सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ आठवणीतील सांस्कृतिक पुणे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी, किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासूनच्या कालखंडात पुणे हे एक छोटेखानी पण टुमदार, आटोपशीर गाव होतं…” पुणे शहर ” झालेलं नव्हतं….
सदाशिव, शनिवार, नारायण, शुक्रवार वगैरे पेठांमध्ये वाडे एकमेकांना चिकटून, जणू एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. चोर-पोलीस खेळतांना सहज एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जाता येत असे. किंबहुना शेजारच्यांच्या घरात घुसून बिनदिक्कत कॉटखाली वगैरे लपता येत असे. लाकडी जिन्यातून कुणी भरभर खाली उतरलं की अक्षरशः ढगांच्या गडगडाटाचा आवाज येत असे. चौकात संध्याकाळी डबडा ऐसपैसचा नाहीतर इस्टॉपाल्टीचा डाव रंगत असे. फार दमायला झालं, किंवा धो धो पाऊस पडला, तर कुठे तरी वाड्यात वळचणीला बसून गाण्यांच्या भेंड्या रंगत असत. मग एक तरी सुरेल गाणारी तिखट चिमुरडी “आ जा सनम मधुर चांदनीमें हम….” हे गाणं म्हणतच असे.
किंवा देशांच्या राजधान्या ओळखणे, चेरापुंजी कशासाठी प्रसिद्ध आहे?? वगैरे “जनरल नॉलेज” च्या गप्पा होत होत,
” तुला माहितीये का ?? पाकिस्तानकडे शंभर ऍटम बॉम्ब आहेत…” किंवा ” माझे बाबा एकदा अमावास्येला शनिवारवाड्याच्या जवळून रात्री येत होते, तेव्हा त्यांनी ‘ काका मला वाचवा….’ असा आवाज ऐकला होता ”
अशा स्वरूपाच्या दंतकथा रंगत. एखादा शी – शू विहार मधला गडी मग तिथेच रडू लागे. आणि मग
” ए … कशाला रडवता रे त्याला?? ” असा सज्जड दम एखादी आई देई.
शाळांच्या पटांगणात रात्री ” गीत रामायण,” “ जाणता राजा ” यासारख्या कार्यक्रमांची रेलचेल आणि मेजवानी असे. मग रात्री भारावलेल्या वातावरणात शांत झोपी गेलेले वाडे बघत बघत घरी पायी, नाही तर सायकलवर वाटचाल करायची. क्वचित थंडीत स्वेटर, शाल, चादर पांघरून कुडकुडत घरी जायचं….. गोदरेजचं कुलूप उघडून जाड लोखंडी साखळी असलेला दरवाजा उघडायचा….. काळ्या बटनावर लागणारा पिवळा साठचा बल्ब लावायचा…. कुणाकडे हातात सेलची बॅटरीही असायची….
पुण्याचं तेव्हाचं सांस्कृतिक केंद्र म्हणजे ” भरत नाट्य मंदिर “…. मध्यंतरात भजी खायची… चहा प्यायचा…. आणि अंधारात चाचपडत येऊन आपली सीट पकडायची….
भरत नाट्य बाहेर मधू आपटे हे ज्येष्ठ अभिनेते खुर्ची टाकून बसलेले असायचे…..
कुणी नाटकानंतरही “गुडलक” “पॅराडाईज” “रीगल” वगैरे इराणी हॉटेलात तळ देत…. किंवा वाड्याच्या दारातच मध्यरात्रीपर्यंत कुडकुडत गप्पा छाटायच्या……
तेव्हाचं पुणं मध्यमवर्गीय, साधं…..पेरूगेट, नु.म.वि., अहिल्यादेवी, विमलाबाई गरवारे, हुजूरपागा या संस्कारकेंद्रांभोवती विणलेलं….. “स्वामी”… “छावा”…. “नाझी भस्मासुराचा उदयास्त”…… इत्यादि साहित्यविश्वात रमणारं होतं…… भीमसेन जोशींना अगदी समोर बसून ऐकता येत होतं किंवा भेटता येत होतं…..
ना. ग. गोरे… एस. एम. जोशी अशी थोर नेतृत्वं होती…
खरोखरच तेव्हाचं पुणं हे त्यावेळच्या पहाटेच्या सुंदर धुक्यासारखं एक गोड सांस्कृतिक स्वप्न होतं…..
सुंदर स्वप्नातून जागं झाल्यावरही त्या स्वप्नाची आठवण दिवसभर मनात रेंगाळत रहावी, तसं हे तेव्हाचं सुंदर पुणं मनात सदैव रेंगाळत राहतं……….!!!
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈