श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ सिंधुदुर्गचे माणिकमोती … भास्कर पांडुरंग कर्णिक – डॉ. बाळकृष्ण लळीत ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कोल्हापूरहून कोकणात राधानगरीमार्गे जाताना फोंडाघाट लागतो. तो उतरल्यावर आपण फोंडा या गावी येतो. कविवर्य वसंत सावंत, वसंत आपटे, महेश केळुसकर हे याच परिसरातले…! पुढे प्रसिद्ध मराठी साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे गाव नि घर असलेले हे करूळ.
तेथील शाळा, ग्रंथालय, बॅ.नाथ पै प्रबोधनी हे सारे पहाण्यासारखे आहे. येथून पुढे कणकवलीकडे डावीकडे जाताना माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर.अंतुले यांच्या काळात कल्पकतेने साकार झालेले हुतात्मा स्मारक नजरेला पडते नि हात जोडले जातात.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कोण होते भास्कर पांडुरंग कर्णिक..?
– मी याविषयी माहिती घेऊ लागलो, तेव्हा माहितीच्या महाजालात त्यांच्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध झाली, ती व अन्य एक दोन संदर्भ हाती आल्यावर या महान सिंधुरत्नावर संकलन-संपादन करून येथे लिहिले आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यात करूळ या गावी भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा जन्म ७ डिसेंबर १९१३ रोजी झाला.
आपल्या जिल्ह्यात जन्मलेल्या या महान भारतीय क्रांतिकारकांचे आपण सदैव स्मरण केले पाहिजे .
पुणे येथे एका दुर्दैवी क्षणी दि.३१ जानेवारी, इ.स. १९४३ रोजी त्यांनी बलिदान केले.
☆ ☆ ☆ ☆ ☆
शिक्षण –
त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी झाले. वयाच्या १०/१२ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी कर्नाटकातील गुलबर्गा जावे लागले .
पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी. पदवी प्राप्त केली आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.
☆ ☆ ☆ ☆ ☆
मोठे धाडस — क्रांतिकारक चळवळीत भाग असलेल्या भास्करना संदेश मिळाला…
“अर्धा ट्रक बॉम्ब संपादन करा.” …..
देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते.”
अशी माहिती मिळते की,…. ”या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.”
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुणे येथील फरासखान्यात मृत्यू –
कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले? याचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. तेव्हा पुढील सर्व घटनाक्रम त्यांच्या लक्षात आला.
भास्करराव कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली आणि काही सेकंदात त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे ‘त्यांच्याकडून मोठी माहिती मिळेल’ असे वाटणार्या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.
…. असे होते हे धाडसी करूळचे सुपुत्र हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक!
पुणे येथील स्मृतीस्तंभ –
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या अलिकडे मजूर अड्डयाजवळ हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मृतीसाठी म्हणून एक स्मृतीस्तंभ उभारला आहे. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा कर्णिक यांचा हा स्मृतीस्तंभ सध्या तसा दुर्लक्षितच आहे. या संदर्भात एका वृत्तपत्रांच्या पुरवणीत प्रसाद पवार यांनी लक्ष वेधले होते.
☆ ☆ ☆ ☆ ☆
आपण सिंधुदुर्गवासियांनी दरवर्षी करूळला जाऊन मानवंदना द्यायला स्मारकावर गेले पाहिजे. शाळा, महाविद्यालय यांच्या शैक्षणिक सहली काढून त्यांच्या या असामान्य बलिदानाची यशोगाथा नव्या पिढीला विद्यार्थ्यांना सांगायला हवी.
म्हटले तर एक ‘लघुपट चित्रपट’ही काढता येईल. त्यांचे छोटेखानी चरित्र प्रसिद्ध करून जिल्हा परिषदेने शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत वाटायला हवे. दरवर्षी करूळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनता येथे मानवंदना देते. त्यात आपणही सहभागी व्हायला हवे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
लेखक : डॉ. बाळकृष्ण लळीत
संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈