इंद्रधनुष्य
☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट…
अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात. खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…
एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते.
तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.”
यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला.
त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला.
स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…
हलवाई सांगू लागला,
” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”
स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले.
तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला.
बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….
(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)
संग्राहक : अनंत केळकर.