डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त ) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र
देवता – १ ते ३ वायु; ४ ते ६ इंद्रवायु; ७ ते ९ मित्रावरुण
मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री
वाय॒वा या॑हि दर्शते॒मे सोमा॒ अरं॑कृताः । तेषां॑ पाहि श्रु॒धी हव॑म् ॥ १ ॥
सर्व जना आल्हाद देतसे हे वायू देवा
येई झडकरी तुझे आगमन होऊ दे देवा
सिद्ध करुनिया सोमरसा या उत्तम ठेविले
ऐक प्रार्थना अमुची आता दर्शन तव होऊ दे ||१||
वाय॑ उ॒क्थेभि॑र्जरन्ते॒ त्वामच्छा॑ जरि॒तारः॑ । सु॒तसो॑मा अह॒र्विदः॑ ॥ २ ॥
यागकाल जे उत्तम जाणत स्तोत्रांचे कर्ते
वायूदेवा तुझियासाठी सिद्ध सोमरस करिते
मधुर स्वरांनी सुंदर स्तोत्रे महती तुझी गाती
सत्वर येई वायूदेवा भक्त तुला स्तविती ||२||
वायो॒ तव॑ प्रपृञ्च॒ती धेना॑ जिगाति दा॒शुषे॑ । उ॒रू॒ची सोम॑पीतये ॥ ३ ॥
विश्वामध्ये शब्द तुझा संचार करित मुक्त
श्रवण तयाचे करिता सिद्ध सर्व कामना होत
सोमरसाचे पान करावे तुझी असे कामना
तव भक्तांना कथन करूनी तुझीच रे अर्चना ||३||
इन्द्र॑वायू इ॒मे सु॒ता उप॒ प्रयो॑भि॒रा ग॑तम् । इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि ॥ ४ ॥
सिद्ध करुनिया सोमरसाला तुम्हासि आवाहन
इंद्रवायु हो आता यावे करावाया हवन
सोमरसही आतूर जाहले प्राशुनिया घ्याया
आर्त जाहलो आम्ही भक्त प्रसाद या घ्याया ||४||
वाय॒विन्द्र॑श्च चेतथः सु॒तानां॑ वाजिनीवसू । तावा या॑त॒मुप॑ द्र॒वत् ॥ ५ ॥
वायूदेवा वेग तुझा हे तुझेच सामर्थ्य
बलशाली वैभव देवेंद्राचे तर सामर्थ्य
तुम्ही उभयता त्वरा करावी उपस्थित व्हा अता
सोमरसाची रुची सर्वथा तुम्ही हो जाणता ||५||
वाय॒विन्द्र॑श्च सुन्व॒त आ या॑त॒मुप॑ निष्कृ॒तम् । म॒क्ष्वै॒त्था धि॒या न॑रा ॥ ६ ॥
अनुपम आहे बलसामर्थ्य इंद्रवायुच्या ठायी
तुम्हासि प्रिय या सोमरसाला सिद्ध तुम्हापायी
भक्तीने दिव्यत्व लाभले सुमधुर सोमरसाला
सत्वर यावे प्राशन करण्या पावन सोमरसाला ||६||
मि॒त्रं हु॑वे पू॒तद॑क्षं॒ वरु॑णं च रि॒शाद॑सम् । धियं॑ घृ॒ताचीं॒ साध॑न्ता ॥ ७ ॥
वरद लाभला समर्थ मित्राचा शुभ कार्याला
वरुणदेव हा सिद्ध राहतो अधमा निर्दायला
हे दोघेही वर्षा सिंचुन भिजवित धरित्रीला
भक्तीपूर्वक आवाहन हे सूर्य-वरुणाला ||७||
ऋ॒तेन॑ मित्रावरुणावृतावृधावृतस्पृशा । क्रतुं॑ बृ॒हन्त॑माशाथे ॥ ८ ॥
विश्वाचा समतोल राखती वरूण नी सूर्य
पालन करुनी पूजन करती तेही नियम धर्म
धर्माने नीतीने विभुषित त्यांचे सामर्थ्य
आवाहन सन्मानाने संपन्न करावे कार्य ||८||
क॒वी नो॑ मि॒त्रावरु॑णा तुविजा॒ता उ॑रु॒क्षया॑ । दक्षं॑ दधाते अ॒पस॑म् ॥ ९ ॥
सर्वउपकारी सर्वव्यापी मित्र-वरूणाची
अपूर्व बुद्धी संपदा असे जनकल्याणाची
व्यक्त होत सामर्थ्य तयांचे कृतिरूपातून
फलश्रुती आम्हासी लाभो हे द्यावे दान ||९||
©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री
९८९०११७७५४
या सूक्ताचा शशांक दिवेकर यांनी गायलेला आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी चित्रांकन केलेला व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यासाठी लिंक देत आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt
Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt
भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈