डाॅ.भारती माटे
इंद्रधनुष्य
☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 2 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
(त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच. तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”) इथून पुढे.
काय बोलावं हे न सुचल्यानं मी शांत. मला माझे बांधव दिसू लागले होते. दुसरी-तिसरीच्या पाठ्यपुस्तकातले मराठी शब्दही योग्य तऱ्हेनं न लिहिणारे. तरीही प्रसवोत्सुक. रोज नवं नवं साहित्य जन्माला घालण्याची घाई झालेले. त्यासाठी ‘कळा’ही न सोसणारे. ‘अभिनंदन’ कधी करावं आणि ‘शुभेच्छा’ कधी द्याव्यात हेसुद्धा न कळणारे. अशी माणसं जर ‘मराठीचे अध्यापक’ म्हणून मिरवत असतील तर ते इंग्रजीचं काय करत असतील? घरात एकही शब्दकोश न ठेवणाऱ्या अशा माणसांना इनसायक्लोपिडियाचे सगळे खंड उशाशी ठेवणाऱ्या या बाई समजणार तरी कशा? बरं त्या काही महाविद्यालयात शिकवत नव्हत्या. त्या शिकवत होत्या माध्यमिक शाळेत. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या मुली आज आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे मळे फुलवत आहेत यात नवल काय?
श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई
“अहो हे शब्दकोश, हे खंड जसे मला उपयोगी पडत होते, तसे नकाशे आणि माझे हे कात्रण-पुठ्ठेही.”
“तुम्ही गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर अध्यापन केलं ते इंग्रजीचं. मग नकाशाचा संबंध आला तरी कुठे?”
“आपण विषय असे तोडतो हेच चुकतं. सगळे विषय एकमेकांच्या मदतीनं शिकवले तर विद्यार्थ्यांच्या गळी चांगले उतरतात, हा माझा अनुभव.”
“पण नकाशा?”
“तुम्हाला मी उदाहरणच देते. तेव्हा दहावीला एक कविता होती फ्लॉरेन्स नाइटिंगेलवरची. ‘लेडी विथ द लॅम्प’. ही बाई परिचारिका, लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञ. १८५३च्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनच जग ओळखू लागलं. आता हे सारं मुलींना समजावून द्यायचं तर ते युद्ध, ती युद्धभूमी दाखवायला नको का? नुसते कवितेतल्या शब्दांचे अर्थ सांगून कुठं कविता समजते का? तेव्हा मला हे खंड आणि नकाशा उपयोगाला आले. दोन दिवस नकाशा वर्गात टांगून मी आधी ते युद्ध समजावून दिलं आणि मग ती कविता. तेव्हा कुठं ती फ्लॉरेन्स माझ्या मुलींच्या काळजात उतरली. कविता जर काळजात उतरली नाही तर मग काय उपयोग?”
काय बोलणार यावर? आमच्या भूगोलाच्या मंडळींनीही नकाशाला हात न लावण्याची शपथ घेतलेली. तिथं या बाई इंग्रजीच्या तासाला नकाशा वापरत होत्या. अशा बाई आम्हाला लाभल्या असत्या तर आमचं इंग्रजी निदान ‘बरं’ झालं असतं असं मला राहून राहून वाटत होतं.
“पण तुम्ही तर गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर शिकवलं इंग्रजी. मग गणिताचं काय झालं? तुमची गणिताची आवड?”
“ती आवड मला स्वस्थ बसू देते थोडीच? इंग्रजी मला शिकवावी लागली म्हणून मी शिकले. सर्वस्व पणाला लावून त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पण माझा जीव गणितातच अडकलेला. मग मी अकरावी, बारावीच्या मुलांसाठी गणिताचे वर्ग घेऊ लागले. पैसे कमावण्याची हौस नव्हतीच. माझा पगार मला नियमित मिळत होता. पुरेसा होता. हे वर्ग घेतले ते केवळ माझ्या हौसेसाठी. गणिताची नाळ टिकून राहावी म्हणून.”
पुन्हा माझ्याभोवती माझेच बांधव. खाजगी शिष्यवृत्ती परीक्षांना सक्तीनं मुलं बसवून पालकांकडून फी आणि परीक्षा घेणाऱ्यांकडून कमिशन घेणारे. परीक्षार्थींच्या संख्येच्या प्रमाणात आधीच निकाल वाटून घेणारे. दोन-चार जिल्ह्यांत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेतील आधीच ठरलेल्या निकालाचे फलक मात्र ‘जिल्ह्यात… राज्यात… देशात पहिला’ असे. तेही चौकाचौकांत लावणारे. यांना बाई समजतील? गंमत म्हणजे हे ‘जिल्ह्यात… राज्यात पहिले’ शासकीय शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत का चमकत नाहीत, हे कोडं न सुटणारं.
बाईंचं आजचं वय ९५. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा कात्रण-गठ्ठ्यांचा उद्योग नियमित सुरू होता. आता त्या थकल्या असल्या तरी अजूनही तितक्याच उत्साहानं ‘शिकणं आणि शिकवणं’ यावर बोलत असतात आणि फक्त यावरच बोलत असतात. गुढीपाडव्यादिवशी बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी गप्पा झाल्या. दुसरा विषय त्यांच्या बोलण्यात आलाच नाही. मी अजूनही त्यांच्यातला ‘शिक्षक’ समजून घेण्याच्या प्रयत्नात. सहज विचारलं परवा त्यांना.
“एकटं राहण्याचा त्रास नाही झाला? शाळेत… समाजात?”
“आपण आपल्या कामात व्यग्र आणि विचारांवर ठाम असलो की कुणी नादाला लागतच नाही. त्यातूनही कुणी लागलं तर आपली इवलीशी तर्जनीसुद्धा कामी येते.”
“म्हणजे? मी नाही समजलो.”
“सांगते. वार्षिक तपासणी सुरू होती. विस्तार अधिकाऱ्यांसोबत उपशिक्षणाधिकारीही आलेले. त्यांनी माझं इंग्रजी शिकवणं पाहिलं. त्यांना ते आवडलंही. चहापानावेळच्या शिक्षकांच्या बैठकीत त्यांनी माझं कौतुकही केलं त्याबद्दल. आणि नको तो प्रश्न विचारला. म्हणाले, ‘बाई तुम्ही लग्न का नाही केलंत?’
त्यांच्या मनात काही नसेलही, त्यांचा हेतूही चांगला असेल. पण मला ते खटकलं. त्यांच्याकडं तर्जनी रोखत मी म्हटलं, ‘इटस् नन ऑफ युवर बिझनेस सर’. आणि बैठकीतून बाहेर पडले. अशी गंमत.”
बाईंच्या हसऱ्या चेहऱ्यावर खट्याळपणाची एक हलकी रेषा.
बाई हे ठामपणे बोलू शकल्या कारण त्यांना कसलाही मोह नव्हता. ना कुठल्या पुरस्काराचा, ना ‘अत्युत्कृष्ट’ शेऱ्याचा. अशा शेऱ्यासाठी नळावरच्या भांडणासारखं वचावचा भांडणाऱ्या मला नव्या नव्हत्या. पण या बाईंचं पाणी वेगळंच होतं. त्यांनी रोखलेली ‘ती’ तर्जनी ताठ होती ती त्याच पाण्यामुळं. त्यांच्या चोख कामामुळं. त्याच बळावर त्यांची सारी वाटचाल दिमाखात झालेली. त्यांचा हाच बाणेदारपणा सोबत घेऊन त्यांच्या अनेक मुलींची वाटचाल सुरू आहे, तशाच दिमाखात.
धवल चारित्र्य, निष्कलंक हात, आपलं काम उत्तमच व्हायला हवं याचा ध्यास आणि विद्यार्थ्याविषयीची तळमळ या शिदोरीवर सांगलीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेत सुमती बाबुराव फडकेबाईंनी आपला कार्यकाळ गाजवला. यथावकाश त्या निवृत्त झाल्या तरी त्यांच्या मुलींच्या काळजात त्यांचं स्थान आजही कायम आहे. ते कायम राहील यात कसलीच शंका नाही.
कारण काळजात जागा मिळते ती आयुष्य प्रकाशमान करणाऱ्या दिव्यांनाच. मेणबत्त्या काय घरभर असतातच.
— समाप्त —
लेखक : श्री सदानंद कदम
मो. ९४२०७९१६८०
संग्रहिका : डॉ. भारती माटे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈