? इंद्रधनुष्य ?

☆ अहमदनगर जिल्ह्यातील माॅरिशस… ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

अहमदनगर जिल्ह्यातील मॉरिशस  म्हणजे अकोल्यातील “फोपसंडी” गांव जेथे आजही सुर्योदय 9 वाजता आणि सूर्यास्त 4.30 ला होतो

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. अगदी तासनतास ट्रॅफिक जॅमचा इकडे येतांना अकोला सोडल्यानंतर  अनुभव घ्यावा लागतो.

मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं प्रति “मॉरिशस” असलेलं हे 1200 लोकवस्तीचे ” फोपसंडी” गांव अकोलेपासून अवघे अंदाजे 40 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून दरीच्या तळाशी वाड्या, पाड्यावर वसलेलं अतिदुर्गम गांव आहे.

या गांवचा इतिहास ही रंजक आहे. साधारणतः 1925 च्या सुमारास संगमनेर प्रांताचे इंग्रज अधिकारी “फोप” हे  घोड्यावरून जंगलात फिरत फिरत या दरीत उतरले. तेथे त्यांना आदिवासींची वस्ती आढळली. या “पोफला” येथील निसर्ग खूप आवडला.व येथे तो दर रविवारी येऊ लागला. येथे राहण्यासाठी त्यांनी “मांडवी नदीच्या” तिरावरील टेकडीवर त्याचे रेस्ट हाऊस बांधले. तेथून तो वरील चार ही जिल्ह्याच्या सिमेवरील डोंगर,  कोंबड किल्ला (कुंजीर गड),  चोहोबाजूंनी धबधबे  पाहण्याचा आनंद घेत असे. पोफच्या या राहण्याने नंतर या गावाला “पोफसंडी” म्हणू लागले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन “फोपसंडी” हे नांव रूढ झाले. ते आजतागायत तसेच आहे.

स्वातंत्र्यानंतर ही 50 वर्षे हे गांव शासनाच्या सर्व सोई सुविधांपासून वंचित होते. अगदी निवडणुकीच्या वेळी ही गाढवावरून 10 कि.मी. मतदान पेट्या नेल्या जात होत्या. 1997 मधील गावातीलच दत्तात्रय मुठे ही व्यक्ती पुणे येथून परत गावांकडे आली. व गांवात  रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, एस टी इत्यादी सुधारणा घडवून आणण्यासाठी पंतप्रधानांपासून ते तालुका स्तरापर्यंत सतत पत्रव्यवहार केले,पायपीट केली. सर्वात प्रथम गावांत बस येण्यासाठी त्यांनी सरकारदरबारी प्रयत्न केले.शेवटचे हत्यार गावकऱ्यांनी गावातच  सांघिक आमरण उपोषणाबाबतचे हत्यार उपसले. नाईलाजाने अधिकारी वर्गांना गावात  पायी यावे लागले. शेवटी गावांत रस्ते आले, बस आली. 2005 ला गावांत रस्ते, वीज यासाठी स्थानिकांनी श्रमदानाचा मोठा सहभाग उचलल्याचे या योजना इथपर्यंत पोहचू शकल्या. आज गांव 100 टक्के हागणदारी मुक्त दिसून आले. गावांत 10 वी पर्यंत शाळा, आहे. वाड्या वस्त्यांवर सिमेंट रस्ते आहेत. नळयोजना आहेत.अकोले येथून रोज एक मुक्कामी बस येते. गावांत अंगणवाड्या आल्या आहेत. नदीवर, ओढ्यावर बंधारे आहेत.

? अजूनही काय सुधारणा आवश्यक आहे ?

१) गावांत पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणजे स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळेल.

२) दळणवळणासाठी रस्ते अजून मोठे व चांगले होणे गरजेचे आहे.

३) येथून माळशेज घाट अवघा 10 कि. मी. अंतरावर आहे. किमान 3 कि. मी. डोंगर फोडून रस्ता केला तर माळशेज अगदी जवळ येईल. व दळणवळण, पर्यटन वाढेल.

४) गावांत बँक येणे आवश्यक आहे.

५) सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलीही दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा, इंटरनेट सुविधा गावात नाही.ते होणे गरजेचे आहे.

६) गावातील दूध दररोज 5 कि.मी घेऊन जावे लागते. त्यासाठी गावातच डेअरी होणे आवश्यक आहे.

या गांवचे अनेक  वैशिष्टये सांगता येतील त्यातील काही प्रामुख्याने खाली देत आहे.

१) अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेवटचे गांव)

२) पावसाळ्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने अजूनही गावातील बहुतांश आदिवासी गुराढोरांसह पावसाळ्याचे चार महिने गुहेचा आसरा घेतात..

३)) या गावात  सकाळी नऊ वाजता सूर्योदय व संध्याकाळी साडेचार वाजता सूर्यास्त होतो. हा दोन्ही देखावा पर्यटकांनी पाहणे म्हणजे पर्यटकांना  कपिलाषष्टीचा योग होय.

४) पर्यटनाच्या दृष्टीने फोपसंडी परिसरात ” कोंबड किल्ला, भदभद्याचा धबधबा, धुळगडीचा धबधबा, धारीचा धबधबा, कावड्याचा धबधबा, चोहडीचा धबधबा, काजवा महोत्सव, आदिवासी नृत्य, निसर्गसॊदर्याने भरलेला  मानखांदा गायदरा, सानदरी, निखळीचा डोंगर, बाळूबाईचा डोंगर, रांजण्याचा डोंगर, टकोरीची खिंड, वारल्याचा कडा, चारण गडद, दोंड्याची गडद, घोडगडद, केमसावण्याचे पाणी, उंबारले,  अनेक गुहा, तसेच कळमजाई मंदिर, बर्डीनाथ मंदिर, दर्याबाई मंदिर, राणूबाई मंदिर इतके प्रचंड निसर्ग सॊदर्याने भरलेले पॉईंट  येथे पहावयास मिळतात. मात्र त्यासाठी किमान तीन दिवस  पायी भटकण्याची तयारी हवी.

५) या गावचे पाणी पिण्यासाठी अतिशय गोड आहे. तसेच धबधब्याखाली आंघोळ केल्यावर शांपू न लावता ही केस कुरळे होतात.

६) पर्यटकांना राहण्याची, जेवण्याची व पर्यटन घडवून आणण्याची व्यवस्था या गावातीलच फोपसंडीचा कायापालट धडवून आणणारे तथा गाईड श्री.दत्तात्रय हनुमंता मुठे यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना 7218327435, 8669754121, 9850989183 या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. वरील मोबाईलला फोपसंडीत रेंज नसल्याने दुसऱ्या गावात आल्यावरच फोन लागतो.त्यामुळे वारंवार फोन लावावा लागेल.

मॉरिशससारखा छोटा देश आज केवळ तिथल्या सरकारने पर्यटन सुविधेवर भर दिल्याने तिथला निसर्ग पाहण्यासाठी जगभरातील लोक तिथे जातात. भारतात ही फोफसंडी सारखे अनेक निसर्ग सॊदर्य असलेली ठिकाणे आज पर्यटकांपासून वंचित असल्याने तेथील जनतेचा विकास खुंटला आहे.तसेच पर्यटक निसर्ग सॊदर्याला मुकले आहे.चला आपण ही पर्यटनासाठी  या निसर्गरम्य व शांतताप्रिय दरीखोऱ्यातील “फोपसंडी” पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या.  पर्यटन करून आल्यावर  तेथील सुवासिक तांदूळ, मध, व चुलीवरच्या तांदळाच्या भाकरी, मासवडी, लज्जतदार शेवंती तसेच  गावरान कोंबडीचाही आस्वाद घ्या.

चला तर मग कधी निघताय पर्यटनाला”फोपसंडी”येथे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments