सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगण्याचा तोल ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(एका स्पॅनिश कवितेचा मुक्त अनुवाद)

पाऊस पडून गेला की

आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमलतं;

त्याला पाहून मातीनं रुसावं का?

सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास,

मला काय दिलंस?  म्हणून भांडावं का?

*

नाहीच भांडत ती,

मान्य करून टाकते की,

त्याचं रंगहीन होऊन आपल्याकडे येणं,

उगीच मनाला लावून घ्यायचं नाही,

त्या कोरडय़ा सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं    !

*

तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं;

पण तो तिला जगण्याची,उमलण्याची, 

स्वत:तून रंग फुलवण्याची जादू देतो.

त्या जादूनं,

काळ्या मातीतून किती रंग उमलतात,

आणि रंगच कशाला,

किती गंध, किती आकार,

किती प्रकारचं जगणंही बहरतं !

क्षणभर उजळणाऱ्या रंगापेक्षा

स्वत: अनेक रंगांत उमलण्याची जादू 

म्हणून तर काळ्या मातीला

किती युगं झाली, तरी हवीच असते त्याच्याकडून.

*

जगण्याचा तोल हा असा असतो !

कुणाला क्षणभराचे रंग मिळतात,

कुणाला सुंदर क्षण मिळतात,

कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं,

तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज.

त्यातून आपापलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.

एकदा ती जादू आली की,

रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत,

ते उमलत राहतात,

बहरत राहतात….. 

**

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments