सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
श्वानांच्या गुणांच्या बाबतीत महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते. पांडव स्वर्गात जाताना ,’ सरमा ‘ ही कुत्री त्यांच्याबरोबर होती. जो खोटे बोलला नाही ,खोटे वागला नाही, निस्वार्थ सेवा, आज्ञाधारकता, आणि निष्ठावंत सेवक असा राहिला, त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता .या अटींमध्ये ‘सरमा ‘ पास झाली . तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तिला स्वर्गाचे दार सहजगत्या खुले झाले.
आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर , त्यांचा लाडका कुत्रा ‘ वाघ्या ‘ महाराजांच्या चितेवर धन्यासाठी झेपावला होता. या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही तोकडे आहेत खरोखर.
गुजरातमधील पालमपुर तालुक्यात काही कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ते पाच कोटींचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी नवाबाने गावकऱ्यांच्या नावावर केलेली जमीन, त्यांनी आपल्या कुत्र्यांच्या नावाने केली. त्या कुत्र्यांची जमीन वीस बिघा, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ पाच-सहा कोटीहून जास्त आहे. पहा ही कुत्र्याची श्रीमंती !
एखाद्याचं नशीब पहा कसं असतं ते. अंतराळयानातून सजीव म्हणून ‘ लायका ‘ या कुत्रीलाच पाठवले होते. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सजीवाचा मान या कुत्रीला मिळाला. काय म्हणावं तिचं नशीब !
आत्तापर्यंत श्वानांवर सर्वात जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. श्वानांचा एक विश्वकोशही आहे .जी व्यक्ती प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षा पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात. त्या प्रेमाला माणूसच कमी पडतो, असं म्हणायला हरकत नाही .काही श्वान आपलं सुंदर रूप आणि आज्ञाधारकपणा या गुणांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजतात. थायलंडमधील बँकॉक येथे डॉग शो मध्ये आशिष लिमये यांची ‘ माया ” ‘ (दोन वर्षे वयाची, बेल्जियम मेनोलीज जातीची ) हिने “सेव्हन बेस्ट ऑफ ब्रीड “, आणि ” सेव्हर चॅलेंज सर्टिफिकेट” अशी दोन मानाची पदके मिळविली. कॅनल क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धेतही ती चॅम्पियन ठरलेली आहे. खरंच किती कौतुक करावे?
ऑलिंपिक सारख्या सामन्याच्या वेळी ,काही मोजकेच श्वान, प्रेक्षकांमध्ये दंगा होऊ न देण्याचे काम
करतात . लोक पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतात. व्यवस्थापनात पोलिसांपेक्षा कुत्र्यांची संख्या कमी चालते.
श्री. गिरीश कुबेर यांनी ” पंचकन्या स्मरे नित्यम “, या लेखामध्ये, घरातल्या पंचकन्यांचे (कुत्र्यांचे ) व्यक्तिमत्व इतके छान अधोरेखित केले आहे की, ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. ते लिहितात की या पंचकन्यांनी हेच शिकवलेलं की — “चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो”. पहा बरं काय वाटतं त्यांना ते.
” मी आणि माझी ३१ बाळं “, हा ममता रिसबूड यांनी लिहिलेला लेख वाचताना त्यांनी त्या बाळांसाठी (प्राण्यांसाठी ) घेतलेले कष्ट आणि त्याग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे वाटते.
चित्रपटांबद्दल तर काय सांगावे? ” हम आपके है कौन” मधला ‘टफी ‘, “सच्चा झूठा” मधला ‘ मोती’,
“माँ “मधील ‘डॉगी’, “बेताब “मधला ‘बोझो’, ” वॉटर” मधला ‘ काळू’ — किती नाव सांगावीत तितकी
कमीच ! या श्वानांचा अभिनय आपण हौसेने आणि आवडीने पाहतो ना!
पूर्वीचे मुंबई येथील श्वान शिक्षक श्री. शां ना दाते यांचा २५ वर्षे, चार श्वानांबरोबर सहवास होता. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘ प्रिन्स ‘ या कुत्र्यासह, मुलाखती आणि मार्गदर्शन केले होते. ‘ प्रिन्स ‘ चे अत्युत्तम काम असलेल्या ” फुल और कलियाँ”” ( १९६० साली) या बोलपटाला पंतप्रधान पुरस्कार मिळाला. ते अभिमानाने सांगत असत की, “मी मोठा झालो नाही. ‘प्रिन्सने ‘, मला मोठं केलं.” तो स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचा स्मरणविधीही ते करत असत.
पोलीस खात्यातील श्वान निवृत्तीनंतर कोणीही दत्तक घेऊ शकतात .गुन्हेशोधक ,बॉम्बशोधक ,नारकोटिक्स शोधक ,रेस्क्यू टीम, फॉरेस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे श्वान पूर्ण प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात .रात्री गस्त घालणे, गुन्हेगारांना पकडणे, विमानतळ, गोद्या या ठिकाणी पहारा आणि तपासणी ,लपवून आणलेले मादक पदार्थ शोधणे, अशी कामे पोलीस दलातील श्वानांना करावी लागतात. काही वेळा पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, अशावेळी श्वान ते काम बिनचूक करतो. परदेशात काही ठिकाणी प्रेमापोटी कुत्र्याची स्मारकंही उभी केली गेली आहेत.
आमच्याच घरातल्या कुत्र्यांच्या इमानदारीचे किती कौतुक आणि अनुभव सांगावे तितके कमीच ! ओसाड रानात केवळ कुत्र्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्तपणे राहत होतो. वेगवेगळ्या टोनमध्ये आवाज काढून कितीतरी साप, विंचू, अगदी चोरही त्यांनी पकडून दिले आहेत. न फिटणारे आणि अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर ! कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्ती योगाच्या मार्गातून मी त्यांच्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.
ही श्वानांची गौरव गाथा वाचताना काही जणांचे आक्षेपही असणार. निरपराध्यांना भटकी कुत्री चावतात, त्याचे काय? पण एक कुत्रा चावला तर उरलेल्या पंचवीस कुत्र्यांना मारून टाकायचे का? मारून टाकणे, हा त्यावरचा उपाय नव्हे. पोटाची भूक भागत नसेल तर ते आक्रमक होतात. कित्येक ग्रुप सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ त्यांची संख्या वाढू नये म्हणून, आकडा न सांगता प्रामाणिकपणे त्यांचे निर्बिजीकरण व्हायला हवे .कुत्रा पाळायचा असेल तर भटक्यातला पाळला ,तर एक जीव जगेल. आणि तुमच्यावर अनंत उपकार करेल. श्वानांची ही गाथा कितीही लिहिली तरी न संपणारी आहे. ती अशीच कौतुकाची गाथा चालतच राहणार.
— समाप्त —
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈