? इंद्रधनुष्य ? 

☆ बेअरफुट काॅलेज:सुशिक्षितांच्या अहंकाराला दिलेली चपराक..… ☆ संग्राहक – श्री सतिश वि  पालकर ☆

जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे –

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

संग्राहक : श्री सतिश वि  पालकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments