? इंद्रधनुष्य ? 

☆ अंधारातून प्रकाशाकडे..… ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆

खूप वर्षापूर्वी `रिडर्स डायजेस्ट’ मध्ये  वाचलेली ही कथा. ती मनाच्या कुपीत कायमची वसली.

तेरा-चौदा वर्षाचा अंध मुलगा डेव्हिड हार्टमन,  आपल्या बाबांना मोठ्या उमेदीने विचारतो, `बाबा… अगदी मनापासून सांगा हं… मी डॉक्टर होऊ शकेन?’

स्वभावाने प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले त्याचे बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. गहन विचारात गढून जातात. `काय सांगायचं या अंध मुलाला? पण या अति उत्साही आणि उमद्यामुलाचा तेजोभंग तरी कसा करायचा?’

ते म्हणतात, `डॉक्टर? बेटा, तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल? तू प्रयत्न करशील ना?’

जन्मताच डोळ्याच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन आलेला डेव्हिड, आठ वर्षाचा झाला आणि त्याला पूर्ण अंधत्व आलं. तेव्हापासून तो आपल्या बाबांना, `मी हे करू शकतो का?.. ते करू शकतो का?…’ असं सतत विचारायचा.

दहा वर्षाचा असताना त्याने बाबांना विचारले, `बाबा, मीबेसबॉल खूळू शकेन?’

`वेल, चल! प्रयत्न करूया.’ त्याचे बाबा म्हणाले. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला. बाबांनी तो बॉल जमिनीवरून सरपटत त्याच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. डेव्हिड हळूहळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून बॉल पकडायला शिकला. नंतर तो बॅटिंग शिकला. गवतातून फिरत येणार्‍या बॉलचा आवाज एकदम आतून ऐवकून तो बॉल कॅच करायला शिकला. काही काळाने त्याने यात प्राविण्य मिळवले.

Realm of possibility . काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात… या तत्वानुसार डेव्हिडच्या कुटुंबाने दृढ निश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी बनवायला सुरुवात केली. काही वेळा काहीच न दिसल्यामुळे तो रडायला लागायचा आणि म्हणायचा, `ममा, मी काहीच करू शकत नाही.’ मग त्याची आई त्याला कुशीत घेऊन म्हणायची, `माहीत आहे रे…’  डेव्हिडची बहीण बार्बरा मात्र कठोर होती. अर्थात त्याच्या भल्यासाठीच. आपलं ब्रेलचं घड्याळ जर पहिल्या मजल्यावर विसरला, तर डेव्हिड तिला आणून द्यायला सांगायचा. बार्बारा म्हणायची, `तुझा तू जा आणि आण. तुला काायवाटतं, कायम तुझ्यादिमतीलाकुणी ना कुणीअसणारआहे?’

तर असा डेव्हिड मोठा होऊ लागला. त्याला नक्की कळलं, की अंधत्व ही ट्रॅजिडी नाहीये. आपण काहीही करू शकतो. त्याचा हा आत्मविश्वास दिवसेंदिवस बळावत गेला.  तेराव्या वर्षी त्याने आपल्या आई-बाबांना आणि बहिणीला सांगून टाकलं, की त्याला डॉक्टर व्हायचय….

डेव्हिडने शिक्षणाचा मार्ग नक्की केला आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरू केला. त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव `हारटाउन्स हायस्कूल’ मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of possibility चं.. तत्व मान्य होतं, तरीही… मनोदोषचिकित्सक होणं, त्या Realm of possibilityच्या  नक्कीच बाहेरचं होतं. त्यांना वाटत होतं, डेव्हिडची महत्वाकांक्षा मूर्खपणाची आहे. कॉलेजमध्ये त्याच्या शिक्षकांनीदेखील त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, `तुझ्या आवाक्यातले इतर विषय का निवडत नाहीस?  म्हणजे इतिहास वगैरे…’  

डेव्हिड म्हणाला, `मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये. `मला दिसत नाही, हे खरय, पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतंच! मला वाटतं,  जे कुणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत,  ते खरं तर अपंग आहेत. मी Psychiatrist  व्हायचं ठरवलय, कारण माझा माझ्यावर ठाम विश्वास आहे. मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकेन.’

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात त्याची भेट, मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या चेरील वॉकरशी झाली. हिरवे डोळे असलेली ही चेरील वॉकर अतिशय हुशार होती. नंतर त्यांच्या मैत्रिचं रुपांतर त्यांच्या प्रेमात झालं. १९७२ मध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त मार्क  मिळाले.

डेव्हिडने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. त्यापैकी आठ कॉलेजेसनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला. २७ एप्रीलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजमधूनही नकाराचं पत्र मिळालं. त्याला वाटत होतं, की हे कॉलेज तरी त्याला प्रवेश देईल. पण इथेही नकारच आला.  डेव्हिड मनातून एकदम खचला. हताश झाला.

फिलाडील्फियामधलं दहावं कॉलेज, टेंपल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन… त्याचे असिस्टंट डीन आणि प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख होते, डॉ. एम. प्रिन्सब्रिगहॅम. त्यांनी डेव्हिडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं, `जर आपण ऑलिम्पिकच्या समीतीत असतो, आणि शंभर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता,  तर आपण त्याला धावू दिलं असतं ना!…  डेव्हिडने आधीच अनेक अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या करून स्वत:ला सिद्ध केलंआहे. आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया, तो कुठपर्यंत जातो.’

दुसर्‍या दिवशी डेव्हिडला त्याच्याआईचा फोन आला,  तीम्हणाली, `तू खूप दिवस ज्याची वाट पाहात होतास, ते पत्र तुला आलय. ‘ त्याच्या आईचा आवज दाटून आला. तिला पुढे फोनवर बोलणं अशक्य झालं. बार्बाराने फोन घेतला आणि म्हणाली, `यू हॅव डन इट….’ तिलादेखील अश्रू आवरले नाहीत. `तुला  टेंपल युनिव्हर्सिटीने स्वीकारलय. ‘ आणि डेव्हिड ध्येयाच्या वाटेवर चालू लागला.

वाट बिकट होती. डेव्हिडला त्याची कल्पनाही होती. पण त्याला डोंगरमाथा आणि तिथूनदिसणा रंनिसर्गाचं दिव्य रूप… त्याचं ध्येय दिसत होतं.

सुरुवातीलाच त्याला अ‍ॅनाटॉमीच्या इंट्रोडक्टरी कोर्सेसच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या. हातात रबराचे ग्लोव्हज घालून, अनेक मोठे अवयव  तो चाचपून ओळखायला लागला. पण लहान अवयव विशेषत: nerve plexuses ओळखायला त्याला  ग्लोव्हज काढावे लागले. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधीर होत. हे सगळं चालू असताना डेव्हिडने या विषयांना अनुसरून असलेली असंख्य पुस्तके विकत घेतली. या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिकाही विकत घेतल्या.

मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेव्हिड आणि चेरीने लग्न केले. तिसर्‍या  वर्षात असताना खरं आव्हान सुरू झालं. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं सुरू झालं. त्याला x-ray बघता येत नसल्याने,  तो कान,  डोळे, तोंड आपल्या सहकार्यांच्या वाचून तपासू शकत नसे. x-ray चं वर्णन त्याला त्याचे सहकारी किंवा नर्स सांगतील, त्याप्रमाणे त्याला उपचार करावे लागत. त्या बाबतीत तो त्यांच्यावर अवलंबून होता, पण पुढे त्यानेस्टेथॉस्कोप आणि स्पर्शज्ञान खूप विकसित केलं.

२७मे १९७६ला त्यालामेडिकलची डिग्री मिळाली. त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली, की तो इतरांपेक्षा वेगळा नाही. त्याला अगोदर नकार देणा प्रोपफेसरही पदवीदान समारंभाला आले होते. ते म्हणाले, ` David is not normal… he is super normal…’

अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक लोक त्याच्या जिद्दीवर, अथक परिश्रमावर, दिगंत आत्मविश्वासावर भरभरून बोलले. RFB चे प्रेसिडेंट जॉन कॅसल, त्याचं कौतुक करताना म्हणाले, माणसाच्या अत्युच्च तेजाचं हे दर्शन आहे.’ भाषण संपवताना ते म्हणाले, `डेव्हिडच्या या उदाहरणाने, आपल्याला एक नवीन विश्वास मिळालाय, तो म्हणजे,  माणसाला काहीही मिळवणं शक्य आहे.’     

सभागृहातील सगळे जण त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले.

डेव्हिडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं,  `माझ्या बाबांचं बरोबर होतं. ते म्हणायचे, प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल, तू काय करू शकशील ते?’

आपण आपल्याकडे सगळं आणि भरभरून असलं, तरी `हे नाही, ते नाही’, म्हणून रडगाणं गातो. डेव्हिडचं आभाळाएवढं कर्तृत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.

 

संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments