डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – ऋभु (देव / देवांची देवता)

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील विसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ऋभु या देव / देवांच्या देवतेला  आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋभुसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद

अ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या । अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥

जननाच्या क्लेशापासुनिया ज्या देवा ना मुक्ती

त्यांच्यासाठी अपुल्या कंठे पंडित स्तोत्रे गाती

या स्तवनांनी प्रसन्न होउनी आशिष देती देव

त्यांच्या योगे ऋत्विजांना प्राप्त होई वैभव ||१||

य इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ । शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥

या देवांनी इंद्रासाठी केली अश्व निर्मिती

आज्ञा करिता सेवेसाठी स्वतःहुनी येती

अद्भुत कर्मांनी आपुल्या सन्माना पात्र

आवाहन हे सार्थ करावे हे अमुचे होत्र ||२|| 

तक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ । तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥

यांनी निर्मिला अश्वीदेवांसाठी दिव्य शकट

अतिसुखदायी सहजी करतो संचार सर्वत्र

साकारली अश्वीदेवांस्तव धेनू बहूगुणी

क्षुधा नि तृष्णा निवारीतसे क्षीर मधुर देऊनी ||३||

युवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ । ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥

निर्व्याज अश्या वृत्तीची कीर्ति ऋभू देवाची

मातपित्यासी अर्पियली दक्षीणा तारुण्याची 

अपुल्या भक्तांच्यासाठी ते कनवाळू असती

प्रार्थनेसिया प्रसन्न होऊनी दान फलाचे करिती ||४||

सं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता । आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥

वैभवमंडित आदित्यासह देवराज इंद्र

मरुद्गणासह सिद्ध जाहले रथीं होऊनी स्वार

त्यांच्या संगे सहभागाचा मूर्तिमंत आनंद 

सत्वर येउनी आम्हा देती ऋभू किती आमोद ||५||

उ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् । अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥

त्वष्टादेवाने निर्मिले दिव्य सोमपात्र 

तयात सारे साठविती ठेवूनी सोमरस

ऋभूदेवाने तया पासूनी केले चार चमस

अशी अलौकिक कर्मे त्यांची असती ज्ञात आम्हास ||६||

ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते । एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥

वर्णन करण्या तुमचे शौर्य आम्ही वाचाहीन

तुम्ही इतुके चंडप्रतापी तुमच्या पायी लीन

एकवीस भक्तां प्रत्येकी एक रत्न हो द्यावे 

उत्तम तुमचे आशीर्वच देवा आम्हाला द्यावे ||७|| 

अधा॑रयन्त॒ वह्न॒योऽ॑भजन्त सुकृ॒त्यया॑ । भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥

अपुल्या श्रेष्ठत्वाने यांसी प्राप्त थोर मान 

समस्त देवांसम यांनाही यज्ञी मिळतो मान

अर्पण केला आम्ही त्यांना हविर्भाग त्यांचा

स्वीकारुनिया त्यासी त्यांनी मान राखिला अमुचा ||८||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे… 

https://youtu.be/QyH4F4zpSNI )

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments