रपणे पारंपरिक पंचांग गणित पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आरंभले. सुरुवातीस, त्या दोघांना विरोध बराच सहन करावा लागला. पण तरुण उच्च शिक्षित जसजसे होऊ लागले तसतशा त्या सुधारणा स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्या सुधारणा नेमक्‍या काय होत्या? 1. सौर वर्ष सूर्य सिद्धांतानुसार न घेता आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे घेणे (यात वास्तविक फार थोडा फरक आहे, याबद्दल सूर्य सिद्धांतकारांचे कौतुकच करण्यास हवे), 2. वसंत संपातास वार्षिक गती आहे, ती आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे 50.2 सेकंद अशी घेणे (ती सामान्यत: साठ सेकंद घेण्यात येत होती), 3. निरयन राशी चक्र आरंभ रेवती नक्षत्रातील झीटा या ग्रीक अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या तारखेपासून करावा. या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता !

क्रमशः…  

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments