इंद्रधनुष्य
☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(पण जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या चलनाला डावलणे हा या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे.) इथून पुढे —-
रशिया हा इंधनाचा फार मोठा पुरवठादार आहे. रशिया १० मिलियन barels प्रत्येक दिवशी crude oil उत्पादन करतो. पण अमेरिकेने निर्बंध लावल्यामुळे हा तेलाचा पुरवठा इतर तेलउत्पादक देशांना करावा लागेल अशी अपेक्षा होती. त्यात सौदी अरेबिया आणि UAE ने उत्पादन वाढवायला नकार दिला आणि रशियाने युरोपीय देशांना रुबलमधेच पेमेंट करायला सांगितले.
भारताने रशियाकडून crude oil खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशियाकडून 3 मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला. भारताला हे crude oil 20$-25$ प्रत्येक barrel मागे discount मिळाला. तसेच भारताने रशियाशी हिरे खरेदीचा करार हा युरोमधे केला. चीनने सौदीबरोबर युआनमधे crude oil खरेदीचा व्यवहार केला. ( हे खूप महत्वाचं आहे कारण जर OPEC countries डॉलर्सशिवाय व्यवहार करायला लागल्या तर डॉलर्सची किंमत कमी होईल). इराणने भारताला crude oil चा व्यवहार रुपया रिआलमधे करण्यासाठी प्रस्ताव दिला .
कोरोनाने जागतिकीकरणाच्या मर्यादा स्पष्ट केल्यानंतर ‘आत्मनिर्भर’ धोरण निश्चित करणारा भारत हा जागतिक पटलावर एक समर्थ, ताकदवान राष्ट्र म्हणून समोर आला. उद्योगधंद्यांपासून लसीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारताने स्वत:चे असे वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेतले. आणि युद्धानंतर बदललेल्या पार्श्वभूमीवर ट्रेड सेटलमेंटचे नवे धोरण रिझर्व बँकेने जुलै 2022 मधे जाहीर केले. या नवीन धोरणानुसार भारत इतर देशांशी रुपयामधे व्यवहार करेल. त्यामुळे डॉलर्स वाचतील. रशिया, इराण या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे ते देश रुपयात व्यवहार करत आहेतच. पण ज्या देशांकडे पुरेसे डॉलर्स नाहीत किंवा कमी आहेत ते देश रुपयामधे व्यवहार करतील.
या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व बँकेने जी नियमावली दिली आहे त्यात परकीय बँकांना वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अशी अकाउंट वापरली जातात. यात एक ऑथोराइज्ड डिलर बँक असते आणि या बँकेमधे नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अकाउंट परदेशी बँकांकडून काढले जातात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत परदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत स्वदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. उदा. समजा भारताची ऑथोराइज्ड डिलर बँक एस बी आय आहे असं मानलं आणि भारतात एस बी आय मधे एखाद्या इराणच्या बँकेने परदेशी चलनात म्हणजे डॉलर, युरोमधे व्यवहार कारणासाठी अकाउंट उघडलं तर त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. पण जेव्हा हीच इराणची बँक भारतातील एस बी आय मधे फक्त रुपयामधे व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते तेव्हा त्याला वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. —- रिझर्व बँकेच्या या नवीन धोरणानुसार भारतात वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. म्हणजेच आयात निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे रुपयामधे करण्यावर भर दिला आहे.
नोव्हेंबर 2022 मधे श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने असं म्हटलं की ते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय रुपयाचा वापर करण्यासाठी श्रीलंकेची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगीची वाट पाहत आहेत. यात महत्वाचा मुद्दा असा आहे की श्रीलंकेने त्यांच्या Foreign Currency Basket मधे भारतीय रुपयाला प्रथम प्राधान्य देऊन अमेरिकन डॉलरला द्वितीय पसंती दिली आहे. श्रीलंकेने त्यांच्या नागरिकांना १००००डॉलर मूल्याचे भारतीय रुपये ठेवायला परवानगी दिली आहे. म्हणजे श्रीलंकन व्यापारी भारताशी रुपयात व्यवहार करतीलच, पण जे इतर देश भारतीय रुपयात व्यवहार करू इच्छितात, त्या देशांशीही भारतीय रुपयात व्यवहार करतील. आतापर्यंत भारतीय रिझर्व बँकेने रशियाबरोबर व्यापारासाठी १२ वोस्ट्रो अकाउंट, श्रीलंकेबरोबर व्यापारासाठी ५ वोस्ट्रो अकाउंट, तर मॉरिशसबरोबर व्यापारासाठी १ वोस्ट्रो अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही आफ्रिकन देशही रुपयात व्यापार करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर ताजिकिस्तान, क्यूबा, लक्ज़ेंबर्ग, सुदान हे देश भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात अजूनही बरेच देश रुपयात व्यापार करण्यासाठी पुढे येतील हे नक्की. आणि याचं कारण म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली विश्वासार्हता.
याचा परिणाम असा होईल, की रुपयाची मागणी वाढल्यामुळे रुपया स्थिर आणि भक्कम होईल. भारताची परकीय गंगाजळी (फोरेक्स रिझर्व) वाचेल. डॉलरचं महत्त्व कमी होऊन रुपयाचं महत्व वाढेल. आज जगात पाचव्या क्रमांकाची असलेली भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.
— समाप्त —
लेखिका – प्रा. गौरी पिंपळे
संग्राहक – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈