श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची ‘ बैल ’, कवी शंकर बोराडे यांची ‘ गांधी ’, लक्ष्मण महाडिक यांची ‘ माती ’,लता पवार यांची ‘आपली मैत्रीण ’, प्रा.व.ना.आंधळे यांची ‘ आई,मला जन्म घेऊ दे ’, असे कवी आणि त्यांच्या कवितांमध्ये हरवून जायचं असेल तर तुम्हाला नाशिक-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावरील ‘ रिलॅक्स कॉर्नर ’ हे उपहारगृह गाठावं लागेल. भीमाबाई जोंधळे या सत्तर वर्षाच्या तरुण आजी हे उपहारगृह चालवत असून त्यांचं अनोखं पुस्तकप्रेम बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या या उपहारगृहामध्ये पोटाच्या भुकेबरोबर वाचनाची भूक भागविण्यासाठी हजारो मराठी पुस्तके आहेत. 

पुस्तकं चाळता चाळता न्याहारी घेण्याची अनोखी शक्कल भीमाबाईंनी चालवली आहे. वय झालं म्हणून भीमाबाई हात बांधून बसल्या नाहीत. त्यांच्या हाताने बनलेली मिसळ आणि झुणका भाकर खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. केवळ चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या या आजी सकाळी चार वाजता उठतात. गेल्या बावीस वर्षांपासून त्या पेपर एजन्सी चालवत असून मोहाडी, जानोरी, सय्यद पिंप्री आदी ठिकाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. सकाळी गठ्ठे बांधून त्या विक्रेत्यांना देत असतात. हे काम करता करताच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्याचे त्या सांगतात. त्यांचं शिक्षण खतवड शाळेत झालं. मोहाडीच्या देशमुख आणि धनगर गुरुजींचे संस्कार त्यांना मिळाले. शाळेत अण्णासाहेब कवडे यांच्या हाताने मिळालेल्या पाच रुपयांच्या आरश्याचे बक्षीस जीवनाला वेगळीच दिशा देऊन गेल्याचे त्या सांगतात. 

लग्न झाल्यावर अवघ्या दोन एकर जमिनीत त्या स्वतः पिके घेत असत. सहा रुपये रोजाने देखील त्या काम करीत असत. महामार्गावर बारा वर्षापूर्वी एक छोटी टपरी टाकून त्यांनी हॉटेल सुरु केलं. तेव्हाच वृत्तपत्र टाकण्याचे काम देखील सुरु झालं. मराठी वाचन माणसाला सुसंस्कृत बनवत असते याचा अनुभव आल्याचे सांगत, दोन तीन कविता देखील त्या म्हणून दाखवतात. कवी दत्ता पाटील यांनी देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. विशेष म्हणजे टपरीतून एका छोट्या हॉटेलपर्यंत त्यांचा प्रवास बघावयास झाला आहे. भीमाताईंनी नोटाबंदीच्या काळात अनेक भुकेलेल्यांना मोफत जेवण दिलं होतं. भीक मागणाऱ्यांना पैसे न देता खाऊ घालण्याची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यांच्या उपहारगृहामध्ये प्रत्येक टेबलावर दोन पुस्तके ठेवलेली असतात. बाळा नांदगावकर,भाई जगताप,अरुण म्हात्रे, अतुल बावडे,बाबासाहेब सौदागर अश्या ज्येष्ठ, नामांकित साहित्यिक, कवींनी या हॉटेलला भेट देऊन आजींच्या कार्याचा गौरव केला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल तर त्याला एक पुस्तक आजी भेट देतात. मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे आणि पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे या उद्देशाने त्या पुस्तक वाचन चळवळ चालवत आहे. आता मुलगा प्रवीण हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. त्याने आज पर्यंत तब्बल ७२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सून प्रीती यादेखील त्यांना या कामात मदत करीत असतात. 

पुस्तकांसोबत या हॉटेलमध्ये पारंपरिक वस्तू देखील बघायला मिळतात. पाटा, वरवंटा आदी वस्तू मुलांना दाखवून त्या कशा वापरायच्या याचं प्रात्यक्षिकही त्या देत असतात. मराठी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रिलॅक्स कॉर्नरला भेट द्यायला हवी.

भीमाबाई सांगतात, “ मी गेली बावीस वर्ष वृत्तपत्र वाटपाचा व्यवसाय करते आहे. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. आज आमच्याकडे शेकडो पुस्तके आहेत. त्याचे वाचन करण्यासाठी नाशिकमधून नागरिक येतात याचं समाधान वाटतं. ही पुस्तक चळवळ व्यापक व्हावी हीच अपेक्षा आहे.

– प्राची उन्मेष, नाशिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments