सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ वीर मारुती… – श्री मंदार लवाटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
‘बुद्धिमताम् वरिष्ठम्’ अशा देवता म्हणविल्या जाणाऱ्या शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा गेली दोनशे वर्षे अखंड उत्सव सुरू आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीचे शेंदूराचे कवच निसटले आणि मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती समोर आली. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा इथे चालणारा उत्सव पानिपतच्या युद्धात बळी पडलेल्या वीरांच्या स्मृतिनिमित्त होतो, याची आजही अनेकांना कल्पना नाही.
अशी होती परंपरा…
परंपरेनुसार, जी घराणी पानिपतच्या युद्धात लढली त्या घराण्यातला ज्येष्ठ पुत्र वीराची वेशभूषा करून मारुतीरायाच्या भेटीला येतो. ही भेट होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, धूलिवंदनाला होते. देवाला भेटण्यासाठीची जय्यत तयारी करून पूजेचे तबक हाती घेऊन तो मारुतीच्या भेटीला येतो. इथे येऊन देवाला मिठी मारली, की त्या घराण्यातला वीर देवापर्यंत पोहोचतो, अशी त्यामागची श्रद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी बारा गाडे असत आणि ते गाडे ओढण्याचा मानही वीराला मिळत असे. ही परंपरा होती तेव्हा जोरदार यात्राही व्हायची. काळानुरूप यातल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. ‘हे स्थान पुरातन असल्याचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. या ठिकाणी युद्धापूर्वी नवस बोलला जायचा. युद्धातून माणूस परतल्यास त्याला तुझ्या दर्शनाला आणू. जो युद्धावरून येतो तो वीर. दास, प्रताप आणि वीर अशी मारुती दैवताची तीन रूपे आहेत. धूलिवंदनाला अजूनही अनेक घराण्यांतले लोक इथे येतात. मारुतीरायाच्या भेटीला येताना घरातले टाक घेऊन येण्याची परंपरा आहे. काहीजण शस्त्रही आणतात. जुना मारुती आहे, एवढाच उल्लेख आढळतो. त्यामुळे पुण्यातल्या जुन्या देवस्थानांपैकी तो एक आहे. हा मारुती पिंपळाच्या वृक्षाखाली आहे.’
पूर्वी गांगल कुटुंबीय अनेक वर्षे उत्सव पाहायचे. आता त्या घराण्यातले कुणी नसल्याने उत्सवाची परंपरा पुढे राम दहाड, सचिन दाते, महेश पानसे, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी ही कार्यकर्ते मंडळी चालवत आहेत. ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची परंपरा कार्यकर्ते सांभाळत असून, लोकवर्गणीतूनच हा उत्सव चालतो. आपापल्या इच्छेनुसार त्यासाठी मंडळी योगदान देतात.
वीर मारुतीच्या भेटीसाठी वाजतगाजत येण्याची परंपरा आजही सुरू आहे. त्या निमित्ताने वीरांचे हार घालून; तसेच प्रसाद देऊन स्वागत केले जाते. वर्षानुवर्षे हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा १८ दिवसांचा कीर्तन महोत्सव इथे होतो. अनेक कीर्तनकार आपली सेवा रुजू करतात.
वीर मारुतीबाबत पेशवे दफ्तरात अनेक कागदपत्रे धुंडाळली; मात्र मारुतीची स्थापना कशी आणि केव्हा झाली, याचा उल्लेख मिळत नाही. मारुतीरायाच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिशा आहेत. आवेशपूर्ण अशी ही मूर्ती वीर मारुती या प्रकारातली आहे.
लेखक : श्री मंदार लवाटे
इतिहास संशोधक
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈