इंद्रधनुष्य
☆ हयातीतच मृत्यूची बातमी ????… लेखिका : सुश्री मानसिंगराव कुमठेकर ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
ब्रेकिंग न्यूज देण्याच्या घाईत, शहानिशा न करता एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनाची बातमी देण्याचा उतावीळपणा करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूच्या बाबतीत गेले काही दिवस विविध माध्यमांनी केलेला उतावीळणा चर्चेचा विषय बनला आहे.
मात्र, असा प्रकार आत्ताच घडतोय असे नाही. घाईगडबडीत कोणतीही चौकशी न करता निधनाची बातमी देण्याची परंपरा जुनीच असल्याचे आढळते. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या ख्यातनाम वृत्तपत्राने ८ जुलै १९२२ च्या अंकात, मिरजेचे सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विल्यम वॉनलेस हयात असताना, त्यांच्या निधनाची बातमी अशाच पद्धतीने कोणतीही शहानिशा न करता दिली होती.
या बातमीमुळे त्यावेळी भारतासह अमेरिकेत मोठी खळबळ माजली होती. मात्र डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याचे समजताच न्यूयॉर्क टाइम्सने १३ जुलै १९२२ रोजी पुन्हा खुलासावजा बातमी प्रसिद्ध केली.– ‘ डॉ. वॉन्लेस अजूनही हयात आहेत ‘ (डॉ. वॉन्लेस स्टील अलाइव्ह)— अशा मथळ्याची खुलासा करणारी बातमी छापण्याची नामुष्की न्यूयॉर्क टाईम्सवर आली. डॉक्टर वॉन्लेस हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धन्वंतरी होते. मूळचे अमेरिकेचे असलेल्या वॉन्लेस यांनी मिरजेमध्ये मिशन इस्पितळ नावाची मोठी संस्था उभी केली. दक्षिण महाराष्ट्रातील राजे राजवाड्यांसह अनेक गोरगरीब लोक त्यावेळी मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत असत. डॉक्टर वॉन्लेस यांनी निरपेक्ष भावनेने केलेल्या रुग्णसेवेमुळे ते देशातच नव्हे तर जगभर वाखाणले गेले. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘ कैसर ई हिंद ‘ आणि ‘ सर ‘ या मानाच्या पदव्या बहाल केल्या. पुढे ३ मार्च सन १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मात्र तत्पूर्वीच सन १९२२ मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी तत्कालीन न्यूयॉर्क टाइम्स या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध झाली होती .कोणतीही शहानिशा न करता सदर दैनिकाने ही बातमी छापली. मात्र चहूबाजूनी टीका झाल्यानंतर पाच दिवसांनी न्यूयॉर्क टाइम्सने आपली चूक सुधारत डॉक्टर वॉन्लेस हयात असल्याची बातमी खुलासाच्या स्वरूपात छापली होती. पुढे डॉ. वॉन्लेस दहा वर्षे हयात होते.
लेखिका : सुश्री मानसिंगराव कुमठेकर
मो – 9405066065
संग्राहिका – माधुरी परांजपे