? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

संप्रदाय म्हटले की दैवत आले. देवस्थान आले. क्षेत्र आले. तीर्थ आले. पथदर्शक श्रेष्ठी आले. संत आले.  वाड्मय आले. तत्वज्ञान आले. देवकर्म आले. नित्यपाठ आला. जप आला. शिष्य अथवा लोकसमुदाय आला. संप्रदायाचा मंत्र आला. मग तो कोणताही संप्रदाय असो. शैव असो वा वैष्णव. रामानुज असो वा निंबार्क. गाणपत्य असो वा कापालिक. राधा संप्रदाय असो वा स्वामी नारायण. 

मग वारकरी संप्रदाय तरी त्याला अपवाद कसा असणार. त्यालाही दैवत आहे. विग्रह आहे. देवस्थान आहे. क्षेत्र आहे. तीर्थ आहे. मार्ग दाखविणारे संत आहेत. देवाच्या अन् संतांच्याही लीला आहेत. देवकर्म आहे. ज्ञान आहे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणत जगाला कवेत घेणारे तत्वज्ञान आहे. गाथा- भागवत- ज्ञानेश्वरीसारखे वाङ्मयीन ग्रंथ आहेत. वारीसारखा नियम आहे. तो निष्ठेने पाळणारे हजारो वारकरी आहेत. हरिपाठासारखा नित्यपाठ आहे. अन् रामकृष्णहरीसारखा उघडा मंत्रही आहे. 

कारण, उघडा मंत्र जाणा | रामकृष्णहरी म्हणा ।। असे संप्रदायामध्ये म्हटले जाते. तसेच रामकृष्णहरी विठ्ठल केशवा | मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। असेही संतवचन आहे. म्हणजे “रामकृष्णहरी  ” हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. तोही उघडा आहे. पडद्याआड झाकून द्यायचा, कानात सांगावयाचा असा मंत्र नाही. 

हे सारे ठसठशीत उघड सत्य असताना मग सारे वारकरी अनेक कीर्तनात, भजनात, दिंडीत, अगदी आळंदीहून देहू- -हून येणाऱ्या पालखी सोहळ्यातही वा अन्य सोहोळ्यातही ” ज्ञानोबा तुकाराम ” हा मंत्रघोष का करतात? अन् त्याचेच भजन अविरत का करतात? असा प्रश्न मला एका वारकरी अभ्यासक मित्राने केला. अन् त्या मंत्रामागची सारी कथाच त्याला उलगडून सांगावी लागली. 

हा मंत्र का निर्माण झाला? 

त्याचा पहिला उच्चार कोणी केला? कोणी ऐकला? 

त्याने तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले? 

वारकऱ्यांनी तो सहज स्वीकारला का? 

कारण वारकरी हा कोणतीही गोष्ट पारखून घेणारा आहे ना? ही प्रश्नाची मालिकाच त्याने मजपुढे उभी केली. अन् मग त्याला सारे बैजवार सांगावे लागले. 

तेच साऱ्या वारकरी बांधवांना ज्ञात आहे. पण इतर समाजालाही कळावे, नव्याने वाचन चिंतन अभ्यास करणाऱ्यांनाही कळावे, म्हणून हा कथा प्रपंच——

सूर्य बुडाला. सांज पडली. सर्वत्र सामसुम झाली. रातकिड्यांनी किर्र करीत कोपरे धरून आरडायला सुरुवात केली. अंधार अजून वाढला. रात्र पडायच्या आत गावी पोहोचायला हवं. म्हणूनच गाडीवानाने बैलं दामटली. बैलांना पराण्या टोचटोचून गाडीवान हैराण झाला होता. पण अंतरच एवढं होतं की बैलं  काय करणार ? कितीही पळून पळूनही  ते अंतर पार पडणार नव्हतं. बैल घामाने निथळत होते. तोंडाने फेस पडत होता.

आत बैलगाडीत बसलेले ग्रहस्त चिंतातुर होते. तोंडाने नामस्मरण चाललं होतं. चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. गाडीवाटेचा रस्ता शेताशेतातून वळणे वळसे घेत दौडत होता. त्यात रात्रीचा अंधार होता म्हणून गाडीत लावलेला दिवा फुरफुरत होता. बैलाच्या गळ्यातल्या चंगाळ्या खुळखुळत होत्या. गाडीवानाचा ओरडाआरडा, बैलांच्या पायाचा  खडखडाट, दिव्याच्या फुरफुरण्याच्या आवाजात भर घालत होता. गाडीतल्या गृहस्थाची चिंता, तगमग वाढत होती. चिंता  प्रवासात रात्र झाल्याची, गाव अजून न आल्याची होतीच. पण त्याहून जास्त ती होती ते नित्यनेमाचं देवदर्शन आज बुडल्याची. आज पांडुरंग आपल्याला अंतरला याची.

भल्या पहाटे कामास्तव बाहेरगावी आलो. तेव्हा वाटलं की संध्याकाळी लवकर घरी परतू. नित्याचे देवदर्शन घडेल. देवदर्शनाच्या नियमाला अंतर पडणार नाही हा विचार होता. पण कामाच्या रामरगाड्यात दिवस कधी उलटला आणि सांज झाली ते कळलंच नाही. तरी गडबडीने आवराआवर करून निघेस्तोवर उशीर झालाच. आजपावेतो देवाचं नित्य दर्शन झाल्याशिवाय दिवस गेला नव्हता.आज मात्र दैवाने उशीर केला. गावी, घरी परतेपावेतो रात्र झाल्याने गर्दी ओसरलेली असेल,आरती होऊन मंदिर बंद होईल. काय करावं कळेनासं झालं. रात्रीच्या काळोखाबरोबर चिंता वाढत होती. गाडीवानाच्या आणि बैलांच्या गोंगाटाने त्यात भर पडत होती. चंगाळ्यांचा खुळखुळाट अन् गाडीच्या चाकाच्या धावांचा खडखडाट क्षणाक्षणाला त्यात वाढ करीत होता. तोंडाने सतत ” रामकृष्णहरि ” म्हणत देवाचा धावा चालूच होता.

अखेर गाव आलं. सगळीकडे एकदम चिडीचूप झालं होतं. वेशीवरचा तराळ एके हाती फुरफुरणारी मशाल अन् दुसरे हाती लखलखणारा भाला चमकवीत गाडीजवळ आला. त्याने पुसलं, ” कोण हायं? “

तशी आतली व्यक्ती बाहेर पडली.  त्यांनी जवळजवळ गाडीतून उडीच मारली. डोक्यावरचं पागोट, अंगरखा उपरण्याचं बोचकं काखेला लावून त्यानं देवाकडे, देवळाकडे पळायला सुरुवात केली. तराळानं ओळखून जोहार घातला खरा. पण त्याच्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं. त्याचं चित्त होतं देवळाकडं, देवाकडे. 

धावत धावत रावळाच्या पायऱ्या मोठ्या मोठ्या ढांगा टाकत त्यांनी पार केल्या. सोबतच्या माणसाकडे पळता – पळता हातातले कापडे टाकून घरी द्यायला सांगितली. आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments