इंद्रधनुष्य
☆ कालबाह्यतेचा सापळा.. ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆
जानेवारी १९२५…
स्वित्झर्लॅंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एक खास उद्योगसमूहाने एक गुप्त सभा आयोजित केली गेली होती.
विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीचे उत्पादक त्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते.
बल्बचा शोध लागून एव्हाना नव्वद वर्ष झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते पण त्यात प्रचंड सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्य असणारे दर्जेदार आणि दिर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खूश होती. पण कोणालातरी बल्बचे इतके दीर्घजीवी असणे खटकत होते.
ते कोण होते?—-
साक्षात बल्ब उत्पादक…
कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृतीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
जिनिव्हाच्या त्या मिटींगमध्ये इंटरनॅशनल जनरल इलेक्ट्रिक,ओसराम, फिलिप, टंगस्राम, असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, या सर्व जागतिक आघाडीच्या बल्बनिर्मात्यांनी एक गुप्त करार केला.—- ‘ आपल्या दीर्घकालीन हितासाठी आणि येणाऱ्या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील.’ —–
त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले. पूर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले.
१९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले. आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली. खप वाढला. निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किंमतीत विकून कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लूटले होतेच. आता आयुष्यमान कमी झाल्यामुळे विक्रीही दुप्पट तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली.
उत्पादनाचा दर्जा घसरवूनही पैसे कमवता येतात हे नवेच गुपित उद्योगजगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणाऱ्या कंपन्यांना ‘ फिबस कार्टेल ‘ या नावाने ओळखले जाऊ लागले. वस्तूंचा दर्जा घसरवून पैसे कमवण्याच्या त्यांच्या क्लूप्तीला म्हणतात— “ प्लॅन्ड ओबसोलेसेंस.’
खरंतर हा सापळा आहे. मराठीत याला ‘ नियोजित अप्रचलन ‘ असे म्हणता येईल.— सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करुन ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे वर्णन करता येईल.
दहा पंधरा वर्षापूर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच पाच वर्ष चालायचे. हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन तीन वर्षापेक्षा जास्त टिकूच शकत नाही—- कारण तेच—– नियोजित अप्रचलन.
जाणून बुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन चार वर्षात फोन निकामी व्हावा. जुने उत्पादन टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल?— लाखो कोटी रुपयांचा बिजनेस हवा असेल तर पूर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.
आजची बहूतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात. पूर्वीचे टीव्ही वीस वीस वर्ष चांगले चालायचे. आताच्या एल ई डी मधे पाच सात वर्षात पट्ट्यापट्ट्या दिसायला लागतात.
१००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारच्या ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही.—- कारण मग सोन्याची अंडी देणारा बिजनेस कायमचा बसेल.
लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता पेन कचऱ्यात फेकून नवीन पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आजही जेव्हा पेनच्या रिफीलचा शोध घेतो तर बहुतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत.—-
कारण तेच—- मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?
या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामुळेच “ वापरा आणि फेका “ नावाचा भस्मासुर जन्माला आला.
सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रुपांतर व्हायला लागले—-
—कपडे विटले, फेकून द्या— शुज उसवले, फेकून द्या— लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या— इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या— मिक्सर बिघडला, नवीन घ्या — वॉशिंग मशीन खराब झाली, नवे मॉडेल घ्या.
—पंधरावीस वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअरपार्ट मिळत नाहीत, आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो.
—एकदा माऊस कीबोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो.
—लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आलेली आहे.
फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रॅंड न्यू डिझाईन लॉंच केली जाते.
—संघ तोच — खेळाडू तेच — प्रत्येक मौसमात अवतार मात्र नवा असतो.— कारण प्रेक्षकांना शर्टपॅंटचे नवे जोड विकायचे आहेत— चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते — सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे असा दृष्टिकोन टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो.
भारतात कमी असले तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.
नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे. —- तो म्हणजे ‘ समंजस अप्रचलन ‘ (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस).—–
—–यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात, असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते.
—-जाणूनबुजून आणि प्रयत्नपूर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्यूनगंड निर्माण केला जातो.
—–एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्व अधुरे अपूर्ण आहे असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते.
—-साधे भोळे लोक खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात अलगद अडकतात.
—-स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणि आवश्यकता नसताना कधी मजबुरीने नवी खरेदी करतो.
—-त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.
—- कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरूच असते. कोणतीही नवी खरेदी करण्याआधी ‘ मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का ‘ याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते.
लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही. येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो. नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते—- महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे.— आधी भरपूर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात.
——आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमवला नाही आणि जो सत्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान.
——वस्तूंना रुपयां-पैशात तोलणारी माणसं खरी कर्मदरिद्री. ती बनवण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती, त्याच्या निर्मितीसाठी घेतले गेलेले कष्ट या सर्वांचे मोल ज्याला समजले तो खरा सुजाण…
बिजनेस माईंडच्या चतुर पण मुठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे. श्रीमंत लोकांच बरं आहे.
ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात.—– पण गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात.
जल-प्रदूषण, भू-प्रदूषण आणि हवा-प्रदूषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्र्यरेषेवर झगडणाऱ्या नाजूक नाशवंत लोकसंख्या घटकावरच होतो.
हे बदलायला हवे.—-
—तुम्ही तयार आहात का? प्रत्येक खरेदी सजगपणे करा— वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका.
अप्रचनलाचे नवे बळी बनू नका…!!
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈