श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ असाही एक विश्वविक्रम – श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
गीता जयंती निमित्त एका विश्वविक्रमी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा अपूर्व योग नुकताच आला.
शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने लो.टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम साकारला.
सातशे विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचे सातशे श्लोक सुवाच्य हस्ताक्षरात लिहून काढले.प्रत्येकाने एक श्लोक लिहिला, व नंतर क्रमाने अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचे हे हस्तलिखित एकत्र करून अवघ्या पाच मिनिटांत श्रीमद् भगवत् गीतेचा हस्तलिखित ग्रंथ शिक्षकांना प्रदान करण्यात आला.
हा अत्यल्प वेळेत पूर्ण गीता लिहून काढण्याचा विश्वविक्रम आहे.
हा उपक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणं हा माझ्या जीवनातील एक अत्यंत रोमांचकारक अनुभव होता.
या विद्यार्थ्यांनी गेले दोन महिने यासाठी भरपूर सराव केला होता. त्यांच्या इतकेच कष्ट शाळेच्या शिक्षकांनी, पालकांनी घेतले होते.
‘ इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने या एकमेवाद्वितीय उपक्रमाची नोंद घेतली.
या अभिनव उपक्रमासाठी शिक्षण मंडळ, कराडच्या सर्व विश्वस्त, पदाधिकारी,शिक्षक/ शिक्षिका,व सर्व कर्मचारी यांनी अपार परिश्रम घेतले, व त्याला विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय साथ दिली, त्यामुळे हा विश्वविक्रम अत्यंत सुनियोजित पद्धतीने साकारला.
— शिक्षण मंडळ कराडच्या सर्व परिवाराचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने सातशे कुटुंबात श्रीमद् भगवत् गीतेचा संस्कार पोहोचला.
— अशा उपक्रमांनी समाजमन संस्कारित होते. सत्य, न्याय, नीति या दैवी गुणसंपदेचा परिचय होऊन समाज सन्मार्गावर वाटचाल करतो.
लेखक : श्री अभय भंडारी, विटा.
संग्राहक : श्री सुहास रघुनाथ पंडित.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈