सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आरती म्हणजे काय व आरतीची उत्पत्ती कशी? ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आरती म्हणजे औक्षण. ‘ शब्द कल्पद्रुम ‘ नावाचा ग्रंथ आहे, त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा.-बस संपली आरती. आरती म्हणण्याची प्रथा कधी सुरु झाली हा थोडा संशोधनाचा विषय. महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींच्या काही आरतीसदृश रचना आहेत असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वरांनी काही अशा रचना केल्या होत्या, पण त्या भगवतगीतेचं कौतुक करणाऱ्या. माझ्या मते हा प्रकार श्री रामदासस्वामी या लोकोत्तर संताने चालू केला असावा.  जशी त्यांनी मारुतींची स्थापना केली, व्यायामशाळा चालू केल्या, त्याच पद्धतीने समाज एकत्र यावा, मोंगलांची त्यांच्या मनातील भीती कमी व्हावी, म्हणून हा प्रपंच मांडला होता का ? राम जाणे. एवढी छान पूजा केली आहे तेव्हा देवाला ‘ येई हो विठ्ठले ‘ म्हणून संगीत आवतण आर्ततेने द्यायचं. यात खूप आरत्या त्या देवाच रूप, काम सांगणाऱ्या आहेत, आणि शेवटी ‘ देवा तू ये ‘ अशी आळवणी. आणि या आळवणीला देव प्रतिसाद देतो तो प्रसाद अशी समजूत .

अथर्ववेदाचे एक परिशिष्ट वाचायला मिळाले, त्यात एक गोष्ट वाचली. राक्षसांच्या पुरोहिताने काहीतरी मंत्रप्रयोग करून, इंद्राची झोप उडेल म्हणजे निद्रानाश होईल असे काहीतरी केले. इंद्र त्रस्त झाला व त्याने बृहस्पतीना यासाठी उपाय विचारला. तेव्हा बृहस्पती म्हणाले की “ मी तुला एक उपाय सांगतो त्याला अरार्त्रिक म्हणतात. एक तबक घेऊन त्यात वेगवेगळी फुले ठेव व एक त्यात दीप लावून सुवासिनीकडून औक्षण करून घे. व हे करताना एक मंत्र म्हण. यामुळे तुला या त्रासातून मुक्ती मिळेल.” या अरात्रिकामधून आरती या विषयाचा जन्म झाला. देवाला झोपविण्यासाठी पहिली आली ती शेजारती. मग त्याला परत उठविण्यासाठी आली ती काकडआरती. पूजेनंतर ५ वाती किवा दिव्याने ओवाळून करायची ती पंचारती. एकच दिवा असेल तर एकारती, धूप जाळला असेल तर धुपारती, कापूर असेल तर कापूरारती . 

समर्थांनी जवळ जवळ ८० ते ८२ आरत्या लिहिलेल्या आहेत. सर्व अत्यंत प्रासादिक. गेली ४०० वर्ष याची मोहिनी जनमानसावरून उतरलेली नाही. एखाद्या महान व्यक्तीच्या काव्याला, शब्दांना मंत्राचं पावित्र्य येत ते असं. याला म्हणतात चिरंजीविता .यात एक गम्मत अशी की रामदास हे काही आजच्यासारखे संधीसाधू ,दलबदलू नाहीत. गणपती बाप्पा असो की  मारुतीराया असो, की कुठलीही देवी असो, आरतीमध्ये तिचे गुणगान करतील, पण प्रत्येक आरतीमध्ये शेवटी त्या देवाला ‘ साहेब तुमचं मी कौतुक केलं असलं, तरी मी दास रामाचा ,’ ही आठवण ते करून देतातच. रामदासांनी अनेक आरत्या लिहिल्या आहेत. सर्व सुंदर आहेत. त्यातील देवतांची वर्णनंही खूप सुंदर. 

पण या आरतीपेक्षा संत एकनाथांनी लिहिलेली दत्ताची आरती एक वेगळी आणि सुंदर आहे. या आरतीचे स्वरूप इतर आरत्यांच्यापेक्षा वेगळे अशाकरिता की कुठल्याही आरतीत त्या देवाचे रूपवर्णन, त्याचे पराक्रम आणि नंतरच्या कडव्यामधून साधारण फलश्रुती असा प्रकार असतो. पण दत्ताच्या आरतीत ‘ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ‘, ‘अभाग्यासी कैची कळेल हि मात ‘ अशा ओळी आहेत. म्हणजे थोडक्यात, मला तो कळलाच नाही असा पहिल्या दोन कडव्यात स्वानुभव आहे व उरलेली दोन कडवी फलश्रुती आहे. याचे कारण असे की एकनाथ महाराज त्यांच्या गुरूच्या म्हणजे जनार्दनस्वामी यांचेकडे हट्ट धरून बसले की मला दत्त महाराजांचे दर्शन घडवा. जनार्दनस्वामींनी त्यांना दौलताबाद येथे किल्ल्यावर बोलावले. एक दिवस एक योगी एकनाथ महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. एकनाथांनी त्यांना आपण कोण असे विचारले, तेव्हा तो योगी त्यांना आशीर्वाद देऊन न बोलता निघून गेला आणि नंतर जेव्हा जनार्दनस्वामी हसले तेव्हा एकनाथ महाराजांना समजले की दत्तमहाराज दर्शन देऊन गेले. तेव्हा ही आरती एकनाथ महाराजांनी तेथे लिहिली आणि ते लिहून गेले– ” सबाह्याभ्यंतरीं तू एक दत्त ,अभाग्यासी कैची कळेल ही मात “–फारच सुंदर चुटपूट .

मंडळी मी या विषयातील तज्ञ नाही. मी जे वाचतो, ऐकतो ते मित्रमंडळींना सांगावे, एवढीच इच्छा असते .

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments